सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गुरूपौर्णिमा… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

धर्मपुराणानुसार आषाढ पौर्णिमे दिवशी व्यासांचा जन्म झाला .महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवन संपन्न केले आहे .या अमौलिक कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यासांचे पूजन केले जाते. हा दिवस ” व्यास पौर्णिमा “म्हणून ओळखला जातो. हाच दिवस”गुरुपौर्णिमा “म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूज्य मानले जाते. 

आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु -शिष्य परंपरा चालत आली आहे .भारतीय गुरुपरंपरेत जनक -याज्ञवल्क्य, कृष्ण, सुदामा – सांदिपनी, कर्ण -परशुराम अर्जुन -द्रोणाचार्य स्वामी विवेकानंद -रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वर -निवृत्तीनाथ ,चांगदेव- मुक्ताबाई यां नावांचा समावेश करता येइल.

आपला पहिला गुरु आई .ती आपल्याला बोलायला चालायला शिकवते, त्याचप्रमाणे वडील आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतात. वय वर्षे ५ते १६ हा काळ आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो . या वयात संस्काराची गरज असते. हे अमूल्य संस्कार घरी आई वडील देतात तर शाळेत व्यक्ती सापेक्ष-मनुष्य सापेक्ष जीवन विचारसरणी शिकवली जाते.

” गुरु विना ज्ञान नाही, ज्ञाना विना शांती नाही आणि शांती विना आनंद नाही “हेच खरे. आपल्याला लहान मोठ्यांकडून बरेच काही शिकता येते पण त्यासाठी ते जाणून घेण्याचा दृष्टिकोन हवा.

केवळ व्यक्ती कडूनच ज्ञानमिळत असते असे नाही. तर  लहानपणापासून म्हातारपणापर्यंत जे जे विद्या देतात ते आपलेगुरु असतातच म्हणून निसर्ग हा आपला गुरु आहे .निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ओहोळ रूपाने येणारी नदी वाहत असताना अनेक ओहळांना आपल्यात सामावून घेते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते पण जाताना जमीन सुपीक करते शेती फुलवते पिण्यासाठी पाणी देते तिचा उपयोग वीज निर्मितीसाठी होतो सर्वांना आपल्यात सामावून घ्या, शांत राहून इतरांना मदत करा ही   शिकवण नदीकडूनमिळते. डोंगरावर वादळ वाऱ्यासारखी संकटे येतात पण खचून न जाता पुन्हा कामाला लागा असा संदेश डोंगर देतात. वृक्ष, झाडे झुडपे लता वेली वगैरे वनस्पतींचे प्राणीमात्रावर अगणित उपकार आहेत वनस्पती नसतील तर कदाचित प्राणी मात्र जगू शकले नसते. श्वास घेण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत आपल्याला या सर्वांची गरज असते. हे सर्वजण फांद्या फुल फळे यांचे ओझे वाहतात आणि आपल्याला मधुर फळ देतात. वाटेवरच्या वाटसरूला सावली देतात. उन्हामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून ऑक्सिजन आपल्याला देतात , दातृत्वाची शिकवण देतात पण त्या बदल्यात निसर्ग आपल्याला काहीच मागत नाही म्हणून” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी “असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

एवढेच नव्हे चिमणी, पक्षी आपले घरटे बांधताना काटक्या गोळा करतात घरटे बांधतात त्या घरट्यामध्ये अंडी पण घालतात कधी कधी पाऊस वाऱ्याने ते खाली पडते पण हे पक्षी पुन्हा नवीन घरटे बांधतात.

घरात आढळणारा कीटक कोळी आपले जाळ विणत असताना अनेकदा खाली पडतो पण  तो जिद्दीने आपले जाळे तयार करतोच. आज आलेल्या संकटावर मात कशी करावी, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचे ज्ञान आपल्याला या कीटकांकडून मिळते.

मुंगी एक कण दिसला तरी इतर मुंग्यांना गोळा करतात, एखाद्या पदार्थाला मुंग्यांची रांग लागलेली आपण पाहतो.,झाडावरून घसरुन  मुंगी खाली पडते पण ती आपले  कार्य सोडत नाही तर पुन्हा वर चढून आपले ध्येय गाठते.संकटाला न घाबरता प्रयत्न करा यश तुमच्या पाठीशी आहे असे शिकवते जणू!अशीअनेक उदाहरणे देता येतील. म्हणून निसर्गासारखा नाही रे ‌सोयरा

गुरु,सखा बंधू मायबाप

त्याच्या कुशीमधये सारें व्यापताप

मिटती क्षणात आपोआप 

निसर्गाप्रमाणे ग्रंथ गुरुची महती सांगता येईल. ग्रंथा मधून भूतकाळातील गोष्टी समजू शकतात, तसेच वर्तमान काळ , भविष्यकाळ याबद्दल अफाट ज्ञान ग्रंथातून, पुस्तकातून मिळते.,  हे अमूल्य ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते. पुस्तकामुळे ज्ञानवृद्धी होते. सकारात्मक विचारसरणी बनते .आत्मविश्वास वाढतो .चांगले संस्कार होतात .कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पाठबळ मिळते. या गुरूकडे जात धर्मभेद नाही ,काळाचे बंधन नाही म्हणून ग्रंथ हे  सुध्दा आपले गुरु आहेत. 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments