मराठी साहित्य – विविधा ☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

गोडवा बंधनाचा

दिवस संक्रांतीचा

मधुर वाणीचा

रंग उडत्या पतंगाचा

बंद दाटल्या नात्यांचा

संक्रांतीच्या शुभेच्छांच्या अनेकविध चारोळ्या मध्ये ही चारोळी मला उंच आकाशात घेऊन गेली.अगदी आकाशात विहरणाऱ्या पतंगांजवळ. विविधरंगी उडत्या तबकड्याच त्या !! पतंगांच्या हवेत  डोलणाऱ्या  शेपट्याच्या मोहक हालचालींना मीही मनोमन डोलू लागले.

गदिमांच्या ‘बाई मी पतंग उडवीत होते’ या गाण्याची आठवण झाली ‘हसू फेसाळ घुसळीत अंग’ असे म्हणत लावणी गाणाऱ्या जयश्री गडकर चा चेहरा  डोळ्यासमोर आला.

मनातल्या मनात त्या लावणीचं रसग्रहण चालू होतं

काटा-काटीनं आला ग रंग

हसू फेसाळ घुसळीत अंग

दैव हारजीत घडवीत होते

सूर ताल लय आणि लावणीचा ठसका यांचा फेर धरून मनात नाच चालला होता पण मला अचानक ठसका लागला तो त्या गाण्याचा भावार्थ जाणून….

चढाओढीनं चढवलेले, हवेत स्थिरावलेले,मुक्त विहार करणारे ,इंद्रधनुष्याचा सडा टाकणारे हे पतंग शेपटीचा रुबाब दाखवत जेव्हा नयनसुख देतात तेव्हा गाण्यातील एक ओळ काळजाचा ठोका चुकवते…

माझ्या दोऱ्याने तुटला दोरा

एक पतंग येई माघारा

गेला गुंतत गिरवीत गोते

आकाशात स्थिरावलेला अचानक गोते खात माघारी येणारा, पुन्हा जमिनीच्या कुशीत शिरणारा, क्वचित प्रसंगी झाडाच्या कवेत जाणारा, आयुष्याच्या शेवटी गुंतत गोते खाणारा हा पतंग मला विचारांच्या गर्तेत लोटू लागला.

वरवर स्वच्छंदी वाटणारा हा पतंग स्वातंत्र्य उपभोगतो का? नाही..तोही हवेच्या मूडचा गुलाम… त्याचा आधार म्हणजे मांजा. लोकांना पतंग दिसतो पण ज्यामुळे तो आकाशात फिरवतो तो मांजा दिसत नाही.

पतंगाचे आकाशात उडणे हेदेखील मांजा वर अवलंबून असते मांजाची लांबी पतंगाच्या आकाशाच्या गवसणीला प्रतिकार करते.

पतंग जसा जसा उंच जाऊ पाहतो तशी तशी मांजाची शक्ती( लांबी) अपुरी पडू लागते. जोवर तो एकटा तरंगत असतो तोवर तो विहरतो जणू त्याचे साम्राज्य आहे पण हळूहळू तिथे स्पर्धा सुरू होते. आता तो एकटा नसतो इतर पतंग त्याच्याशी काटा-काटी खेळतात .एक प्रकारचे युद्ध सुरू असते. तो मांजाचे ऐकत नाही. मांजाची शक्ती निष्प्रभ ठरते त्याच्या बेताल वागण्या पुढे! मांजा हात टेकतो. दुर्बल मांजाला दुसऱ्या पतंगाचा मांजा कापतो आणि घडायचे तेच घडते.

क्षणार्धात पतंग माघारी येतो मांजाचे बंधनच त्याला मुक्तीचा आनंद देत होते हे त्या मदमस्त पतंगाला कळू नये का?

आकाशात उडत असलेले पक्षी देखील स्वातंत्र उपभोगत नाहीत. त्यांच्याही पंखाखाली हवेचा दबाव आहे. ती त्याना  दाबते.  ठराविक मर्यादेपलीकडे पक्षीसुद्धा आकाशात जाऊ शकत नाही एका ठराविक उंचीपर्यंत एकांत त्याच्यापुढे एकाकीपण……

बंधन हे बंधन न मानता ते सुरक्षाकवच मानून मुक्तीचा आनंद घेतला तर कसे?

थेंब जेव्हा महासागर होतो त्या क्षणी तो सागराचं बंधन स्वीकारतो.

हीच गोष्ट संक्रांत संक्रमित करत असेल का?……..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈