श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
माणूस परंपरेला चिकटून जगण्यातच धन्यता मानतो. तिथेच जीवनाची सार्थकता शोधत जगत राहतो. त्याची ही जीवनशैली बदलण्यासाठी एका तत्त्वनिष्ठ अजोड क्रांतीची गरज भासते आणि मग वेळोवळी सामाजिक गरजे नुसार तिच्यात काही बदलही घडत जातात. शस्त्राच्या धाकाने घडवला जाणारा बदल हा क्रांतीचा पहिला प्रकार आहे. पण घडलेली ही क्रांती तात्कालिक असते. कालांतराने तिच्यावर परंपरेचे दडपण येते. ती क्षीण बनते आणि शेवटी परिणाम शुन्य ठरते. प्रगतिशील विचार मांडणी आणि त्या नुसार विचारपूर्वक केली जाणारी कृती हा क्रांतीचा दुसरा प्रकार आहे. पण हिच्यात सर्वसंमतीचा अभाव जाणवतो म्हणून तिच्यात म्हणावा तसा प्रभावी प्रभाव दिसत नाही. शिक्षणातून घडणारी क्रांती हा तिसरा प्रकार. ही क्रांती मात्र चिरंतन टिकणारी असते. कारण ती व्यक्तीमनाचा ठाव घेणारी असते व तिला भक्कम मजबूत पाया प्राप्त झालेला असतो. जनात होणा-या क्रांतीपेक्षा मानवी मनात होणारी क्रांती ही सर्वश्रेष्ठ असते आणि ती दिर्घ काळ टिकते. शिक्षणाने मने प्रगल्भ होतात. पहिल्या दोन्ही क्रांती शिक्षणामुळेच घडत असतात. म्हणूनच शैक्षणिक क्रांतीला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे हे नक्की. व्यक्तिच्या अंगी असणा-या सुप्त गुणांचा विकास, मानवी कर्तृत्वाला पोषक वातावरण निर्मिती, जीवन समृद्ध करणा-या चिरंतन मुल्याना प्रोत्साहन, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण , आणि माणसाला मिळालेल्या मूलभूत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे कार्य ख-या अर्थाने शैक्षणिक क्रांतीच करत असते. म्हणूनच ती स्थायी स्वरुपाची क्रांती आहे. आणि तिची प्रेरणा गुरू मुळेच मिळते. जो माणसाला अज्ञानापसून मुक्त करतो, वैचारिक दाशस्यातून व गुलामगिरी तून मुक्त करतो, जातीपातीच्या परंपरागत कैदखान्यातून मुक्त करतो, भूतकाळाच्या उसन्या आवेशातून मुक्त करतो, मानवीस्वभावात साठून राहिलेल्या विकृती पासून मुक्ती मिळवून देतो, लिंगभेदाच्या परंपरागत जाचक जुनाट समजुतींच्या विळख्यातून मुक्त करून नवविचार प्रेरणा देतो. तोच खरा गुरू असतो. तोच जीवनाला आकार देणारा मार्गदर्शक ठरतो.
माणसाला आपल्या जीवनमूल्यांची खरी जाणीव होऊन त्याच्या जीवनाला पूर्णत्व आणि कृतार्थता प्राप्त करून घ्यायची असेल तर, माणसाच्या अंगी प्रज्ञा , प्रतिभा , प्रार्थना , नम्रता , प्रयत्न , व कृतज्ञता या सहा गुणांचा सुंदर समन्वय असणे अत्यावश्यक आहे. प्रज्ञा माणसाचा सर्वांगीण विकास करून योग्य सुधारणावादी पर्यावरण बनवते. प्रतिभेच्या साथीला सहवेदना आणि संवेदनशीलता असेल तर माणसाला सखोल स्वरुपात समजून घेता येते. त्या योगाने नाविन्यपूर्ण नव निर्मीती ही करता येते. माणसाच्या अंगी असणारा अहंकार नष्ट करून माणसाला ईश्र्वराच्या सानिध्यात नेण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. नंम्रता माणसाच्या अंगी असणा-या मूलभूत स्वरुपाच्या चांगल्या गुणवत्तेला विनंम्रभावे अभिवादन करते. प्रयत्न माणसाला प्रगतीची वाटचाल करायला शिकवत उन्नतीच्या व यशाच्या दिशेने मार्गाक्रमण करावयास प्रेरणा देतो. कृतज्ञता माणसाला माणुसकी शिकवते. माणसांशी जवळीक साधते व केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त करते. प्राप्त परिस्थितीशी अथक संघर्ष करत उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करणे वाटते तितके सोपे नाही. पण जो ध्येयोपासक असतो तो साधक बनतो . साधनाकरतो. आणि सा-या संकटावर मात करत यशाची वाट निर्धोकपणे चालत राहतो . त्यालाही क्रांतीच म्हणावे लागेल. मानवी जीवनात सुखापेक्षा दु:खेच अधिक असतात. पण जे दुःखाने दु:खी होत नाहीत,ते दु:खालाच दु:खी करून सहज विजय मिळवतात तेच खरे क्रांती कारक असतात. ते आपल्या दु:खाचे कधीच प्रदर्शन मांडत नाहीत. त्याचे भांडवलही करत नाहीत आणि त्यांच्या पुढे शरणागतीही पत्करत नाहीत. आज अशाच क्रांतीकारकांची गरज आहे. ते मिळाले तर भारत पुन्हा सुवर्ण भूमी होईल. यात काही शंका नाही. आजच्या काळाची ही प्रमूख गरज आहे .असे मला वाटते.
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈