श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ किती किती रुपे तुझी..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दिसतं तसं प्रत्येकवेळी असतंच असं नाही याचं ‘किरण’ हा शब्द नेमकं उदाहरण म्हणता येईल.

पहाटप्रहरी मागे रेंगाळणाऱ्या अंधारकणांना हळूवार स्पर्शाने दूर सारत चैतन्याचं शिंपण करीत क्षितिजरेषेवरुन अलगद डोकावून तांबूस पायवाटांवरुन सर्वदूर पसरणारे कोवळे सूर्यकिरण आणि दिवसभराच्या अथक श्रमानंतर विसावू पहाणाऱ्या शरीरमनाला आपल्या शितल स्पर्शाने प्रसन्नचित्त करणारे सुखद चंद्रकिरण ही परस्परभिन्न अशी किरणांची दोन रुपे ! एक चैतन्यदायी ऊर्जास्त्रोत तर दुसरे हळूवार स्पर्शाने शांतवणारे ! तथापी वरवर दिसणाभासणारी ही सर्वप्रिय किरणे एवढीच किरण या शब्दाची परिपूर्ण ओळख म्हणता येणार नाही.

अतिनील किरणे,तसेच शास्त्रज्ञानी अथक प्रयत्नांती शोधलेले ‘क्ष’ किरण अशी किरणांची विस्मित करणारी परस्परवेगळी वैशिष्ट्यपूर्ण रुपे हा सविस्तर विवेचनाचाच विषय आहे.तरीही त्यांचा ओझरता परिचयसुध्दा उद्बोधक ठरेल.

सर्वसाधारण प्रकाशकिरण आपल्या शरीरातून आत प्रवेश करु शकत नाहीत.पण प्रकाशकिरणांच्या परावर्तनावर संशोधन करीत असताना एका जर्मन वैज्ञानिकाला अशा किरणांचा अचानक शोध लागला जी शरीराच्या अंतर्गत भागातसुध्दा  प्रवेश करु शकतात. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्या किरणांचे नेमके नाव माहित नसल्याने त्या किरणांना त्याने ‘क्ष’ हे नाव दिले.X Ray हे या X Radiation चेच लघुरुप.पुढे त्यावरील अनेक प्रयोगांदरम्यान या X Radiation ची शरीराच्या आत प्रवेश करुन आतील शरीराच्या नेमक्या भागाची छायाचित्रे घेऊ शकण्याची आश्चर्यकारक क्षमता लक्षात येताच वैद्यकीय निदान आणि उपचारांसाठीच्या उपयोगितेसाठी संशोधनाची द्वारे  खुली होऊ शकली .त्याचे फलितआज आपण अनुभवतो आहोतच.या क्ष किरणांची अतिशय मर्यादित मात्रा शरीरांतर्गत छायांकनासाठी पुरेशी असते.मात्र याच किरणांची जास्त प्रमाणातली विध्वंसक मात्रा (गरजेनुसार कमी-जास्त) कॅन्सर वरील रेडिएशन ट्रीटमेंटमधे देण्यात येते.त्यामुळेच त्याचे होणारे साईड-इफेक्ट्सही लक्षणीय असतात.

अतिनील किरणे ही सुर्यप्रकाशात आढळणारी किरणे.यांचं सुर्यप्रकाशातील प्रमाण अत्यल्प असलं तरी हानीकारकता मात्र प्रचंड असते. वायुपटलावरील ओझोनच्या थरामुळे अतिनील किरणांना थोपवून धरले जाते.वाढत्या प्रदुषणामुळे ओझोनचा थर विरळ होत गेल्याने सजीवांच्या जीवाला निर्माण होऊ पहाणारा अतिनील किरणांचा धोका हा पर्यावरणाच्या दृष्टीने आजचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे.

हे अतिनील किरण हानीकारक जसे तसेच उपयोगीही.याच किरणांचा वापर पाणी शुध्दीकरण आणि हवा शुध्दीकरण उपकरणांमध्ये केला जातो.

साधारणत: सूर्याची     प्रकाशकिरणे आपल्या शरीरावयवात प्रवेश करु शकत नाहीत या नियमाला एकमेव अपवाद म्हणजे आपले डोळे.आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पापण्या आणि भुवयांची निसर्ग योजना असली तरी डोळ्यांची ही सुरक्षाकवचे अतिनील किरणांना थोपवू शकत नाहीत.त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याची विशेषतः उन्हाळ्यात जास्त काळजी घेणे हितकारक असते.

किरणांचा ‘उत्सव’ ही एरवी कवीकल्पनाच वाटली असती.पण वास्तुशिल्पकलेतील कल्पकतेने साकारलेला चमत्कार ठरलेला हा ‘किरणोत्सव’ याची देही याची डोळा पहाण्याचे भाग्य मिळते ते करवीर निवासिनी ‘श्री महालक्ष्मी मंदिरा’त !

आपलं शरीरस्वास्थ्य बव्हंशी आपल्या मन:स्वास्थ्यावर अवलंबून असते.सतत दडपणाखाली अस्वस्थ असणाऱ्या मनोवस्थेचा परिणाम शरीरावरही होत असतोच. अस्वस्थ मनातील हा नैराश्याचा अंधार एखाद्या आशेच्या किरणाच्या ओझरत्या स्पर्शानेही नाहीसा होऊ शकतो खरा पण त्या किरणांच्या आपल्या मनातील मुक्त प्रवेशासाठी आपण आपल्या मनाची कवाडे मात्र खुली ठेवायला हवीत !

किरणांची ही विविध रंगरुपे आश्चर्य वाटावीत अशीच.ती पाहून वाटणारं आश्चर्यच मनात उमटणाऱ्या ‘ किती किती रूपे तुझी ‘ या आश्चर्योद्गारांत प्रतिबिंबित होत रहाते !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments