सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
या दिवशी पूजा करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येक रुढी ,परंपरेला शास्त्रीय आधार आहे.या दिवशी अभ्यंगस्नान करून, ब्रह्मदेवाची दवणा ( थंड असतो म्हणून ) वाहून नंतर महा शांती केली जाते. ” नमस्ते बहू रुपाय विष्णवे नमः।” हा मंत्र म्हणून विष्णुची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे ज्ञान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने, आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते.आरोग्य लाभते. समृद्धी येते.अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करतांना, एका उंच वेळूच्या टोकाला ,भरजरी खण किंवा साडी ,साखरेच्या गाठी, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची डहाळी, आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा चांदीचा कलश सजवून, गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते.याला ब्रह्मध्वज असे ही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडुलिंब आणि आंब्याच्या झाडाच्या पंचांगांचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. ( ते देववृक्ष आहेत. )कलश रुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. ( अँटेनाच्या कार्या प्रमाणे. )या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून, वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्नं करून, प्रसाद म्हणून ,कडूलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकातले संबंध वाढावेत ,अशी एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणीस सुरुवात करतात. पारंपारिक वेषभुशा करुन, मिरवणूक काढून, आनंद लुटतात. कोणी नवीन खरेदी करतात. किंवा नवीन कामाला सुरवात करतात.
आपल्या प्रत्येक सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. जाणून घ्यायला हवा. या शुभ दिनानिमित्त येणारे नवीन शुभ कृती संवत्सर, शालिवाहन शके १९४५ हे सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो.
– समाप्त –
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈