सौ. ज्योती कुळकर्णी
🌸 विविधा 🌸
☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
कृष्णा! तू अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितलीस आणि त्याचा मोह दूर केला व युद्धासाठी प्रवृत्त केलंस. कशाला रे! त्याने तर तुला म्हंटलं होतं नं? मला राज्यही नको व राज्याचा उपभोगही नको! मग तुला का सांगावसं वाटलं “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः।” अन्याय सहन करण्याचा पायंडा पडायला नको. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, म्हणूनच नं!
आमची पुण्यभू ‘भारतमाता’ अजूनही आम्हाला प्रियच आहे. पण आमच्यात अजूनही हिंमत आलेली नाही की कुणी धर्माचं नाव सांगून आमच्यावर अत्याचार करत असेल तर आमच्याही धर्मातच कृष्णानी सांगून ठेवलंय की अन्याय झाला तर प्रतिकाराला सज्ज रहा म्हणून! तसेच कुठलाही दाखला, आवश्यक कागदपत्र मिळविण्यासारख्या छोट्या छोट्या हक्काच्या गोष्टींपासून लाच देत रहातो आम्ही, अन्याय सहन करत रहातो आम्ही. काही वाटेनासं झालंय आम्हाला त्याचं!
अर्जुनाच्या मिषाने आम्हाला पण सांगितलं आहेस तू; “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” पण तुला दैवत मानतांनाही कानाडोळाच करतो आम्ही त्याच्याकडे! लोकांचं राज्य आहे म्हणतांनाही आम्हाला मनासारखं ‘खातं’ मिळालं नाही तरी सिंहासन गदागदा हलवतच रहातो आम्ही! आम्हाला पाहिजे ते खातं मिळवून, त्याचं फळ स्वतः खाऊन मुलाबाळांसाठीही राखून ठेवायचंय नं! माखनचोर कृष्णाची दहिहंडी पहा किती उत्साहात साजरी करतो आम्ही?पण अहमहमिका पहा कशाची सुरूं आहे!तू माखनचोरीचा पायंडा घातला कशासाठी?सगळ्या गोरगरीब मुलांना ते माखन मिळून राष्ट्रकार्यासाठी त्यांचं पालनपोषण योग्य व्हावं व समान वाटप व्हावं म्हणून!आम्ही मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायलाही सज्ज आहोत! कुणाकुणाला कौरवांसारखी शिक्षा होते, ते मात्र आम्हाला कधीच कळत नाही. आमचे आजचे गुरूकुलंही भ्रष्टाचारात मागे नाहीत बरं!
दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या द्रौपदीला वस्त्र पुरवायला तू तातडीने धावून गेलास. आज कितीतरी ‘द्रौपदी’ उद्ध्वस्त होतांना दिसताहेत. भर सभेत मान खाली घातलेले तिचे पती, तिचा मान राखायलाही पुढे सरसावले होते नंतर. तिचे पातिव्रत्य नाही नाकारले त्यांनी! आज मात्र अशा अन्याय झालेल्या ‘स्त्री’लाच खाली मान घालून जगावे लागते. नाहीतर ‘अरुणा शानबाग’सारखं उद्ध्वस्त होऊन जगावे लागते तिला.
अशा कितीतरी गोष्टी आहेत रे कृष्णा! पण तू म्हंटलं आहेस नं!
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।”
मग आम्ही सारे अर्जुन झालो आहोत आणि तुझा जन्मोत्सव साजरा करतोय दरवर्षी. तू जन्म घ्यायची वाट बघत बसलो आहोत. दंग मात्र उत्सव साजरा करण्यातच आहोत. अरे बाबा, तू कृष्ण भगवान म्हणून ज्याच्या पाठीशी उभा राहिलास, ज्याला लढायला प्रोत्साहित केलेस, त्या अर्जुनाच्या अंगात लढण्याची धमक होती. पण आज एखादा कृष्ण उभा राहिला तर त्याला चहूं बाजूंनी घेरून नामोहरम कसे करायचे याची अहमहमिका लागली असते आमच्यात! त्यासाठी आम्ही सारे अर्जुन एक होतो. कारण तुझ्या दहिहंडीतून बाहेर आलेलं दही दुसर्या कोणाला घेऊ द्यायचे नसते नं आम्हाला!
त्यापेक्षा आता तू असंच कर!आम्हाला सगळ्यांनाच ठणकावून सांग!”धर्माला ग्लानि यायला तुम्ही सगळ्यांनी हातभार लावायचा. अन मी येऊन धर्माची संस्थापना केल्यानंतर तुम्ही परत गोंधळ घालायचा का? माझ्या एकट्यावर जबाबदारी का टाकता?घ्या सगळेच आपापल्या वाट्याचा जबाबदारीचा हिस्सा! सगळ्यांच्याच अंतःकरणात कृष्ण जन्म घेऊ द्या! मग कृष्ण जन्म घेण्याची तुम्हालाच ‘युगे युगे’ वाट बघावी लागणार नाही. “
कृष्णा तू खरंच असे ठणकावून सांग! आणि हो, या सगळ्यांमध्ये मी पण आहे बरं का? मी तरी कुठे काय करत असते?
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈