सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते. तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो, ‘ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात, ‘ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’ त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते.

नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते.लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते. ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो. पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

🙏 गणपती बाप्पा मोरया! 💐

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments