श्रीमती अनुराधा फाटक
☆ विविधा ☆ घट….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
नवरात्रातील महत्वाची गोष्ट घटस्थापना ! घटस्थापना म्हणजे आपण मांडलेली पंचमहाभूतांची पूजा !मातीचा घट आणि घटाभोवती नवधान्य पेरण्यासाठी वापरलेली माती हे पृथ्वीच्या सृजनाचे प्रतिक,घटातील पाणी म्हणजेच आप,सतत तेवणारा दिवा तेजाचे प्रतिक,त्यातून निर्माण होतो चैतन्याचा वायु जो सारा आसमंत( अवकाश) उजळून टाकतो.घटस्थापनेच्यावेळी केलेल्या या पंचमहाभूतांच्या पूजेने देवीचे दिवसेदिवस देवीचे तेज वाढते तेअष्टमीला पूर्णत्वाला जाते.त्या पूर्णत्वात घागर( घट)फुंकून आपण देवीला अंतर्मन अर्पण करण्याचा प्रयत्न करतो.घटाच्या अंतरात, पोकळीत जाण्याचा प्रयत्न करतो.तो करतानाजे समाधान मिळते हे समाधान म्हणजेच नवरात्रीचा घटाशी असणारा अन्यसाधारण संबंध!अलिकडे घटस्थापनेसाठी ऐश्वर्याप्रमाणे वेगवेगळ्या धातूचे घट वापरले जातात पण मातीच्या घटाचे ऐश्वर्य कशालाच नाही हे तितकेच खरे!
घट हा शब्द फार पुरातन असून तो आजही आपले अस्तीत्व टिकवून आहे.
आदिमानवाने शेती सुरु केली आणि त्याला मदत करणारे बलुतेदार तयार झाले कुंभार हा त्यापैकीच एक! मातीचे घट बनविणारा कुंभार ! फिरत्या चाकावर कुंभार कौशल्याने वेगवेगळ्या आकाराचे घट बनवितो.अगदी लहानशा बोळक्यापासून मोठ्या रांजणापर्यंत असे हे घट असतात.आकारमान आणि उपयोगाप्रमाणे यांची नावेबदललेली दिसतात.लहान मुलींच्या चूल बोळक्यापासून रांजणापर्यंतचा घटाचा हा प्रवास फार पूर्वीपासून चालू आहे.सुरवातीच्या काळात हेच घट सर्व कामासाठी वापरले जात.
घट म्हणजेच घडा!
मानवाच्या जन्मापासून त्याच्या मृत्युनंतरही ज्याची गरज लागते तो घट मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. चूल बोळक्याचा खेळ खेळणारी लग्नमंडपात उभी रहते ती बोळक्यासहीतच फक्त तेथे असतो घट! नवरीने पुजावयाचा गौरीहर !लग्नानंतर संक्रांतीला सुवासिनी सुगड पूजतात ते घटाचेच वेगळे रूप.त्या पूजेतलेच एक रथसप्तमीला सूर्यपूजेसाठी वापरले जाते.असा घट,घडा माणसाने पुण्याचा साठा भरण्याकरिता म्हणजे परोपकाराकरिता वापरला तर योग्य नाहीतर पाप मार्गाने वागणाऱ्या वाल्ह्या कोळ्याप्रमाणे पापाचा घडा कधी ना कधी भरतोच!
पूर्वी ‘घट डोईवर, घट कमरेवर,’ म्हणत बायका नदीवरून पाणी आणत आता नळाचेपाणी घटात,माठात भरले जाते.अगदी घरात फ्रिज असला तरी माठातले पाणी पिणारे आजही आहेत.
पंचमहाभूतानी बनलेला आपला देहही एक घटच आहे.’ घटाघटाचे रूप आगळे,प्रत्येकाचे दैव निराळे’ असे कै.माडगूळकरांनी त्या अर्थाने म्हटले आहे.
आता लोकांना मातीच्या घटाचे पर्यावर्णीय महत्ल समजल्याने पुन्हा मातीचे घट स्वयंपाकघरात घरात अग्रस्थान मिळवू लागलेले दिसतात.कितीही निर्लेप आले तरी मातीच्या घटाचे स्थान शेवटपर्यंत अढळच रहाणार !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈