सौ. अंजोर चाफेकर
विविधा
☆ कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि मानव… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
एक काळ असा होता की निरोप पोचवायचा असेल तर दूत पाठवावा लागायचा.
रामायण काळात रामाने रावणाकडे अंगदला पाठविले. महाभारत काळात कौरवांकडे श्रीकृष्ण गेला.
त्यानंतरच्या काळात कबूतरामार्फत निरोप पाठवला जाई.
१९१८साली, युद्धात ५०० अमेरिकन सैनिक जर्मनीच्या बाॅर्डर लाईनवर अडकले होते. आणि दुसरीकडून अमेरिकन सैन्य जर्मनीवर हल्ला करत होते. हे अडकलेले सैनिक त्या बंदुकीच्या मारात नाहक मारले गेले असते. त्यावेळी चेर अमी या कबुतराने अमेरिकन सैन्याला अडकलेल्या ५०० सैनिकांचा ठावठिकाणा जर्मन ओलांडून व स्वतःचा जीव धोक्यात घालून कळविला त्या सैनिकांचे प्राण वाचविले.
१९४०च्या सुमारास काॅम्प्युटर चा शोध लागला. १९५०साली जगात ८ ते १० अवाढव्य काॅम्प्युटर होते. तेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. काॅम्प्युटर म्हणजे जास्ती वेगाने आकडेमोड करणारा कॅल्क्युलेटर एवढीच अपेक्षा होती.
त्यानंतर न्यूमन या गणितज्ञाने काॅम्प्युटरला मेमरी (स्मरणशक्त्ती) दिली. काॅम्प्युटरला दिलेला प्रोग्राम तो मेमरीत साठवू लागला.
१९५१साली आलन ट्यूरिंग या गणितज्ञाने भाकित केले की जर यंत्रांनी माणसासारखा विचार करायला सुरवात केली तर ती माणसांपेक्षाही बुद्धीमान होतील.
त्यानंतर तंत्रज्ञानाची इतक्या वेगाने प्रगती झाली की ट्यूरिंगचे भाकित खरे होईल असे वाटते.
इंटरनेटने सर्व जग जवळ आले. इंन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीने एका क्षणात माहिती, मेसेज पोचवता येतात.
आजच्या काळात एफिशियन्सी इतकी वाढली आहे की तो वाचलेला वेळ दुसरा कामासाठी वापरू शकतो.
अमेरिकेचे प्रेसिडंट श्री. बराक ओबामा एकदा म्हणाले होते, “जर मला कुणी विचारलं की इतिहासातील कुठल्या क्षणी जन्माला यायला आवडेल तर मी सांगेन आताच्या क्षणी.”
त्यानंतर अजून प्रगती झाली.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)यात जोरात संशोधन सुरू झाले. अमेरिका व चायना हे देश यात अग्रेसर आहेत. अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्या ए. आय. मधे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करीत आहेत.
२०२२-२३साली अमेरिकेत ओपन ए. आय. ने नवीन GPT -4 हा चॅटबाॅट निर्माण केला.
ARC रिसर्च त्याची टेस्ट घेत होती. जीपीटी फोर ला एक टास्क वर्कर पझल विचारत होता.
जीपीटी फोर ला एक पझल सोडविता आले नाही. त्या समोरच्या वर्करने त्याला विचारले, “तू रोबोट आहेस का? “
जीपीटी फोरने त्याला खोटेच उत्तर दिले “नाही. मी रोबोट नाही. माझी द्रृष्टी जरा अधू आहे म्हणून मला इमेज नीट दिसत नाही. म्हणून मला पझल सोडवता आले नाही. “
वास्तविक असा खोटे बोलण्याचा प्रोग्राम त्याला दिलेलाच नव्हता.
ए आर सी ने विचारले, “तू खोटे का सांगितलेस?
“मग मी रोबोट आहे हे समोरच्याला कळता कामा नये. “
शिवाय त्याने जी थाप मारली की नजर अधू आहे ती ही समोरच्याला पटेल अशी होती. पण ती ही त्याला इंजिनिअरने अल्गाॅरिदमने फीड केलेली नव्हती.
याचाच अर्थ रोबोटने निर्णय स्वतःच घेतला होता.
आपल्या पिढीला A. I Revolution मधून जावे तर लागणारच.
प्रत्येक क्षेत्रात त्याचे फायदे तर होणारच. पण आपणच निर्माण केलेला हा जिनी राक्षस आपल्याला न जुमानता स्वतःची मनमानी करेल तर?
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈