श्री सतीश मोघे

? विविधा ?

केल्याने होत आहे रे… ☆ श्री सतीश मोघे

श्वास, घास आणि ध्यास या तीन गोष्टी ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात. हाती कितीही पैसा असला तरी या गोष्टी घेण्यासाठी नोकर ठेवता येत नाहीत. या गोष्टी ज्याच्या त्याला सहजपणे करता येतील अशी मनुष्यदेहाची रचना विधात्यानेच केली असून त्यासाठी आवश्यक साधने व ऊर्जास्त्रोत या देहाच्याच ठायी देऊन ठेवले आहेत.

छानसा देह, त्यात विविध इंद्रिये आणि त्या प्रत्येक इंद्रियाच्या ठायी एक विशेष शक्ती, असे वरदान विधात्याने मनुष्याला दिले आहे. डोळयांना पाहण्याची, हातांना काम करण्याची, पायाला चालण्याची, कानाला ऐकण्याची अशा रितीने सर्वच अवयवांना विशेष शक्तीचे वरदान देऊन विधात्याने मुनष्य देहाची निर्मिती केली आहे. हे शक्तीचे वरदान देतांनाच या शक्तीचा वापर केला नाही तर ती शक्ती कमी कमी होत जाऊन लयाला जाईल, असा कठोर न्यायही जोडीला ठेवलेला आहे. हा कठोर न्याय अनुभवास यावयाची सुरुवात झाली की लागलीच सावध होऊन, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, या मंत्राची अंमलबजावणी, पुढील शक्तीक्षय थांबविण्यासाठी आवश्यक आहे. ‘काही वर्षापूर्वी मी विहिरीच्या कठडयावर उभा राहून पाणी विहिरीतून काढत होतो, हातात दोन बादल्या घेऊन अर्धा किलोमीटरवरुन पाणी भरत होतो. आता मात्र बाथरुममधली पाण्याने भरलेली बादली इकडून तिकडे करतांनाही कठीण जाते. पूर्वी मी तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जात होतो. आता पाच मिनिटे चाललो तरी दम लागतो’,   ही आणि असेच साधर्म्य असलेली वाक्ये आपण आपल्या बाबतीत म्हणत असतो वा दुसऱ्यांकडून त्यांचा अनुभव म्हणून ऐकत असतो. इंद्रियांच्या शक्तींचा वापर न केल्याने त्यांची शक्ती कमी होण्याचा कठोर न्याय यात झालेला असतो. हा कठोर न्याय होणे टाळायचे असल्यास, कष्ट करणे आणि त्यासाठी इंद्रियांना कृतीत व्यग्र ठेवणे आवश्यक आहे.

इंद्रियांना शक्ती देतांना तिचा वापर करणे अनिवार्य होईल, अशी परिस्थीती खरे तर विधात्याने निर्माण करून ठेवलेलीच आहे. माणसाला भूक दिली. भूकेसाठी अन्न मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी उदनिर्वाहाचे साधन आले. त्यासाठी पायपीट आली, काम करणे आले. ‘उदरभरणाची व्यथा, बसली सर्वांच्या माथा’, असे प्रत्येकाचे करून,प्रत्येकाला  कृती करणे अनिवार्य करून ठेवले आहे. जोडीला चांगली वस्त्रं, चांगाला निवारा, चांगले शिक्षण यांचा ध्यास लावल्याने यासाठी अधिक अर्थार्जन व अधिक अर्थाजनासाठी अधिक कष्ट या कर्मचक्रात विधात्याने माणसाला सहजपणे गुंतवून ठेवले आहे. प्राण्यांना, वृक्षांना जसे ऋतुचक्राशी जुळवून घ्यावे लागते, तसेच माणसालाही या कर्मचक्राशी जुळवून घेणे भाग आहे. हे प्रत्येकाने ओळखून कर्म करत राहिले पाहिजे.

मूठभर गर्भश्रीमंत व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आधी कष्टाच्या वेदना व भविष्यात सुख असाच प्रवास होतो. गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्यांनाही आहे ते टिकविण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. ‘खूप आहे’ म्हणून, काही न करता आळसाचे सुख घेणाऱ्या व्यक्तींचा भविष्यकाळ वेदनादायी असतो. अनेक श्रीमंत व्यक्ती यथायोग्य कष्ट न घेतल्याने देशोधडीला लागल्याचेही आपण पहातो. हे देशोधडीला लागणे आर्थिक दृष्टीने असते तसेच ते शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनेही असते.

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने देशोधडीला लागणे हे बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या सुबत्ता आल्याने होते. बुद्धीच्या वापरातून समृद्धी निर्माण करायची आणि आपणच निर्माण केलेल्या या समृद्धीच्या कोशात गुदमरून जायचे, असेच घडताना हल्ली दिसते. भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असली तरी त्यांचा उपभोग घेण्यासाठी देह, इंद्रिय धडधाकड हवीत. देहइंद्रिये आर्थिक सुबत्तेने नाही तर शरीरश्रमानेच धडधाकट, बलवान राहतात. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला   शरीरसौष्ठव टिकविण्याठी शरीरश्रम आवश्यक आहेत.

वीरशैव तत्वज्ञानाचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांनी यासाठीच शरीरश्रमाचा गौरव करणारा मंत्र मानवजातीला दिला. ‘कायक वे कैलास’. ‘कायक’ म्हणजे कायेने (देहाने) केलेले काम. हाच ईश्वर. प्रत्येकानेच जमेल तेव्हढे शारीरिक श्रम हे केलेच पाहिजेत. यामुळे इंद्रियांची शक्ती अबाधित राहते आणि त्या शारीरिक श्रमात स्वत: त्यातील काठिण्य, कष्ट अनुभवल्याने, कष्ट करणाऱ्या इतर माणसांचेही मूल्य आपल्याला जाणवते. नकळत त्यांच्याविषयीचा आपला आदर वाढतो. स्वयंपाक, धुणे-भांडी करणाऱ्या मावशी आल्या नाहीत की आपण ते काम जेव्हा करतो, तेव्हा त्यांच्या कष्टाचे मोल जाणवते. यासाठी ..’आधी केलेच पाहिजे’.

जीविकेसाठी आणि शरीरस्वास्थ्यासाठी कष्ट अनिवार्य आहे, ही बाब प्रत्येकालाच ज्ञात असते. तरीही बरेच जण या दोन्ही गोष्टींसाठी कष्ट घेणे किंवा त्यापैकी एका गोष्टीसाठी कष्ट घेणे टाळत असल्याचे दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेतला तर कंटाळा, आळस, थकवा ही कारणे आढळतात. यात ‘कंटाळा येणे’ हा सहज स्वभावधर्म आहे. पण ‘कंटाळा करणे’ हा इच्छाशक्तीचा आलेख खाली आल्याने आळसाकडे झुकणारा नकारात्मक प्रवास आहे. एकच एक काम करायला लागणे, इच्छा नसताना एखादे काम करावे लागणे, गुंतागुंतीची, आकडेमोडीची कामे करावी लागणे यामुळे कंटाळा येऊ शकतो. ढगाळ वातावरण, वीज गेलेली असणे व त्यामुळे होणारा असह्य उकाडा यामुळेही कंटाळा येऊ शकतो. कंटाळा हा प्रकृती

स्वभावधर्मावर अवलंबून असतो. तो प्रत्येकालाच येतो. माणसांचा येतो, जागेचा येतो, नोकरीचा येतो, पावसाचा येतो. अशा अनेक गोष्टींचा कंटाळा येतो. प्रकृती स्वभावाने असा कंटाळा आला, तरी सर्वसाधारण विवेकी माणूस परिस्थितीचा अंदाज घेऊन ‘कंटाळा करायचा’आणि स्वस्थ बसायचे की कंटाळ्यावर मात करून ती गोष्ट पुर्तीस न्यायची, याचा निर्णय घेत असतो.

नेमून दिलेले काम कालमर्यादेत करावयाचे काम असेल आणि ते वेळेत केले नाही तर आर्थिक दंड वा नुकसान होणार असेल तर माणूस कंटाळ्यावर मात करतो. आपला प्रकृती स्वभाव बाजूला ठेवतो आणि काम तडीस नेतो. पण विवेकाची जागा आळसाच्या तात्कालिक सुखाने घेतली तर मात्र तो कंटाळा येताच ‘कंटाळा करतो’. ‘आळसे काम नासते’, असे होऊन कामात आणि त्याच्या सुखात विघ्ने येतात. अशी माणसे खरे तर व्यवसाय, नोकरी वा कुटुंब यात अडसर आणि बोजाच. व्यक्ती म्हणून त्या चांगल्या असतील व कृतिशून्यते मागच्या त्यांच्या मानसिक स्थितीशी संबंधित कारणे समर्थनीय असतील, तर बऱ्याचदा तिथे अन्य सदस्य त्यांचा भार स्वतः उचलून, त्यांची कामे करताना दिसतात. कामे तडीस जातात. पण यात कोणालाच मनापासून आनंद नसतो. एकाला निष्क्रियतेच्या जाणिवेने नैराश्य. तर दुसऱ्याला जादा भाराच्या वेदना. हे टाळण्यासाठी ‘कंटाळा आला’ तरी ‘कंटाळा करून’ चालणार नाही, अशी कर्तव्याची जाणीव स्वतःला करून देऊन नियोजित कामे करत राहिली पाहिजे.

शारीरिक श्रमात ‘थकवा’, ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक ऐपत आणि शारीरिक कुवत यांची जाणीव प्रत्येकालाच असते. त्यापलीकडे जाऊन काही करण्यापूर्वी विचार करायला हवा. देह कष्टविण्यासाठीच आहे, उपजीविकेसाठी अर्थार्जन आवश्यक व अर्थार्जनासाठी काम करत राहणे आवश्यक, हे जरी खरे असले तरी आवश्यक गोष्टी कोणत्या व किती? अर्थार्जन किती आवश्यक ? व त्यासाठी देहाला कुवती बाहेर पळवायचे का? कुवतीबाहेर ओझे उचलायला लावायचे का? याचाही विचार करायला हवा. व्याप हा, आवश्यक तेवढाच व त्याच मर्यादेत हवा. व्याप आहे म्हणून तो सारण्यासाठी कृतिशीलता आहे. कृतिशीलतेचा रियाझ हा कर्तृत्वाला गती देत असला तरी तो आपल्याला झेपणाऱ्या सुरात हवा, झेपेल एवढाच हवा. ‘आळस’ हा जसा शत्रू तसेच ‘अतिश्रम’ हाही शत्रूच. रात्र विश्रांतीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी असते. आपण रात्रीचा दिवस करतो, तेव्हा नकळत शरीर स्वास्थ्य गहाण टाकून रात्री कडून वेळ उसना घेत असतो. ही उसनवारी टाळली पाहिजे. अंगावर वस्त्र असतात इतपतच व्याप हवा. वस्त्रावर पुन्हा दुसरे वस्त्र चढवणे, म्हणजे व्याप नको तेवढा वाढवणे. क्षमतेबाहेर हा व्याप वाढला की अस्वस्थ वाटायला, गुदमरायला सुरुवात झालीच म्हणून समजा.

स्वभावधर्मानुसार कंटाळा, आळस आला तरी अर्थार्जनाची निकड म्हणून नियोजित काम करणे आवश्यक असेल तर आळस झटकून ते काम करण्यासाठी… अर्थार्जनाची निकड तेवढीशी नसली तरी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक त्या किमान कृती करण्यासाठी ‘ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, याची जाणीव जागे करणारे  अलार्मचे घड्याळ नेहमी उशाशी हवे.

त्याचवेळी अवाजवी स्वप्ने आणि त्यासाठी क्षमतेबाहेरचे कष्ट होत असतील, तर ते थांबवून योग्य दिशा दाखवणारे संयमाचे होकायंत्रही नेहमी जवळ हवे. हे दोन्ही सोबत असले की ‘केल्याने होत आहे रे..’ याची, सारखी आठवण करून द्यावी लागत नाही. कृतिशीलतेचा रियाझ योग्य पद्धतीने होतो आणि जीवन गाणे अधिकाधिक रंगत जाते.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments