सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नम:  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुखकर्ता, दु:खहर्ता श्री गणेश म्हणजे, प्राचीन काळापासूनचे हिंदू-धर्मीयांचे आराध्य दैवत. कोणत्याही देवतेचे पूजन करण्याआधी किंवा शुभकार्यास सुरुवात करण्याआधी श्रीगणेशाचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही मोठ्या श्रध्देने पाळली जाते. दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हे दहा दिवस, घरोघरी, गणरायाच्या मातीच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करून, तिची स्वतंत्र पूजा-अर्चा करण्याची प्रथाही गेली कित्येक वर्षे अखंडपणे पाळली जाते आहे. गणपती खरोखरच आपल्या घरी मुक्कामाला आले आहेत असे समजून, सारे घर, सारे वातावरणच त्यावेळी आनंदमय, चैतन्यमय होऊन जाते.

या घरगुती आनंदोत्सवाला, सार्वजनिक उत्सवाचे रूप द्यावे हा विचार सर्वप्रथम, स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी केला. तो काळ पारतंत्र्याचा होता. सारा देशच त्यात भरडला जात होता. ब्रिटिश सत्तेच्या जुलुमाविरुध्द आवाज उठवलाच पाहिजे म्हणून टिळकांसारख्या साहसी व देशप्रेमी व्यक्ती निर्धाराने सज्ज झाल्या होत्या. एवढ्या ताकदवान सत्तेविरुद्ध लढणाऱ्यांची ताकदही तितकीच जोरकस हवी हे जाणून, त्या दृष्टीने, समाजातील सर्व थरांतील लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात एकजूट निर्माण करणे, आणि त्या माध्यमातून ती परकीय राजवट उलथवून टाकणे सर्वप्रथम गरजेचे होते, हे लोकमान्यांना तीव्रतेने जाणवले. पण उघड उघड असे लोकांना गोळा करणे म्हणजे सरकारी रोष ओढवून घेणेच होते. म्हणूनच अत्यंत तल्लख बुध्दिमत्ता लाभलेल्या लोकमान्यांनी, देवाच्या नावाखाली समाजाला एकत्र आणता येईल, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांचे प्रबोधन करता येईल, हा एक अचूक विचार केला व तोपर्यंत घरगुतीपणे साजरा होणारा गणेशोत्सव, सार्वजनिकपणे साजरा करण्याची नामी युक्ती शोधून काढली. समाजातल्या प्रत्येक घटकाने त्यानिमित्त एकत्र यावे, जातीभेद विसरून, एकोप्याने, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जनतेचे त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, व स्वातंत्र्याच्या विचाराचे लोण आपसूकच मना-मनांमध्ये पसरून, सर्वांनी मिळून पारतंत्र्याविरुध्द एकजुटीने आवाज उठवावा, असा लोकमान्यांचा यामागचा विचार व उद्देश होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभर अनेक दिशांनी प्रयत्न केले जात होते. महाराष्ट्रात लोकमान्यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला असाच एक प्रयत्न होता. स्वातंत्र्याबाबत प्रबोधन करणारे अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अशा उत्सवातून, सरकारला अजिबात शंका येणार नाही, याची व्यवस्थित काळजी घेत राबवले जाऊ लागले. आणि “स्वातंत्र्य” ही संकल्पनाच नव्याने माहिती झालेल्या अनेक देशवासियांसाठी ते अत्यंत प्रेरणादायक ठरू लागले…

यथावकाश भारताला स्वातंत्र्य मिळाले, लोकांचे स्वत:चे राज्य आले, तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपली गेली. काही वर्षे खरोखरच खूप साधेपणाने, सोज्वळपणे हा उत्सव साजरा होत राहिला. त्यानिमित्ताने, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला यांचा आस्वाद सर्वसामान्यांनाही घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सार्वजनिक असूनही घरगुती वाटावा, अशा पावित्र्याने साजरा केला जाणारा, शब्दश: सर्वांचा, सर्वांसाठी असणारा हा उत्सव आहे असेच तेव्हा वाटत असे…

अर्थात सर्व सजग आणि सूज्ञ नागरिक हे सर्व काही जाणतातच.

पण स्वातंत्र्याचा परिपाक स्वैराचारात झाल्याचे अनेक सार्वजनिक क्षेत्रात जसे ठळकपणे दिसू लागले, तसे त्याचे पडसाद गणेशोत्सवावरही उमटू लागले अणि पहाता पहाता या सार्वजनिक उत्सवातले पावित्र्य, साधेपणा व आपलेपणाही हरवू लागल्याचे चित्र ठळकपणे दिसू लागले. ‘नको हा उत्सव’ असे वाटायला लावणारे त्याचे सध्याचे अनिष्ट रूप सूज्ञांना विचारात पाडणारे असेच आहे. सामाजिक भान ठेवून या निमित्ताने रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबवणाऱ्या काही मोजक्याच मंडळांचा अपवाद वगळता, गणेशोत्सव म्हणजे धुडगूस, लोकांकडून बहुदा जबरदस्तीनेच गोळा केलेल्या ‘वर्गणी’ ची मूठभर लोकांकडून मनमानी उधळपट्टी, समाजहिताचा निर्लज्ज विसर, दुर्मिळ विजेची अनावश्यक व वारेमाप नासाडी, बेधुंदीसाठी नशेचा राजरोस वापर, आवाज, प्रकाश, धूळ यांचे प्रचंड प्रदूषण, त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या हालांकडे सोईस्कर दुर्लक्ष, असे सर्वच आघाड्यांवरचे भेसूर चित्र पाहून, खरोखरच हतबल झाल्यासारखे वाटते. “ चला.. गणपती आले … आता जरा enjoy करू या “ एवढ्या एकाच उद्देशाने आता लोक गणपती ‘ बघायला’ मुलाबाळांसह आवर्जून बाहेर पडतांना दिसतात …आणि “ सार्वजनिकता “ या शब्दाचा मूळ अर्थच पार पुसला गेला आहे हे ठळकपणे जाणवते. लोकांच्या ‘एकत्र’ येण्याचा असा विघातक अर्थ आणि वापर, विचार करू शकणा-या सर्वांनाच खरोखरच अस्वस्थ करतो. या सगळ्या अनिष्ट आणि पूर्णतः अनावश्यक गोष्टींचा आपल्या मुलांवर तितकाच अनिष्ट आणि नकोसा असा विपरीत परिणाम नकळत होतो आहे, हे हल्लीच्या ‘शिकलेल्या’ पालकांच्या ध्यानीमनीही नसते ही खरोखरच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.

खरे तर, लोकमान्यांच्या मनातला सार्वजनिक गणेशोत्सवामागचा उद्देश आणि या उत्सवाचे आत्ताचे बीभत्स स्वरूप यातली ही प्रचंड तफावत पाहिली, की ‘ हे पाहण्यास लोकमान्य इथे नाहीत ते बरेच आहे ’ असे वाटल्याशिवाय रहात नाही… आणि असेही खात्रीने वाटते की ते असते, तर ज्या करारीपणाने, धडाडीने आणि देशाच्या तेव्हाच्या परिस्थितीत अतिशय दूरदर्शी अशा विचाराने त्यांनी हा उत्सव सुरू केला होता, तितक्याच.. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त करारीपणाने त्यांनी हा उत्सव बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असते….. अर्थात सतत बदलणारा काळ, प्रत्येक क्षेत्रात अकारण लुडबूड करणारे- स्वार्थाने बरबटलेले ‘ स्वदेशाचे राजकारण (?) ‘, आणि विचार करू शकणाऱ्या प्रत्येक जागरूक पण हतबल, आणि ‘ पण मी एकटा काय करू शकणार ? ‘ असा नाईलाजाने विचार कराव्या लागणाऱ्या नागरिकाला चिंतेत पाडणारी भरकटलेली.. दिशा चुकलेली सामाजिक मानसिकता – या सध्याच्या दारुण आणि दुर्दैवी परिस्थितीत लोकमान्यांना तरी हे काम आधीच्या सहजतेने करणे शक्य झाले असते का.. किंबहुना ( with due respect ) शक्य तरी झाले असते का ? — हा प्रश्न नक्कीच पडतो… वाऱ्याबरोबर तोंड फिरवणारे so called मुत्सद्दी राजकारणीच त्यांना असं करूच देणार नाहीत असं खात्रीने म्हणावसं वाटतं.

तसंही हा उत्सव आता खऱ्या अभिप्रेत अर्थाने “ सार्वजनिक “ राहिला आहे असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलण्यासारखंच आहे. सामाजिक मानसिकता जराशी तरी बदलू शकेल अशी शक्यता निर्माण करू शकणारा ‘ एक गाव एक गणपती ‘ हा साधा सोपा मार्ग सुद्धा हल्लीच्या तथाकथित दादा-भाऊ-अण्णा-काका-साहेब अशी ‘बिरुदं’ स्वतःच स्वतःला चिटकवणाऱ्या नेत्यांनाच विचारातही घ्यावासा वाटत नाही हे समाजाचे कमालीचे दुर्दैव आहे. आणि त्याची कारणे आता सगळा समाजच जाणतो.. पण.. पण तसे जाहीरपणे बेधडक बोलण्याची हिम्मत असणारा आणि त्याविरोधात लढण्यासाठी स्वतः सज्ज झालेला एकही अध्वर्यू “ लोकमान्य “ स्वातंत्र्योत्तर काळात उदयाला आलेला नाही हेच तर या देशाचे अतीव दुर्दैव आहे.

फक्त सार्वजनिकच नाही, तर घरगुती गणेशोत्सवातही काळानुरूप खूपच फरक पडलेला दिसतो. पूर्वीची एकत्र कुटुंबे विभक्त झाली, घरातल्या स्त्रीला अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागले. या सर्वांचा अटळ असा परिणाम, घरगुती गणेशोत्सवावरही अपरिहार्यपणे झालेला दिसतो. जगण्यासाठीची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत असतांना, एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करण्यातला निखळ आनंद, त्यानिमित्ताने सर्वांनीच एकमेकांना अधिक जाणून घेणे, एकमेकातले आपलेपणाचे बॉंडिंग नकळत वाढवणे, जबाबदारी वाटून घेणे आणि ती पेलण्यास उत्सुक होणे, आणि यातून निर्माण होणारी प्रसन्नता एकत्र साजरी करणे, हे सगळेच आता कुठेतरी हरवल्यासारखे.. खरं तर लोप पावल्यासारखे वाटते आहे.

घड्याळाचे गुलाम झाल्यावर, गणपतीसाठीही आता मोजून मापूनच वेळ उपलब्ध असतो, व तेवढ्याच वेळात या उत्सवाचे सर्व सोपस्कार बसवावे लागतात, ही अपरिहार्य म्हणावी अशी जीवनशैली बहुतेकांना बहुदा मनाविरूध्द स्वीकारावी लागलेली आहे. आणि हळूहळू ती अंगवळणीही पडलेली आहे. मग एकाच गावातले दोन भाऊ, गणपतीला एकमेकांकडे चार दिवस का होईना निवांत भेटतील, एकत्रपणे साग्रसंगीत पूजा-प्रार्थना करतील, घरीच हौसेने बनवलेल्या विविध नैवैद्यांवर ताव मारतील, आणि अगदी मनापासून या उत्सवात रममाण होतील, हे चित्र स्वप्नवत वाटू लागल्यास नवल नाही, आणि यात कुणाचीच, अगदी कळत-नकळत चूकही नाही, असे आजकाल अगदी प्रांजळपणे वाटत रहाते… तरीपण.. अगदीच न सोडवता येण्याइतका हा प्रश्न जटिल आहे का ?.. या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारार्थी असायला हवे… यात अडचण फक्त एकच —- “ मी.. आणि माझे.. “ ही फक्त शरीरानेच नाही तर मनानेही मनापासून विभक्त करायला लावणारी ‘ आधुनिक ‘ आणि so called अत्यावश्यक मानली जाऊ लागलेली व्यक्तिगत मानसिकता… जी खरोखरच चिंताजनक आहे…. मग सामाजिक मानसिकतेचा विचारही सहज वेड्यात काढता येण्यासारखा…. ‘ असो ‘.. एवढेच एखादा सुजाण आणि दूरदर्शी असणारा माणूस म्हणू शकतो नाही का ?…. तर “ असो “.

पण.. पण … नुकत्याच दोन आशादायक आणि आनंददायक बातम्या कळल्या आहेत त्या अशा की…….

१ ) नुकताच अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा जोरदार कार्यक्रम पार पडला. त्यातली एक हंडी होती पुण्यातल्या मंडईजवळ असलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर बांधलेली – नेहेमीसारखीच – पण या वर्षी विशेषत्वाने सांगायलाच हवा असा बदल म्हणजे त्या परिसरातल्या चक्क ३५ मंडळांनी एकत्र येऊन एकच हंडी बांधली होती …. आणि हा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला होता. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्ट या मानाच्याच मंडळाच्या पुनीत बालन नावाच्या तरुणाने यासाठी पुढाकार घेतला होता आणि अंधारलेल्या सामाजिक मानसिकतेला आशेच्या उजेडाचा एक कोवळा कोंब फुटल्याची आनंददायक जाणीव झाली.

२ ) दुसरी बातमी गणेशोत्सवाची. कसबा गणपती हे पुण्याचे आराध्यदैवत, आणि देवस्थानाचा गणपती हा उत्सवातील मानाचा गणपती. तरी त्या चिंचोळ्या आणि गजबजलेल्या कसबा पेठेत गल्लोगल्ली अनेक मंडळे त्यांचा स्वतंत्र उत्सव साजरा करत होते आणि रहिवाशांना मुकाट त्रास सहन करावा लागत होता. पण या वर्षी देवस्थानाने असा प्रस्ताव मांडला आहे की संपूर्ण कसबा पेठेचा मिळून एकच सार्वजनिक गणपती बसवायचा आणि सहभागी प्रत्येक मंडळाने, त्यांनी गोळा केलेल्या वर्गणीतून एकेक दिवस आरतीचे सर्व नियोजन … सर्व खर्च सांभाळायचा…. आणि तिथल्या इतर सगळ्या मंडळांनी ह्या प्रस्तावाला चक्क मान्यता दिलेली आहे असे समजते. ….

‘सारासार आणि सामूहिक विचार उत्तम काम करायला उद्युक्त करतो ‘.. हा लोकमान्यांचा महत्वाचा विचार आणि उद्देश पुन्हा असा नव्या मार्गाने नव्या प्रकारे रुजू लागला तर त्यापरता दुसरा आनंद तो कोणता ?

… यावर्षी सुखकर्ता दु:खहर्ता या आरतीबरोबरच ‘आता हा नवा सकारात्मक विचार समाजात पक्का रुजू दे.. फुलू दे फळू दे.. ‘ ही प्रार्थना मनापासून करत गणपतीला नमस्कार करता करता, आपण त्या जोडीने असेही आवर्जून म्हणू की- ‘‘कालाय तस्मै नम:”

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments