1

मराठी साहित्य – विविधा ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कापणे – एक इव्हेंट ! 😂😢😟

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्या काळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल ! मला आज सत्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे ! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो,  म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा !

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच ? “लिहिता हात” म्हणजे काय ?  तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं ? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे?) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय ! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला  ऐकून घेवू ? काय बरोबर ना मंडळी ?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप ! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर ? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी खायचा प्रसंग पण आपल्यावर नक्कीच ओढवला असेल, बघा आठवून ! आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय ? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या !

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई !  मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची ! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा.  मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय ! टोक काढतांना गाढवासारखं (?) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं?”

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां ! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे !

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे !  हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल ! आजकाल कशातच “राम”  उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही ? असो ! कालाय तस्मै नमः !

“भावजा, रविवारी सकाळी ७ !” “भावजा, बुधवारी सकाळी ९ !” “भावजा,….  सकाळी………. !” असे निरनिराळे आदेश वजा सूचना, आमचा “भावजा” खाली रस्त्यावरून जातांना दिसला की त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात, चाळी चाळीच्या कॉमन गॅलेरीतून ऐकायला येत.

मंडळी “भावजा” हे आमच्या आठ चाळीच्या मिळून वसलेल्या समूहातल्या, अंदाजे पाचशेपैकी चारशे खोल्यातील लहान लहान मुलं आणि त्या प्रत्येक खोलीतली वडील मंडळी, साधारण साठ वर्षांपूर्वी ज्याच्या समोर दर दोन ते तीन महिन्यांनी स्वतःच डोकं भादरून घ्यायला “नतमस्तक” होत त्या “नाभिकाचे” नांव !

तुम्ही म्हणालं, “भावजा” हे काय नांव आहे ? पण मंडळी मी तुम्हांला शपथेवर सांगतो, माझ्या जन्मापासूनच्या चाळीतल्या पन्नास वर्षाच्या वास्तव्यात मला कळायला लागल्या पासून तरी, त्याला आठही चाळीतले समस्त चाळकरी आणि पोरं टोरसुद्धा त्याच नावाने हाकमारीत असत. त्यामुळे त्याच्या खऱ्या नावाचा पत्ता, मी माझा चाळीतला पत्ता बदलेपर्यंत तरी मला लागला नाही. शिवाय त्याच खरं नांव जाणून घ्यावं असं त्याकाळी मलाच काय, इतर चाळकऱ्यांना सुद्धा कधी वाटलं नाही, हे ही तितकंच खरं ! तरी सुद्धा आज त्याच “भावजा” हे नांव आठवताच, त्याची वामन मूर्ती अजूनही इतक्या वर्षांनी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते !

पांढरं स्वच्छ धोतर, त्यावर निळा ढगळ म्हणावा असा, समोर दोन मोठे खिसे असलेला आणि त्या दोन खिशांना बाहेरून बटनाने बंद करायला असलेले दोन फ्लॅप असलेला शर्ट, डोक्यावर काळी गोल टोपी, पायात कोल्हापुरी चपला आणि उजव्या हातात पत्र्याची, त्याला लागणाऱ्या सगळ्या आयुधांची पेटी ! अशा अवतारातली त्याची ठेंगणी ठुसकी वामन मूर्ती, आठही चाळीचे जिने चढता उतरतांना मी तेंव्हा अनेक वेळा बघितली आहे.

असा हा “भावजा” आपल्या डाव्या शर्टाच्या खिशात चांदीची साखळी असलेलं एक छोटेखानी गोल घड्याळ बाळगत असे. अर्थात त्या घडाळ्याचा उपयोग तो त्या वेळेस तरी, आजच्या भाषेत सांगायचं तर “शायनींग” मारण्यासाठीच करत असावा. कारण त्याला तुम्ही जरी एखाद्या दिवशी सकाळी सात वाजता बोलावलं असेल आणि त्यानं तसं तुमच्या नावासकट खिश्यातल्या छोट्या डायरीत लिहिलं असेल, तरी स्वारी त्या ठरलेल्या दिवशी दहाच्या आत उगवेल तर शपथ !

याला कारण पण तसंच होत. तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती ! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं ! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे.  आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना ? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे !  या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची ! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा !

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे.  शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (?) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई !

क्रमशः…

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈