श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 2 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 (कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई ! ) पुढे चालू…..

सिनेमाचा विषय निघाला म्हणून एक आठवण सांगण्या सारखी आहे, तेव्हढी सांगतो आणि पुढे जातो. “पुरश्या” नावाचा आमचा एक मामा होता. तो म्हसळा या गावी (श्रीवर्धन-दिवेअगार जवळ) शेती वाडी करत असे. त्याच्या सुपारीच्या बागा होत्या आणि तो आपला माल तेंव्हा मुंबईला “मार्केटात” पाठवत असे व त्याचे पैसे वसुल करायला दर सहा महिन्याने मुंबईला यायचा. अर्थात दोन चार दिवसाचा त्याचा मुक्काम आमच्या घरी ठरलेला. त्याच पैसे वसुलीच काम झालं की तो आमच्या आईला “बयो उद्या सकाळच्या एस्टीनं जातोय गं परत !” असं सांगायचा. मगं आम्ही मुलं त्याला “मामा उद्या तू परत गावी जाणार, मग आज रात्री ‘हिंदमाताला’ सिनेमाला जाऊया नां !” असा घोषा लावत असू. पण आमचा मामा पक्का बेरका होता. तोंडात कुड्याची पेटती विडी ठेवून म्हणायचा, “त्या सिनेमात बघण्यासारखं काय असत मला कळत नाही ! अरे बाहेर जे तुमच्या हिरो हिरोईनचे फोटो लावलेत नां, ते फक्त आत थेटरात पडद्यावर हलतात आणि बोलतात, एवढाच काय तो फरक ! त्यासाठी आपल्या दिडक्या कशास खर्च करायच्या म्हणतो मी ? त्यापेक्षा ही पाचाची नोट घ्या आणि आईस्क्रीम खा बघू सगळ्यांनी !” अस म्हणून आमच्या तोंडाला आईस्क्रीम पुसायचा, सॉरी पान पुसायचा !

आज वयाच्या सत्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो ! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान ! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी.  माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात ! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच !

खिसा आणि पाकीट कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच !  आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकल मधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो !

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच.  स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज ! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त !

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात ! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात !

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल !” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल ! म्हणून सोप्या भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source !” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे !

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला !”

“टॅक्स !” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय ! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात !

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच ! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो !

 – समाप्त –

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments