डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

(दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.भाग 2 पुढे चालू)

मग या नायिकेला लाडीगोडी लावण्यासाठी तिच्याच वजनाइतकी चिरलेल्या पिवळ्याधमक गुळाची साडी नेसवली जाई. त्यामुळे ती नायिका आपला पूर्वीचा रंग झटकून हा पिवळा रंग अंगभर लपेटून घेई. त्या पिवळ्या साडीला खोवून घेतलेल्या पांढऱ्याशुभ्र ओल्या नारळाच्या किसाची मध्ये मध्ये नक्षी काढली जात असे. ही कलाकुसर मात्र सढळ हाताने करत असत. असा हा मेकअप पूर्ण झाल्यावर आता या नायिकेला प्रत्यक्ष नाटकाचे वेध लागलेले असत. मग एका गोल, खिरीच्या साजेशा रंगाला मॅच होईल अशा रंगाच्या डिशच्या रंगमंचावर नायिका अवतरत असे.   आता नायकाच्या एंट्रीची वेळ जवळ आलेली असते.  इतका वेळ सर्व दिव्यातून बाहेर पडताना आपल्या या नायिकेला अग्नीसरांनी योग्य वेळी साथ  दिलेली असते. पण ते फक्त पाहुणे कलाकार असल्याने या प्रयोगातून वेळीच exit घेतात. त्यानंतरच नायकाचे रंगमंचावर आगमन अपेक्षित असते. अग्नीसरांच्या उपस्थितीतच जर चुकून या नायकाचे आगमन झालेच तर मोठा अनर्थ ओढवतो. कारण आपल्या तापट स्वभावाने अग्नीसर पाहुणे कलाकार न राहता खलनायकाच्या भूमिकेत शिरुन गुळाच्या मदतीने या दुग्धरुपी नायकाला बदसूरत करण्याची शक्यता असते आणि पूर्ण नाटकाचा प्रयोगसुद्धा फसू शकतो. म्हणून मग थोडा वेळ ही नायिका मंद वाऱ्याच्या सान्निध्यात आपले श्रम विसरुन थंड होत आतुरतेने नायकाची वाट पाहू लागते. हीच वेळ नायकाच्या आगमनाची असते. आपल्या शुभ्रधवल वर्णाने हा दूधनायक सळसळत रंगमंचावर प्रवेश करतो. आपल्या सहजसुंदर  अभिनयाने या नाटकात रंग भरु लागतो. जोडीला याने  नायिकेला भेट म्हणून तुपाची धार पण आणलेली असते. त्याच्या सानिध्याने खिरीचे नाटक अधिकच झळकू लागते. शिवाय साथीला त्याची नेहमीची, नेहमीच छोटीशी पण महत्वाची भूमिका निभावणारी वेलचीताई या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आता हा सर्व  कलाकारांचा एकजीव झालेला संच नाटकाच्या शेवटच्या अंकासाठी सिद्ध होतो. आतुरतेने क्लायमॅक्स ची वाट पाहणारे आम्ही प्रेक्षक ताबडतोब आमच्या रसनारुपी चक्षूनी त्या रंगमंचीय रंगतदार खिरीचा आस्वाद घेत असू. आणि आमच्या चेहऱ्यावरील तृप्तीने आपल्या कलाकृतीला योग्य दाद मिळाल्याचे त्या दोन दिग्दर्शिकाना समजत असे. मग आपल्या या स्त्रीपार्ट करणाऱ्या नायिकेकडे कौतुकाने पाहताना त्या  कृतकृत्य होऊन जात.

तळटीप:-

  • आवडत असल्यास या नाटकात काजूचे तुकडे, बदाम, बेदाणे याना छोट्या भूमिका द्यायला हरकत नाही.
  • खोबऱ्याच्या किस वापरण्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करुन त्याची नक्षी पिवळ्या साडीला काढली तरी चालेल.
  • महत्वाचे म्हणजे खपली गव्हाच्या अनुपस्थितीत घरातले रोजचे गहू किंवा त्याचा बाजारात मिळणारा  तयार दलिया कधीतरी नायिकेची भूमिका उत्तम पार पाडू शकतात.
  • सध्याच्या काळात उखळ सहज उपलब्ध नसल्यामुळे त्याचे काम मिक्सर करु शकतो. फक्त गव्हाला हलकेच पाण्याने ओलसर करुन, मिक्सरमध्ये हलके हलके फिरवावे लागते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments