श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? ना गी ण ! ??
रविवार असल्यामुळे, नाष्टा वगैरे करून फुरसतीत दाढी करत होतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तोंड फेसाने माखल्यामुळे बायकोला म्हटलं, “बघ गं जरा कोण तडमडलय सकाळी सकाळी ते !” “बघते !” असं बोलत बायकोने दरवाजा उघडला. “मकरंद भावजी तुम्ही एवढ्या सकाळी आणि ते ही लुंगीवर आणि हे तुमच्या बरोबर कोण आलंय ?” हिचा तो तार स्वर ऐकून मी घाबरलो आणि टॉवेलने तोंड पुसत पुसत बाहेर आलो. “काय रे मक्या, काय झालंय काय असं एकदम माझ्याकडे लुंगीवर येण्या इतकं?” “वारेव्वा, मला काय धाड भरल्ये ? अरे तुलाच ‘नागीण’ चावल्ये ना ? वहिनी म्हणाल्या तसं मोबाईलवर, म्हणून शेजारच्या झोडपट्टीत राहणाऱ्या ह्या ‘गारुडयाला’ झोपेतून उठवून आणलंय, तुझी नागीण उतरवायला !” “अरे मक्या गाढवा नागीण चावली नाही, नागीण झाल्ये मला !” “असं होय, मला वाटलं चावल्ये, म्हणून मी या गारुड्याला घेवून आलो !” मी गारुड्याला म्हटलं “भाईसाब ये मेरे दोस्त की कुछ गलतफईमी हुई है ! आप निकलो.” “ऐसा कैसा साब, मेरी निंद खराब की इन्होने, कुछ चाय पानी….” मी गपचूप घरात गेलो आणि पन्नासची नोट आणून त्याच्या हातावर नाईलाजाने ठेवली. तो गारुडी गेल्यावर मी मक्याला म्हटलं “अरे असं काही करण्या आधी नीट खात्री का नाही करून घेतलीस गाढवा ? आणि नागीण चावायला आपण काय जंगलात राहतो का रे बैला ?” पण मक्या तेवढ्याच शांतपणे मला म्हणाला “अरे जंगलात नाहीतर काय ? ही आपली ‘वनराई सोसायटी’ आरे कॉलनीच्या जंगलाच्या बाजूला तर आहे ! आपल्या सोसायटीत रात्री अपरात्री बिबट्या येतो हे माहित नाही का तुला ?” “अरे हो पण म्हणून…” “मग नागीण का नाही येणार म्हणतो मी ? गेल्याच आठवड्यात बारा फुटी अजगर पकडाला होता ना आपल्या पाण्याच्या टाकी जवळ, मग एखादी नागीण…” शेवटी मी त्याची कशी बशी समजूत काढली आणि त्याला घरी पिटाळलं !
पण मक्या गेल्या गेल्या बायको मला म्हणाली, “आता साऱ्या ‘वनराईत’ तुमच्या या नागिणीची बातमी जाणार बघा !” “ती कशी काय ?” “अहो आपल्या ‘वनराई व्हाट्स ऍप गृपचे’ मकरंद भाऊजी ऍडमिन आणि अशा बातम्या ते ग्रुपवर लगेच टाकतात !” तीच बोलणं पूर होतंय न होतंय तोच आमच्या दोघांच्या मोबाईलवर, एकाच वेळेस मेसेज आल्याची बेल वाजली ! बायकोच भाकीत एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं वाटलं नव्हतं ! तो मक्याचाच व्हाट्स ऍप मेसेज होता ! “आपल्या ‘वनराईत’ बी बिल्डिंगमध्ये राहणारे वसंत जोशी यांना नागीण झाली आहे. तरी यावर कोणाकडे काही जालीम इलाज असल्यास त्यांनी लगेच जोशी यांच्याशी संपर्क साधावा, ही कळकळीची नम्र विनंती !” मी तो मेसेज वाचला आणि रागा रागाने मक्याला झापण्यासाठी मोबाईल लावणार, तेवढ्यात परत दाराची बेल वाजली ! कोण आलं असेल असा विचार करत दरवाजा उघडला, तर वरच्या मजल्यावरचे ‘वनराईतले’ सर्वात सिनियर मोस्ट गोखले अण्णा दारात काठीचा आधार घेत उभे !
“अण्णा, तुम्ही ? काही काम होत का माझ्याकडे ?” “अरे वश्या आत्ताच मक्याचा व्हाट्स ऍप मेसेज वाचला आणि मला कळलं तुला नागीण झाल्ये म्हणून ! म्हटलं चौकशी करून यावी आणि त्यावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे तो पण सांगावा, म्हणून आलो हो !” “अण्णा माझे डॉक्टरी उपाय चालू आहेत, बरं वाटेल एक दोन….” मला मधेच तोडत अण्णा म्हणाले “अरे वश्या ह्या नगिणीवर आलो्फेथीचे डॉक्टरी उपाय काहीच कामाचे नाहीत बरं !” “मग?” “अरे तिच्यावर आयुर्वेदिकच उपाय करायला हवेत, त्या शिवाय ती बरं व्हायचं नांव घेणार नाही, सांगतो तुला!” “पण डॉक्टर म्हणाले, तसा वेळ लागतो ही नागीण बरी व्हायला, थोडे पेशन्स ठेवा!” “अरे पण पेशन्स ठेवता ठेवता तीच तोंड आणि शेपटी एकत्र आली, तर जीवाशी खेळ होईल हो, सांगून ठेवतो !” “म्हणजे मी नाही समजलो ?” “अरे वश्या ही नागीण जिथून सुरु झाल्ये ना ती तिची शेपटी आणि ती तुझ्या कपाळावरून जशी जशी पुढे जात्ये नां, ते तीच तोंड !” “बापरे, असं असतं का ?” “हो नां आणि एकदा का त्या तोंडाने आपलीच शेपटी गिळली की खेळ खल्लास!” “काय सांगताय ? मग यावर काय उपाय आहे म्हणालात अण्णा ?” “अरे काय करायच माहित्ये का, रात्री मूठ भर तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी मूठभर हिरव्यागार दुर्वा आणून त्यांची दोघांची पेस्ट करून त्याचा लेप करून या नागिणीवर लावायचा ! दोन दिवसात आराम पडलाच म्हणून समज !” “अहो अण्णा, पण नागीण आता कपाळावरून केसात शिरत्ये, मग केसात कसा लावणार मी लेप ?” “वश्या तुझ्याकडे इलेक्ट्रिक रेझर असेलच ना, त्याने त्या सटवीच्या मार्गातले केस कापून टाक, म्हणजे झालं !” “अण्णा पण कसं दिसेल ते ? डोक्याच्या उजव्या डाव्या बाजूला रान उगवल्या सारखे केस आणि मधून पायावट! हसतील हो लोकं मला तशा अवतारात !” “हसतील त्यांचे दात दिसतील वश्या ! तू त्यांच हसणं मनावर घेवू नकोस!” “बरं बघतो काय करता येईल ते !” अण्णांना कटवायच्या हेतूने मी म्हणालो. “नाहीतर असं करतोस का वश्या, सगळं डोकंच भादरून टाक, म्हणजे प्रश्नच मिटला, काय ?” “अहो अण्णा, पण तसं केलं तर लोकं वेगळाच प्रश्न नाही का विचारणार ?” “ते ही खरंच की रे वश्या ! तू बघ कसं काय करायच ते, पण त्या सटविच तोंड आणि शेपटी एकत्र येणार नाही याची काळजी घे हो बरीक ! नाहीतर नस्ती आफत ओढवायची !” असं म्हणून अण्णा काठी टेकत टेकत बाहेर पडले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !
मी किचनकडे वळून म्हटलं “अगं जरा चहा टाक घोटभर, बोलून बोलून डोकं दुखायला लागलंय नुसतं !” आणि सोफ्यावर बसतोय न बसतोय तर पुन्हा दाराची बेल वाजली ! आता परत कोण तडमडल असं मनात म्हणत दार उघडलं, तर दारात शेजारचे कर्वे काका हातात रक्त चंदनाची भावली घेवून उभे ! मी काही विचारायच्या आत “ही रक्त चांदनाची भावली घे आणि दिवसातून पाच वेळा त्या नागिणीला उगाळून लाव, नाही दोन दिवसात फरक पडला तर नांव नाही सांगणार हा धन्वंतरी कर्वे !” असं बोलून आपल्या शेजारच्या घरात ते अदृश्य पण झाले! ते गेले, हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकतोय न टाकतोय तर लेले काकू, हातात कसलासा कागदाचा चिटोरा घेवून दारात येवून हजर ! लेले काकूंनी तो कागद मला दिला आणि म्हणाल्या “या कागदावर किनई एका ठाण्याच्या वैद्याच नांव, पत्ता आणि फोन नंबर आहे, ते नागिणीवर जालीम औषधं देतात ! आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्या बरं ! त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते, पण लगेच गुण येतो त्यांच्या हाताचा ! आमच्या ह्यांना झाली होती कमरेवर नागीण, पण दोन दिवसात गायब बघा त्यांच्या औषधी विड्याने ! आणि हो काम झाल्यावर हा पत्त्याचा कागद आठवणीने परत द्या बरं का !” एवढं बोलून लेले काकू गुल पण झाल्या !
मी त्या कागदावरचा नांव पत्ता वाचत वाचत दार लावणार, तेवढ्यात ए विंग मधल्या चितळे काकूंनी एक कागदाची पुडी माझ्या हातावर ठेवली आणि “ही आमच्या ‘त्रिकालदर्शी बाबांच्या’ मठातली मंतरलेली उदी आहे ! ही लावा त्या नागिणीवर आणि चिंता सोडा बाबांवर! पण एक लक्षात ठेवा हं, ही उदी लावल्यावर दुसरा कुठलाच उपाय करायचा नाही तुमच्या नागिणीवर, नाहीतर या उदीचा काही म्हणजे काही उपयोग होणार नाही, समजलं ?” मी मानेनेच हो म्हटलं आणि आणखी कोणी यायच्या आत दार बंद करून टाकलं ! आणि मंडळी घरात जाऊन पहिलं काम काय केलं असेल, तर PC चालू करून त्यावर “Please do not disturb !” अस टाईप करून त्याची मोठ्या अक्षरात प्रिंटरवर प्रिंट आउट काढली आणि परत दार उघडून पटकन बाहेरच्या कडीला अडकवून दार लॉक करून, शांतपणे सोफ्यावर आडवा झालो !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈