सौ शालिनी जोशी
☆ गीता जशी समजली तशी… गीता शास्त्र – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी ☆
गीताशास्त्र
गीतेचा प्रत्येक शब्द जेवढा त्या काही आचरणी होता, तेवढा आजही आहे. कारण काळ बदलला तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. अर्जुनाला निमित्त्य करून भगवंतांना चिंता आहे सर्व मानव जातीच्या कल्याणाची. त्या दृष्टीने आवश्यक सर्व शास्त्रांचा समावेश गीतेत आहे. म्हणून गीतेला ‘सर्व शास्त्रांचे माहेर’ म्हणतात. जीवनाला प्रेरणा व योग्य मार्ग देणारा प्रत्येक विचार म्हणजे शास्त्र.
गीता हे नीती प्रधान भक्तीशास्त्र, आचरण शिकवणारे कर्मशास्त्र, ज्ञानाचा अनुभव देणारे अध्यात्मशास्त्र, संयम शिकवणारे योगशास्त्र आहे. अशा प्रकारे कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती यांचा समन्वय येथे आहे. सर्व शास्त्रे येथे एकोप्याने नांदतात. कोणाची निंदा नाही. कोणाला कमी लेखले नाही. अधिकाराप्रमाणे आचरण्याचा उपदेश आहे.
गीता हे खचलेल्या मनाला उभारी देणारे आणि मन बुद्धीचा समतोल साधणारं मानसशास्त्र आहे. योग्य व सात्विक आहार यांचे महत्त्व आणि फायदे सांगणारे आहार शास्त्र आहे. त्याचबरोबर राजस व तामस आहाराचे तोटेही सांगितले आहेत. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणार आचरणशास्त्र आहे. त्याचबरोबर अति खाणाऱ्याला किंवा अजिबात न खाणाऱ्याला, अती झोपणाऱ्याला किंवा अजिबात न झोपणाऱ्याला योग साध्य होत नाही असेही गीता सांगते म्हणजे कसे असावे आणि कसे असू नये हे दोन्ही सांगणारे तारतम्य शास्त्र आहे.
ज्येष्ठांना त्यांच्या जबाबदारीची आणि समाजातील सर्व घटकांना (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शूद्र )त्यांची कर्तव्य सांगणारे, सर्व जातींना व स्त्रियांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. समाजातील उच्चपदस्थ जे जे आचरण करतात त्याला प्रमाण मानून इतरलोका आचरण करतात हा समाजशास्त्राचा महान सिद्धांत येथे सांगितला आहे.
गीता हे पंचभुतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र आहे. यालाच गीता अपरा प्रकृती म्हणते. भूमि, आप, अनिल, वायु, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही तिची आठ अंगे. यातच सगळी भौतिकशास्त्रे सामावली आहेत. ‘उतिष्ठ, युद्धस्व’ असे सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणार हे विवेक शास्त्र आहे. स्वधर्माची व स्व कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा गीता देते. कामक्रोधादि पतनापर्यंत नेणाऱ्या अंत: शत्रूंचा निषेध गीता करते. याशिवाय अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारे हे आत्मशास्त्र आहे.
‘उद्धरेदात्मनात्मानं ‘ हा स्वावलंबनाचा मंत्र गीता देते. यज्ञ, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, सुख प्रत्येकाचे गुणाप्रमाणे भेद सांगून सात्विकतेला महत्त्व देते. फलासक्तीचा त्याग, संयम, विवेक यांनी शुद्ध क्रिया गीतेला अपेक्षित आहेत. म्हणून ग्राह्य आणि अग्राह्य ( दैवी आणि आसुरी गुण) गीता समोर ठेवते. अग्राह्य गोष्टींचा त्याग का करावा हे पटवून देते. गीतेला सक्ती मान्य नाही. अंधश्रद्धेला वाव नाही. ‘ यथेच्छसि तथा कुरु ‘असे स्वातंत्र्य गीता देते. गीतेत कोणतेही कर्मकांड नाही. स्वधर्म हाच यज्ञ आणि स्वकर्म हाच धर्म म्हणून स्वकर्मानेच ईश्वराची पूजा. अशा प्रकारे गीता आहे जीवनाचे एक रहस्य पूर्ण शास्त्र आहे.
गीतेचा अभ्यास तरुणांनी अवश्य करावा. त्यांच्यासाठी ज्ञान मिळवण्याचे ते तीन मार्ग गीता सांगते. ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाl’ ( ४/३४). ज्ञानी गुरूला साष्टांग नमस्कार (नम्रता) प्रश्न विचारणे (शंका निरसन) आणि सेवा (अहंकार गलीत) केल्याने त्यांचे कडून ज्ञान प्राप्ती होते. अशा प्रकारे तरुणांपासून सर्वांना मार्ग दाखवणारे शास्त्र. म्हणून गीता महात्म्यातील पहिला श्लोक सांगतो
गीताशास्त्रमिदं पुण्यं य: पठेत् प्रयत: पुमान्l
विष्णो: पदमवाप्नोति भयशोकादिवर्जित:ll
गीता हे पुण्यमय शास्त्र आहे. त्याच्या चिंतनाने भयशोकादि उर्मीतून मुक्त होऊन माणसाला विष्णूपदाची प्राप्ती होते. त्यानुसार आचरण करणारा पूर्ण सुखाला प्राप्त होतो. अशाप्रकारे संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्याचे संसारातील खरे कर्तव्य काय हे तात्विक दृष्ट्या उपदेश करणारे गीता शास्त्र आहे. केवळ म्हातारपणी वाचण्यासाठी किंवा संसार त्याग करण्यासाठी नाही. तरुण वयात अभ्यासाला केलेली सुरुवात आयुष्यभर दीपस्तंभ होते.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈