सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ खेड्यातील स्त्री जीवन… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
कुटूंबाचा भक्कम आधार मानली जाणारी खेड्यातील स्त्री ही नोकरी करणार्या अथवा शहरी स्त्रीच्या दोन पावले पुढेच असते .आपला देश हा शेतीप्रधान देश मानला जातो. तसे पाहिले तर शेतीविषयक ग्रामीण स्त्रीचे योगदान खुपच अमुल्य आहे. खेड्यातील स्त्री ही जास्त करून आपल्या रानात रमलेली असते.तिच्या कष्टाळू आणि धैर्यवान वृत्तीतून ती आपले घर आणि शेत दोन्ही सावरत असते .खेड्यातून पाहिले तर जास्त करून कुटुंबाचे प्रतिनिधित्व हे त्या कुटुंबातील स्त्रीच करते. कुटुंबाचे पालनपोषण , तसेच आर्थिक नियोजन या गोष्टी ग्रामीण स्त्री मोठ्या धैर्याने पार पाडते.
खेड्या-पाड्यातून पाहिले तर सरसकट स्त्रीया या शेतावर राबताना दिसतात. यातील बर्याचजणी तर दुसर्याच्या शेतावर मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. आपल्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना त्या मोठ्या धैर्याने करत असतात. पिकणाऱ्या शेतमालातून किंवा मोलमजूरीतून, तसेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी मार्गातून पैसा उपलब्ध करून खेड्यातील स्त्री आथिर्क नियोजन करते. आपल्या कुटुंबाची आर्थिक नियोजनाची घडी ती उत्तम बसवते.
ग्रामीण भागातून निरीक्षण केले तर काही अपवाद ओघळता ग्रामीण स्त्रीच आर्थिक व्यवहार संभाळताना निदर्शनास येते. त्यामुळेच तीआपल्या कुटुंबाचा भक्कम आधार असते. मोठ्या चतुराईने आणि नियोजनबद्ध नेतृत्व यातून ती आपले कुटूंब आर्थिकदृष्टय़ा सुरळीत चालविते. कुटूंबाची काही कारणाने विस्कटलेली घडी ,सुरळीत करणे हे कौशल्य जणू ग्रामीण स्त्रीच्या अंगी रूळलेले असते. त्यानुसार ती स्वतःला आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व वाहून देते.
खेड्यातील स्त्री ही फक्त कष्टाळूच असते असे नाही. ती प्रेमळ, मनमिळाऊ सुध्दा असते. शेतावर एकत्र राबताना एक भाजी चारचौघीत वाटून खाण्याची तिला सवय झालेली असते. त्यामुळे ग्रामीण स्त्रीमध्ये मदतीचा हात पुढे करण्याची भावना शहरातील स्त्रीयांच्या तुलनेत जास्त असते. एकमेकींच्या प्रसंगाना, गरजेला उभे रहाण्यास त्या क्षणाचाही विचार करत नाहीत. अनेक सण , उत्सव , सांस्कृतिक कार्यक्रम खेड्यातील स्त्रीया एकत्र येऊन साजरे करतात. यासर्वाचा आनंद देखील घेतात. या सर्वात त्यांचा सहभाग आणि आनंदाचा वाटा जास्त असतो. हे सर्व त्यांना शेतीवाडीने दिलेले असते. शेतात टोकणी,भांगलण ,सुगी करत असताना अनेकजणी एकत्र येतात. शेतात राबताना एकमेकींजवळ व्यक्त होतात.एक दुसरीच्या सुख-दुःखाच्या भागीदार होतात. हे सर्व शहरातील स्त्रियाच्या वाट्याला येत नसते. शहरातील स्त्रीचे जीवन एका विशिष्ट चाकोरीतून जाते.तिला घड्याळाकडे पाहून कामे करण्याची सवय झालेली असते. ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा परीघ विस्तृत असतो. पहाटेला उठून ती आपल्या दैनंदिनीत मग्न होते सकाळपासून ते दिवस मावळेपर्यत तिचे हात रानासी बांधलेले असतात. आलेल्या संकटाना तोंड देतादेता या तिच्या संघर्षमय जीवनवाटाच तिला खंबीर , साहसी कष्टाळू, चातुर्यवान बनवितात.
खेड्यातील स्त्री कोणत्याच परिस्थितीत आपल्या कुटुंबाची वाताहात होऊन देत नाही. कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या प्रबल ठेवण्यास तिची धडपड असते. ती काटकसर करून आर्थिक नियोजन ठेवते. येणारे सण, उत्सवात मोठेपणाची अवाढव्यता न दाखविता ती आपल्या ऐपतीनुसार सण साजरे करते. यामध्ये ती स्वतः आनंदात रहाते आणि आपल्या कुटुंबालासुध्दा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. आजची ग्रामीण स्त्री ही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा तत्पर झाली आहे. त्यामुळेच खेड्यातील मुले सुध्दा आज उच्चशिक्षित होत आहेत इतकेच नाहीआपल्या मुलीच्या शिक्षणाचा सुध्दा ती सकारात्मक विचार करत असते. अर्थात ग्रामीण स्त्रीदेखिल प्रगतशील वाटचाल करत आहे. ती आपले कुटूंब एकसंध मायेच्या धाग्यात बांधून ठेवते.
आपले दुःख ,वेदना ,येणारी संकटे याचा ग्रामीण स्त्री कधी त्रागा करत नाही. यासगळ्याची घुटकी घेऊन ती जगत असते. तिला तशा जगण्याची जणू सवय झालेली असते. त्यामुळे येणारी संकटे झेलण्याची क्षमता ग्रामीण स्त्रीमध्ये जास्त असते. तिचा बहुतांश वेळ शेतावर जातो. आपले कुटुंब ,शेती ,पाऊस या गोष्टीत ती रमलेली असते. फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी ती शेताच्या बांधावर बसून समाधानात खाते.
कुणास ठाऊक ‘ जागतिक महिला दिन ‘ त्या खेड्यातील, रानात राबणाऱ्या बाईला माहित आहे की नाही. तिच्यासाठी प्रत्येक दिवस कष्टाला सोबत घेऊन उगवतो आणि रानासोबत समाधानाने मावळतो. “येणारा प्रत्येक दिवस जी अनेक बुध्दीकौशल्यानी आपलासा करते , तिच्या कार्यास सलाम असो आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला खुप खुप शुभेच्छा ”
“जागतिक महिला दिनाच्या ” सर्व महिलांना शुभेच्छा
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈