श्री अरविंद लिमये
☆ विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये ☆
आत्ताचा श्वास उच्छवासात रुपांतर होताच भूतकाळात जमा होत जातो. कधीच न थांबणारं हे निरंतर चक्र. . !सृष्टीच्या उत्पत्तीपासून सतत दमछाक न होता एका लयीत ते फिरतं ठेवण्याची ही किमया अचंबित करणारीच. भूतकाळात जमा होणाऱ्या या आपल्या साऱ्या श्वासांचा चोख हिशोब ठेवण्यासाठीचं आवश्यक साॅफ्टवेअर या व्यवस्थेत In Builtच असतं. तिथं ना निष्काळजीपणा ना चूकभूल. आपल्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीचीच नव्हे तर त्या त्या क्षणी मनात उमटलेल्या पण कृतीत न उतरलेल्या बऱ्या-वाईट विचारांचीही त्याच क्षणी नेमकी अचूक नोंद होत असतेच. या नोंदी म्हणजेच आपली कर्मे. याचाच अर्थ आपला भूतकाळ आपणच घडवत किंवा बिघडवत असतो आणि त्याचीच कर्मानुसार कडू-गोड फळं भविष्यकाळात कर्मफलांच्या परिपक्व होण्याच्या क्षमतेनुसार आपल्यालाच मिळणार असतात. ती स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा कोणताच अधिकार आपल्याला नसतो. सत्कर्माच्या गोड फळांच्या आस्वादाचं सुख उपभोगणारे आपणच आणि कडू फळांचे भोग भोगणारेही आपणच. भविष्यकाळांत काय घडणाराय हे आपल्याला माहित नसतं असं म्हणतात. पण हे पूर्ण सत्य नव्हे. कारण आपल्या कर्मांच्या नियतीच्या नोंदवहीत होणाऱ्या नोंदी त्या त्या क्षणी आठवणींच्या रुपात आपल्या मनातही होत असतातच. त्यामुळे आपल्या बऱ्यावाईटाचे आपणच साक्षीदार असतो आणि म्हणून त्याची जबाबदारीही आपलीच. या गतकाळातल्या चांगल्या आठवणी आपला भविष्यकाळ सुखकर करीत असतात. नकोशा आठवणी सोईस्करपणे विसरायचा प्रयत्न करणारेही त्या आठवणीरुपी कर्माची कडू फळं टाळू शकत नाहीत.
याचाच अर्थ आपला भविष्यकाळ आपल्याला माहित नसला, तरी तो घडवणारे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो. आपला प्रत्येक श्वास उच्छवासाबरोबरच भूतकाळात जमा होत असतो. तो सत्कर्माने सजलेला हवा कि कुकर्माने बाधित हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण हा निर्णय योग्य आणि सुखकर व्हायला हवा असेल तर आपणच क्षणोक्षणी निर्माण करीत असलेला आपला गतकाल हाच आपला भविष्यकाळातला श्वास असणार आहे हे विसरायचं नाही. . !!
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈