श्री राहूल लाळे

?  विविधा ?

☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

नववर्ष आलं आणि मागच्या वर्षाचा आढावा घेऊन पुढच्या वर्षात काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वडील आजारी पडले. तसं मागचं वर्ष संपतानाच थोड्या तक्रारी चालू होत्याच, पण आता तीव्रता वाढली होती. अचानक ऑफिसमध्ये फोन आला की चक्कर येऊन पडले आणि लगेच निघालो. रस्त्यातूनच अँब्युलन्स घरी बोलवली आणि वडिलांना घेऊन दीनानाथ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत आणलं . परिस्थिती अवघड आहे आणि क्रिटिकल आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आयसीयूमध्ये ऍडमिट केलं.

कोणतंही आजारपण, हे ते भोगणाऱ्याला जाणवतं आणि जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्याशी संबंधितांना, हॉस्पिटलमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, तिथले मामा-मामी आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफना ही त्याची जाणीव होते…पण प्रत्येकाची त्याकडे पहायची दृष्टी वेगळी. डॉक्टर्स-नर्सेस-मदतीचा स्टाफ यांच्यासाठी जरी रुग्णांची सेवा करणं ही ड्युटी -कामाचा भाग असला तरी ती मनापासूनच करायला लागते – रुग्णाचा आजार त्याचं निदान करून दूर करायचा असला तरी भावनिक गुंतवणूक  न करता हे करणं महा कौशल्याचं काम. व्यक्ती तशा प्रकृती तसंच जेवढे रुग्ण तेवढे वेगवेगळे आजार व त्यांचे स्वरूप. यावर इलाज करताना अनेक नाजूक – अवघड आणि अनेकदा कसोटीचे प्रसंग येतात- त्यातून यशस्वी होऊन बाहेर पडणं सोपं काम नाही ! गेले काही आठवडे हॉस्पिटलमध्ये राहून अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सुरवातीला वडलांना  इमर्जन्सीत आणल्यावर तिथल्या स्टाफने केलेली धावपळ – नंतर रात्रभर ICU मध्ये तिथे चाललेली लगबग – सकाळी बाबांना शुद्ध आल्यावर त्या अर्धवट  स्थितीत त्यांच्या  ” माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही” अशा काही तक्रारीही स्मितमुद्रा  धारण करून  डॉक्टर व इतर स्टाफचं त्यांचं काम करत राहणं म्हणजे त्यांना अशा किरकिऱ्या तर कधी अनेक सोशिक रुग्णांना एकाच वेळी अटेंड करणं यासाठी वैद्यकीय ज्ञान आणि प्रॅक्टिस याबरोबरच किती कौशल्याचं आणि धीराचं काम आहे हे नंतरही दोन-तीन आठवडे  जवळून पाहायला मिळालं.

जीवनदानाचं आणि रुग्णसेवेचं काम करणाऱ्या या सर्वांना अनेकदा दुवा मिळतात पण  काही विपरित प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याच्या प्रोफेशनल हॅझार्डना समोर जायला लागतं.  हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस , मामा-मामी आणि सिक्युरिटी  स्टाफ यांची  ( यात अनेक स्त्रियाच ) परिस्थिती काही वेगळी नाही – कधी रेग्युलर शिफ्ट म्हणून तर कधी ओव्हरटाईम म्हणून बारा बारा तास वेगवेगळ्या वेळेची ड्युटी करणं – अनेक रुग्ण – त्यांना भेटायला येणारे नातेवाईक- मित्रपरिवार यांना सांभाळून घेत सतत बारा महिने चोवीस तास हॉस्पिटलमध्ये  रुग्ण – त्यांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारी आणि दडपणग्रस्त  मनस्थितीत राहणं सोपं नाहीच.

सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ लहानपणानंतर  वडिलांना आधी कधी  दिला होता  हे आठवायलाच लागेल. सुरुवातीचा पूर्ण  आठवडाभर पूर्ण वेळ  हॉस्पिलमध्येच होतो – ऑफिसला जाऊ शकलो नाही . नंतर इथं अनेक दिवस जाणार आहे हे कळाल्यावर आई – बायको – बहीण यांनी दिवसाचा वेळ वाटून घेतला आणि ऑफिसला जाणं  सुरु केलं.  संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर हॉस्पिटलमध्ये जायचं आवरून  वडलांना जेवण भरवायचं – थोडावेळ बोलायचं – अनेक तक्रारी ऐकायच्या – समजावणूक काढायची सकाळचा चहा नाश्ता त्यांचा आणि माझा करून घरी जाऊन आवरून ऑफिसला जायचं असं टाईट शेड्युल सुरु झालं. ऑफिसला जायला थोडा उशीर होतोय पण सहकारी सांभाळून घेतायत. गेले तीन चार आठवडे हॉस्पिटलमध्ये अनेक चांगले वाईट अनुभव आले – चांगले प्रसंग डॉक्टर- हॉस्पिटल स्टाफ व इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तर वाईट म्हणजे  एवढ्या कालावधीत ओळखीचे झालेले काही रुग्ण डोळ्यासमोर  दगावताना  पाहणं आणि उगाचंच मनात गिल्टी कॉन्शस व्हायला होणं (ऍक्च्युअली त्यांचे नातेवाईक जास्त ओळखीचे झालेले – एकमेकांची दुःखं  शेअर करून ती हलकी होतात – ते अनुभवलं -). या ४ आठवड्यात काही समदुःखी मित्रमंडळी  भेटली, जी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आली होती. त्यातली काही नेहमी भेटणारी तर काही अगदी वीस पंचवीस वर्षांनी भेटली. वडिलांवर उपचार करणारी डॉक्टर तर लहानपणीची मैत्रीण.. उपचाराबरोबरच तिचे आधाराचे बोल होतेच.. इतरही डॉक्टर मित्र मंडळी भेटली.

आणखी एक  गोष्ट म्हणजे कुटुंब एकत्र आलं – नातेवाईक -मित्रमंडळींचे  फोन किंवा येऊन भेटणं झालं.

 – हे भेटणं- बोलणं एरवीही  वेळोवेळी व्हायला हवं असं वाटू लागलं आणि भेटायला येणारे  किंवा आधाराचे शब्द देणारे आपले कोण आणि फक्त  आपले म्हणणारे कोण हेही स्पष्ट झालं. असो प्रत्येकाला आपापले व्याप असतात. बापूंशी (वडील) बरंच   जवळचं  बोलणं – त्यांचं ऐकून घेणं अनेक दिवसांनी झालं – बाहेरचे सगळे कार्यक्रम – काही लग्नं – बाहेरगावच्या व्हिझिट्स – रोटरीचे कार्यक्रम सगळं बंद – मात्र वाचन – मोबाईलवर काही क्लिप्स बघणं – थोडंफार लिहिणं चालू ठेवलं.

हे आजारपण, दुखणं-खुपणं आपल्या प्लॅनिंगमध्ये कधीच नसतं , नाही का?  आजारी माणूस वृध्द असेल तर तो आजारी पडू शकतो याची मनाची तयारी असते, तरुण किंवा कोणत्याही वयातला धडधाकट माणूस आजारी पडला तर  मात्र ते काळजीचं  कारण होऊन बसतं. आजार, आजारपण आणि त्याबरोबरच येणारे वैद्यकीय उपचार व खर्च याचं आपण कसं नियोजन करतो याचा खरोखरंच विचार करायला हवा, हे अनेकदा आपल्याला किंवा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात आपल्याला जाणवतं. तब्बेतीची आणि जीवाची काळजी असली तरी सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर एकवेळ निभावून येता येतं हे आता अनुभवायला मिळालं.

पण ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी काय करायचं ? तेही विदारक दृश्य सामोरं यायचं –  ती पाहतानाच दवाखान्यातच  एक पुस्तक वाचताना  ” लता भगवान करे ” या सत्य घटनेवर आधारित सिनेमाबद्दल वाचलं –  लता करे या पासष्टीच्या महिला आणि त्यांचे पती बुलढाण्याचे रहिवासी –  जमीनदाराच्या शेतात काम राबून आयुष्य काढलेले – आयुष्यभराची कमाई तीन मुलींच्या लग्नात खर्च होऊनही एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास सांभाळून सुखानं  जगणारं  जोडपं. सुख  हे बाह्य संपन्नतेवर अवलंबून नसून मनीच्या समाधानावर आहे हे दाखवणारं जोडपं. अचानक बाईंच्या पतीला गंभीर आजार होतो व तपासण्या करायला शहरात मोठ्या दवाखान्यात जायचा प्रसंग ओढवतो. आसपासच्या लोकांकडून पैसे गोळा करून लताबाई नवऱ्याला घेऊन शहरात मोठ्या दवाखान्यात जातात पण तिथल्या तपासण्या, डॉक्टरांच्या फिया , राहण्या खाण्याचा खर्च कळल्यावर त्या हबकून जातात. हॉटेल मध्ये खायला पैसे नाहीत म्हणल्यावर बाहेर दोन सामोसे घेऊन खाताना सामोसाच्या  पुडक्यावर बाई ” बारामती मॅरेथॉन मध्ये बक्षिसाची भव्य रक्कम” ही जाहिरात पाहतात आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला जाऊन संयोजकांच्या हातापाया पडून   नववारी साडीत – अनवाणी पायानी शर्यतीत सामील होतात – आणि आश्चर्य म्हणजे फक्त नवऱ्याचे प्राण वाचवायचे या एकमेव उद्देशाने – जिवाच्या आकांताने पळून  महागाचे शूज घातलेल्या स्पर्धकांना हरवून मॅरेथॉन जिंकतात व पायांना झालेल्या जखमा विसरून बक्षिसाच्या पैशाने नवऱ्यावरचे उपचार चालू करतात. प्रेम सर्वात श्रेष्ठ हे प्रूव्ह करून दाखवणं यापेक्षा वेगळं काय असतं ? – ही स्पर्धा लताबाईंनी पुढची दोन वर्षही जिंकली एवढं मात्र कळलं की हा नि:स्वार्थीपणा आपल्या माणसाच्या – कुटुंबाच्या प्रेमातून येतो – आपल्या माणसासाठी छोटा मोठा त्याग करायची भावना याच प्रेमातून -निस्वार्थीपणातून निर्माण होते – नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी ते पक्के होण्यासाठीही याचा हातभार लागतो – लताबाईंसारखं मॅरेथॉन पळणं सर्वांना शक्य नाही – त्याची गरजही नाही – पण भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी जवळ असताना – त्या सर्व गोष्टीतून – रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या माणसासाठी फक्त आजारपणातच नाही इतरवेळी ही भावना का जोपासू नये ? आणि या पलीकडे जाऊन आपलं क्षितिज थोडंसं  वाढवून – प्रेम- आत्मीयता- ममत्व बाळगून कुटुंबाबाहेरही इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करायला काय हरकत आहे ?   त्यात किती सुख समाधान मिळेल याची कल्पना ही गोष्ट वाचून आणि ४ आठवडे दवाखान्यात राहून मिळाली – योगायोगानं हेच ” जीवन समजून घेताना ” या गौर गोपाल दास यांच्या पुस्तकात या दिवसांत वाचायला मिळालं . आपलं कुटुंब आपण निवडू शकत नसतो पण आपल्या रूपातून आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबही आपल्याला मिळालेली एक सुंदर भेटच नसते का ?

गेले तीन चार आठवडे असे गेले तरी या सक्तीच्या पण आता काहीश्या भावून गेलेल्या सेवेमुळे एक आंतरिक समाधान मिळाले हे नक्की पाहूया – आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी – डॉक्टर व नर्सेसच्या उपचारांनी – बापूंना  लवकर बरं वाटू दे – आणि आमचं सहजीवन असंच आंतरिक बहरू दे –  आणि इतर सर्व रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीही  हीच भावना व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात आज काय आहे ?

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments