विविधा ☆ गीता जयंती ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆

आज आहे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी.

आज एक विशेष जन्मदिवस आहे मंडळी…तो आहे व्यक्ती घडवणार्‍या विचारांचा. हा भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी याच दिवशी युद्धभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला गीता सांगितली, तो हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो.

गीता म्हणते कर्म करा..काम करा.. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही मनोवृत्ती गीतेला मान्य नाही.

कर्म म्हणजे स्वधर्म आचरण करा…

स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपापल्या स्वभावानुसार, क्षमतांनुसार, कौटुंबिक- सामाजिक परिस्थितीनुसार, योग्य कर्तव्यकर्म ईश्वरास साक्षी ठेवून किंबहुना ईश्वरास आपल्याबरोबर ठेवून करणे.

ईश्वरास साक्षी ठेवल्याने आपसूक चुकीचे काम हातून होतच नाही.

गीता म्हणते कर्मावर तुझा अधिकार आहे पण कर्माच्या फळावर नाही.

कर्मावर आपला अधिकार आहे म्हणजेच ते आपल्या स्वाधीन आहे. आपण कर्म कोणते करावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.जे काम करायचे ते आपल्या स्वभावानुसार,क्षमतेनुसार निवडावे असे गीता सांगते. असे   काम सहज व आनंददायी होते.

असे  कर्म करतानाचाच आनंद एवढा असतो की त्यापासून फळ काय मिळेल याचा विचार माणसाच्या मनातच येत नाही.

‘दैनंदिन जीवनात गीता’ या पुस्तकात डॉ. वि.य.कुलकर्णी म्हणतात- मुलगा खेळण्याच्या आनंदासाठी खेळतो. त्यामुळे व्यायामाचे फळ त्याला सहजच मिळते. परंतु त्या फळासाठी म्हणून तो खेळत नाही. खेळणं हे कर्म करतानाचा आनंद तो घेत असतो..फळाकडे त्याचे लक्ष नसते. त्याचा सर्व आनंद त्या खेळात असतो.

कधीकधी आयुष्यात न आवडणारे कामही करावे लागते…तेव्हा काय करावे?

एक गोष्ट आहे.. दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे धोंडू आणि महादू ..दोघांनाही एका कुठल्यातरी गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. पाच किलो वजन डोक्यावर घेऊन  डोंगर चढून जायचे होते. धोंडू ने पाच किलो वजनाचा दगड डोक्यावर घेतला आणि तो डोंगर चढून गेला. थकून गेला बिचारा.. दुसरा महादू विचारी होता. त्याच्या मनात आले शिक्षा भोगायची आहे.. पाच किलो वजन न्यायचे आहे, ठीक आहे, नेऊया .. पण काय न्यायचे हे कुठे सांगितले आहे ?त्याने काय केलं ? भाजीभाकरी, दह्याचा लोटा, पाण्याचा तांब्या असे सारे पाच किलो वजनाचे घेतले. डोंगर चढून गेला. तोही थकला पण नंतर खाली बसून त्यांने मजेत भाजी भाकरी वर ताव मारला. शिक्षा दोघांनीही भोगली पण एकाला शिक्षा झाली आणि दुसऱ्याने त्या शिक्षेचा ही आनंद घेतला.

शिक्षा म्हणून काम करू लागलो तर ते शरीराला आणि मनाला थकवा देते पण तेच विचारपूर्वक आणि मजेने स्वीकारलं तर त्या कर्मात ही आनंद  मिळतो. म्हणून आपलं कर्तव्य , काम याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा.

कर्मा फळा कडे पाहू नये ही गीतेची दृष्टी आहे.

एक गोष्ट सांगतात-  एका छोट्या मुलाने ऐंशी वर्षाच्या एका म्हाताऱ्याला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तेव्हा तो हसला. म्हणाला-  “आजोबा, या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळतील का?” तेव्हा म्हातारा हसून म्हणाला,” बाळ, ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते आंबे तरी मी कुठे लावले होते ? कोणीतरी माझ्या पूर्वजांनी जे पुण्यकर्म केले त्याचे फळ मी खातो, म्हणून माझ्या हातून मी झाडं  लावतोय , ते पुण्यकर्म होत आहे ..त्याच्या फळाचा मी कशाला विचार करू ?त्याचे फळ पुढील पिढ्यांसाठी.. मी त्याची अपेक्षा करत नाही.” ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर भगवंताने गीतेत फळाची अपेक्षा ठेवू नये असे का सांगितले आहे याची कल्पना येते..

तर अशी ही जीवनाचे शिक्षण देणारी गीता..विनोबा भावे तिला आई , गीताई म्हणतात..

स्वाध्याय परिवाराचे जनक पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात – गीता केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, हा विश्व धर्मग्रंथ आहे.

गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. आपण सामान्य माणसे जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी गोंधळून जातो..कसे वागावे,काय करावे उमजत नाही.. भगवंतांनी गोंधळलेल्या अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवन सोपेपणाने जगण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे…आपण ते समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे..

ख्रिस्ती काय, हिंदू काय किंवा मुस्लिम काय…सर्व धर्म शेवटी सारखेच.. वेगवेगळ्या नद्या जशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वहात येऊन  एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे एकाच ईश्वराकडे नेणाऱे हे वेगवेगळे मार्ग..

आजच्या ख्रिसमस व गीता जयंती निमित्त प्रभु येशू आणि गीताकार भगवान श्रीकृष्ण या दोन्ही विभूतींना तेवढ्याच प्रेमाने वंदन करूया..

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments