सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
सध्याचं प्रत्येकाचं जीवनमान हे खूप धकाधकीचे, घाईगडबडीचे झाले आहे.पर्यायाने ते कसल्यातरी तणावाचे पण झाले आहे.आपल्या नित्य दैनंदिन कामकाजात आपण खूप लोकांशी संवाद साधतो.त्या संवादातून, जवळीकेतून कधी मदतीच्या भावनेने आपली कामे इतरांकडून करुन घेतो वा आपण इतरांची कामे करुन देतो.हे सगळं आपण करतो खरं पण अजूनही आपल्याला पूर्णत्वाचा,संतोषाचा, समाधानाचा कळसोध्याय हा पूर्णच झाल्या नसल्याचे उमगते.आणि मग कारणं शोधतांना एक महत्वाचे कारण सापडते तो म्हणजे आपल्या आतील मनाचा आवाज ऐकण्याचा अभाव.आपले अंतर्मन नेहमी आपल्याला ज्या हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी सांगतं त्या खुणावणा-या गोष्टींकडं आपण कधी गरज म्हणून तर कधी संकोच म्हणून, कधी आडमुठेपणा तर कधी संस्कारांचा पगडा म्हणून चक्क कानाडोळा करतो. ह्याचे परिणाम लगेच दिसतं नसले तरी मनावर खोल दूरगामी उमटतं असतात.त्यामुळे सगळं हातातच असून वाळू निसटल्यागतं सारखा गमावल्याचा भास होतो आणि हा भासच आपल्याला आनंदी राहण्यापासून वंचित ठेवत़ो.हा विचार करतांना ह्या मला सुचलेल्या काही ओळी खालीलप्रमाणे………
कधी कधी मज रहावे वाटते एकटे,
स्वतःच स्वतःशी बोलावे वाटते नीटसे,
डोकवावे वाटते कधी स्वतःच्याच अंतरी,
कधीतरी न दाबता खंत करावी मोकळी ।।।
*
श्वास घ्यावा मोकळा,दडपण हे संपवावे,
ऊत्तरायणातील दिवस हे मनासारखे जगावे,
सताड उघडोनी कवाडे,स्वातंत्र्याचे वारे प्यावे,
सल मनीचा तो काढून,मुक्तमनाने बागडावे।।।
*
सगळ्यांचा विचार करतांना फार न त्यात गुंतावे,
जखम मनीची ओळखून त्यावर हलकेच फुंकावे,
आपल्यांना साभाळतांना कधी स्वतःलाही जपावे,
नुसतेच झोकून देतांना,”मी”चे महत्व पण जाणावे।।
*
काय हवे हो नेमके मनी एकदातरी पुसावे,
इतरांसाठी जगतांना थोडे आपल्यासाठी पण जगावे,
सगळ्यांना देता देता आपुले न निसटू द्यावे,
झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे
झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे।।
*
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈