विविधा
☆ कव्हर… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
आज खूप वर्षानंतर पुस्तक विकत घेण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात [ दालनात} गेले होते.
गेली अनेक वर्षे पुस्तकांना जणू पूर्णविराम द्यावा लागला होता, कारण तो दिला नसता तर माझ्या चिमुकल्यांमुळे एका पुस्तकाच्या अनेक प्रती तयार झाल्या असत्या….
आज मात्र अनेक वर्षांनी ह्या पुस्तकांना पाहून खूप आनंद होत होता. प्रत्येक पुस्तकांवरून नकळत हात फिरवला जात होता, अचानक लहानपणीची एक घटना आठवली. मी खूप छोटी असेन, मला माझे बाबा पहिल्यांदा पुस्तकांच प्रदर्शन बघायला घेऊन गेले होते.
खूप पुस्तके होती वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या विषयांची, काही संग्रही, काही लहानमुलांची, काही थोर नेत्यांची, मला त्यातले काहीही कळत नव्हते ती गोष्ट वेगळी.
माझे बाबा मात्र मला प्रत्येक लेखकाची माहिती देत होते. माझं लक्ष मात्र त्यांच्या बोलण्याकडे कमी, आणि पुस्तकांच्या छान रंगीत रंगीत आवरणावर जास्त होते. काहींवर सुंदर सुंदर पऱ्या होत्या, तर काहींवर अक्राळविक्राळ राक्षस,काहींवर हत्ती, उंट, सिंह ह्यांची चित्र होती तर काहींवर सिंड्रेलाची.
बाबांनी मला दोन पुस्तकं निवडायला सांगितली. मी अशी पुस्तकं निवडली ज्याची चित्र मला फार आवडली. ती कोणी लिहिली आहेत, कोणत्या विषयांवर लिहिली आहेत ह्याच्याशी माझे काही देणे घेणे नव्हते. त्यावेळी बाबा काहीच बोलले नाहीत. घरी आल्यावर मात्र त्यांनी मला विचारले की मी ती पुस्तक का निवडली ?? मी म्हणाले काही नाही त्याची चित्र बघा ना किती छान आहेत ती चित्र मला खूप आवडली म्हणून ती निवडली.
असच काहीस माणसांच्या आयुष्यात घडतं नाही. आपण माणसांचे चेहरे बघून त्यांची निवडत करत असतो. त्यांच्याशी मैत्री करत असतो, नाती जोडत असतो, त्यांच्या मनात काय विचार चालू आहे हे कधी डोकावून पहावे अस वाटतच नाही आपल्याला. त्यांचा पेहेराव, त्यांचा चेहरा, त्यांच ते शुगर coated बोलणे हे पाहूनच त्यांच्या बद्दल एक मत बनवून टाकतो.
आणि जसं पुस्तकं वाचायला सुरुवात केल्यावर आपल्या लक्ष्यात येत की, पुस्तक अजिबात वाचनीय नाही. तसं काहीसं माणसांच्या बाबतीत होत. एखाद्याचा चेहरा इतका प्रेमळ, दयाळू, सोज्वळ सज्जन असतो अगदी gentleman वाटतो. पण प्रत्यक्षात तो तिरसट, क्रूर, रागीट असतो. अति गोड बोलणार माणूस आतून किती धूर्त, लबाड आहे हे कळतच नाही आपल्याला.
फरक फक्त इतकाच असतो की पुस्तकं आपण न वाचता, आवडले नाही म्हणून ठेऊ शकतो.पण नाती नाही हो वगळता येत. ती निभावून न्ह्यावी लागतात.
पण काही वेळा असं ही होत की, पुस्तक चांगल की वाईट आहे हे आपल्याला काही पानं वाचल्यावर लक्ष्यात येतं, एखाद्या पुस्तकाला लेखकांनी अचानक यू टर्न दिलेला असतो. आपण हे पुढे आता अस होईल अस काहीतरी विचार करत असतो पण लेखकाने काहीतरी वेगळेच लिहिलेले असते… आपल्याला वाटत असतं की ह्यातला नायक किती रागीट आहे, तो आता तिचा शेवट करणारच पण पुढे वाचल्यावर कळते की तो असा का बनला. हां काही पुस्तक अपवाद आहेत म्हणा.
माणसांच्या मनांत नक्की काय चालू आहे हे आपल्याला त्याला समजून घेतल्याशिवाय कळत नाही. त्याचा स्वभाव असा का बनला हे आपल्याला त्याची बाजू समजून घेतल्याशिवाय कळत नाही.
त्याच्या सहवासात काही दिवस घालवावे लागतात त्याच्या मनात उतरून स्वतः ला त्याच्याजागी ठेऊन विचार करावा लागतो तेव्हां कुठे थोडे कळते.
खूप जणांना सवय असते एखाद्या बद्दल पट्कन मत बनवायची. खूप जणांना असं वाटतं की आपण माणसे परफेक्ट ओळखू शकतो. पुस्तकांची cover बघून त्यातली गोष्ट ओळखू शकतो, अगदी तशी. पण आपण स्वतःला तरी कितपत ओळखतो ही आपली एक शंका आहे मला.
आपण स्वतः च्या चेहर्यावर, मनांवर cover घालण्यात इतके बिझी असतो की आपल्याला ही कळत नाही की किती थर चढले आहेत. कधी अहंकाराचा, तर कधी लोभाचा, कधी दुःखी नसताना आपण किती दुःखी आहोत हे दाखवण्याचा तर कधी खूप कष्ट, अपमान, हाल सहन करूनही सुखी असण्याचा.काही वेळेला आपल्याला जाणून बुजून cover घालावे लागते आपल्या मनावर, चेहर्यावर.
मित्रानो मला पुस्तकं घेतांना ही जाणवलेली गोष्ट मी आज तुमच्या समोर मांडली.. माझं फक्त एवढेच म्हणणे आहे की कोणाही बद्दल पट्कन मत बनवू नका. दोन्ही बाजू समजून घ्या. पुस्तकाच cover बघून जसं पुस्तक निवडायचे नसते तसच माणसाचा चेहरा बघून त्याला निवडू नका.
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈