☆  विविधा ☆ कवतिक ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

“स्तुति: कस्य न प्रिय:?” असे कुणीतरी थोर व्यक्तीने म्हणून ठेवले आहे. किती सार्थ आहे हे! आपण एखादे प्रशंसनीय, अभिमानास्पद काम करावे आणि त्याची दखल आपल्या आजूबाजूच्या कुणी तरी घ्यावी ह्याइतकी सुखद दुसरी जाणीव कोणतीच नसावी, नाही का? त्यातही कवतिकाचे बोल ऐकवणारी व्यक्ती जर आपल्या जवळची, प्रियजनांपैकी असेल तर काय मग “सोने पे सुहागा!”?

दुसर्‍या कोणीतरी आपले कवतिक करावे, स्तुती करावी, प्रशंसा करावी ही प्रत्येक मानवाची सुप्त आंतरिक इच्छा असतेच. उदा. प्रेक्षकांनी आपल्या अभिनयाची प्रशंसा करावी ही अभिनेत्यांची, श्रोत्यांनी-परीक्षकांनी तोंडभरून दाद द्यावी ही गायकाची, गुरुजींनी शाबासकी द्यावी अशी विद्यार्थ्याची, मालकाने ‘अर्थ’पूर्ण कवतिक करावे, ही नोकरदाराची इच्छा असते वगैरे वगैरे. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास, एखादा चांगला Whatsapp मेसेज/फोटो/व्हिडिओ पाठवला तर ग्रुपमधील इतरांनी त्याची ‘निदान दखल तरी घ्यावी’ अशी पाठवणार्‍याची अपेक्षा असते. पण ही मूलभूत अपेक्षा जर कुठल्या कारणाने पूर्ण नाही झाली तर आपला अपेक्षाभंग होणार हे निश्चित! आणि अपेक्षाभंगचे दु:ख हे मोठे असते. म्हणूनच “कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता कार्य करीत रहा!” हा महत्वाचा संदेश भगवदगीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेला आहे. म्हणजेच ‘चांगल्या कामगिरीबद्दल दुसर्‍याचे मनापासून व निरपेक्षपणे कवतिक करणे’ हे देखील आपले कर्तव्यच बनते, नाही का?

कवतिकाचे महत्व फार मोठे आहे. कवतिक हे एखाद्या दुधारी तलवारीप्रमाणे काम करते. ‘निखळ प्रशंसा’ ही एखाद्याच्या शिडात वारा भरून त्या व्यक्तीस चांगले काम करीत राहण्यास सतत उद्युक्त करते. उभारी देणारा एखादा शब्दही माणसाचे आयुष्य बदलण्यास पुरेसा ठरतो! अशी उदाहरणे जगाच्या इतिहासात आपण पहिली आहेत. इतकीच नव्हे तर आपल्या गणगोतांमध्येही आढळतात. दुसर्‍याची स्तुती ही तुम्हाला कधीच कनिष्ठपणा देत नसते. दुसर्‍याला प्रोत्साहित करणार्‍या व्यक्ती इतरांशी खेळीमेळीचे नाते लगेच प्रस्थापित करू शकतात. ह्याउलट तटस्थ राहणार्‍या व्यक्तींबद्दल इतरांचे मत तितकेसे अनुकूल बनत नाही.

अर्थात, काही पथ्य पाळणे मात्र महत्वाचे आहे… प्रशंसा ही अगदी मनापासून वाटत असेल तरच आणि आणि दुसरे महत्वाचे म्हणजे योग्य प्रमाणातच करा! कारण ‘अती तिथे माती’ हा नियम इथेही लागू आहे. शिवाय अवाजवी, अवास्तव, निराधार, विनाकारण केलेलं कवतिक हे ‘चापलुसगिरी’च्या / ‘गूळ लावणे‘ च्या हद्दीत मोडते. तुमच्या शब्दांत जरादेखील खोटेपणा असेल, आपमतलबीपणा असेल, तर तुमचे पितळ आज न उद्या उघडे पडल्यावाचून राहणार नाही. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तीला तुमच्या हेतूबद्दल शंका येऊन तुमच्याशी असलेले संबंध कायमचे बिघडूही शकतात.

अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की दुसर्‍यांच्या कवतिका सोबतच स्वत:चे रास्त कवतिक करणेही तितकेच महत्वाचे आहे. पुष्कळांना ‘स्वकवतिक’ / ‘स्वप्रशंसा’ करणे मुळातच पसंत नसते, एकदम दुसरे टोक, अगदी प्रसिद्धीपरायणच म्हणा ना! अशा व्यक्ती दुसर्‍याने केलेले त्यांचे कवतिक स्वीकारू शकत नाहीत. त्यात कमीपणा वाटतो म्हणा, आत्मविश्वास कमी पडतो म्हणा किंवा भिडस्त स्वभाव नडतो म्हणा. पण ही माणसे दुसर्‍याचे रास्त कवतिक करण्यातही मागे पडण्याचा धोका असतो. सरळ आहे, जी व्यक्ती स्वत:च्या पाठीवर सुध्दा “शाब्बास!” म्हणून थाप मारू शकत नाही, ती दुसर्‍याला काय थाप मारणार (म्हणजे चांगल्या अर्थाने बरं का…J)??

पुष्कळ जण असेही असतात की ज्यांना स्वत:च्या छोट्यामोठ्या सर्वच गोष्टीचा ढिंढोरा पिटण्याची सवय असते. “मी यंव आहे, मी त्यंव आहे, मी हे केले, मी ते केले” हे सांगण्यातच अशा “अहं, आवाम, वयं” वर्तुळात फिरणार्‍या व्यक्तींचे आयुष्य अकारण वाया जात असते. खरे म्हणजे ‘स्वत: बद्दल बढाया मारणे’ हे श्रेष्ठ गुरू समर्थ रामदासस्वामींनी ‘मूर्ख लक्षण’ म्हणून ‘दासबोधा’त अधोरेखीत केले आहे. परिणामत: अशा व्यक्ती समाजात अप्रिय ठरतात ह्यात नवल ते काय? अर्थातच ‘कवतिका’ बद्दल समर्थांनी कवतिकानेच लिहिले आहे.

थोडक्यात म्हणजे काय, तर ‘कवतिक’ हा विषय हलकाफुलका समजू नका, औप्शनला तर मुळीच टाकू नका. भरपूर अभ्यास करा, प्रॅक्टिकलचा सराव करा आणि त्यात कुठेही कमी पडू नका. चांगले गुण मिळवून पास व्हा, म्हणजे सर्व जण तुमचे ‘कवतिक’ केल्यावाचून राहणार नाहीत! ??

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments