श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
टेक्निक !
“अगं ऐकलंस का, एक फक्कडसा चहा आण बघू, खूप दमलोय !”
“एवढ दमायला काय झालंय तुम्हांला ? चाळीतल्या पोरांनी ख्रिसमससाठी बनवलेलं ख्रिसमस ट्री चढून एकदम घरात नाही नां आलात ?”
“काहीतरीच काय तुझं ? मला अजून पायाखालच नीट दिसतंय ! तुझ्या सारख्या त्या टीव्हीवरच्या रटाळ सिरीयल बघून, मला चष्मा नाही लागलाय अजून !”
“कळलं कळलं ! आता दमायला काय झालंय ते सांगा ?”
“अगं हे काय आणलंय ते बघ तरी !”
“अ s s ग्गो बाई ! डिनर सेट !”
“करेक्ट, अगं आपल्याला लग्नात मिळालेला डिनर सेट आता किती जुना झालाय ! म्हटलं घेऊन टाकू एक नवीन !”
“हो, पण त्यात एवढं दमायला काय झालंय म्हणते मी ?”
“अगं तो बॉक्स जरा उचलून तर बघ ! सेव्हन्टी टू पिसेसचा अनब्रेकेबल डिनर सेट आहे म्हटलं ! एवढा जड डिनर सेट दोन जिने चढून आणल्यावर दम नाही का लागणार ?”
“अगं बाई, खरच जड आहे हो हा !”
“आता पटली खात्री, मी का दमलोय त्याची ! मग आता तरी आणशील ना चहा ?”
“एकच मिनिटं हं !”
“आता का s य s ?”
“अहो, या बॉक्सवर Hilton कंपनीच नांव आहे !”
“बरोबर, म्हणजे तुला इंग्लिश वाचता येतं तर !”
“उगाच फालतू जोक्स नकोयत मला !”
“यात कसला जोक? तू नांव बरोब्बर वाचलंस म्हणून……”
“तुम्हांला ना, खरेदीतल काही म्हणजे काही कळत नाही !”
“आता यात न कळण्यासारखं काय आहे ? हा डिनर सेट नाही तर काय लेमन सेट आहे ?”
“तसं नाही, अहो Milton कंपनी डिनर सेट बनवण्यात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही आणलात Hilton चा डिनर सेट, कळलं ! कुठून आणलात हा सेट ?”
“अगं तुझ्या नेहमीच्या ‘महावीर स्टोर्स’ मधून ! तो मालक मला म्हणाला पण, काय शेट आज भाभीजी नाय काय आल्या तुमच्या संगाती ! मी म्हटलं शेठ, तुमच्या भाभीजीला सरप्राईज देणार आहे आज, म्हणून तिला नाही आणलं बरोबर !”
“आणि पायावर धोंडा मारून घेतला !”
“आता यात कसला पायावर धोंडा ?”
“अहो Milton च्या ऐवजी Hilton चा डिनर सेट आणलात नां ?”
“अगं तो शेठच म्हणाला, ही Hilton कंपनी नवीन आहे, पण चांगले डिनर सेट बनवते आणि Milton पेक्षा खूपच स्वस्त, म्हणून….”
“स्व s s स्त s s ! एरवी मी दुकानात घासाघिस करतांना मला अडवता आणि आज स्वतःच डुप्लिकेट माल घेऊन आलात ना ?”
“यात कसला डुप्लिकेट माल ? हे बघ या बॉक्सवर चक्क लिहलय, Export Quality, Made in USA !”
“अहो, USA म्हणजे उल्हासनगर सिंधी अससोसिएशन पण होऊ शकत ना ? मला सांगा, हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे कशावरून ?”
“अग असं काय करतेस ? शेटजीनी मला एक सूप बाउल आणि एक डिश खाली जमिनीवर आपटून पण दाखवली !”
“मग ?”
“मग काय मग, ते दोन्ही फुटले नाहीत, म्हणजे तो सेट अनब्रेकेबल नाही का ?”
“फक्त दोनच आयटम जमिनीवर टेस्ट केले ? सगळा डिनर सेट नाही ?”
“काय गं, तुम्ही बायका भात तयार झालाय की नाही हे बघायला, फक्त त्यातली एक दोनच शीत चेपून बघता ना ? का त्यासाठी अख्खा भात चिवडता ?”
“अहो भाताची गोष्ट वेगळी आणि डिनर सेटची गोष्ट वेगळी !”
“ठीक आहे, मग हा सूप बाउल घे आणि तूच बघ जमिनीवर टाकून.”
असं बोलून मी बायकोच्या हातात त्या सेट मधला सूप बाउल दिला ! तिने तो हातात घेऊन मला विचारलं
“नक्की नां ?”
“अगं बिनधास्त टाक, अनब्रेकेबल…”
माझं वाक्य पूरं व्हायच्या आत बायकोने तो सूप बाउल जमिनीवर टाकला आणि त्याचे एक दोन नाही तर चक्क चार तुकडे झाले मंडळी !
“आता बोला ? हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे म्हणून !”
“अगं पण शेठजीने खरंच सूप बाउल खाली टाकला होता पण त्याला साधं खरचटलं पण नाही. शिवाय…..!”
“एक डिश पण नां ?”
असं बोलून तिने सेट मधली एक डिश घेतली आणि ती पण जमिनीवर टाकली. मंडळी काय सांगू तुम्हांला, ती डिश पण सूप बाउलच्या मागोमाग निजधामास गेली ! ते बघताच मी उसन अवसान आणून बायकोला म्हटलं, “अगं पण माझ्या समोर त्याने या दोन गोष्टी टाकल्या त्या कशा फुटल्या नाही म्हणतो मी ?”
“अहो हेच तर त्या व्यपाऱ्यांच टेक्निक असतं !”
“टेक्निक, कसलं टेक्निक ?”
“अहो त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे तुम्हांला कधीच कळणार नाही !”
“म्हणजे ?”
“मला सांगा, त्या शेठने ज्या सेट मधल्या बाउल आणि डिश खाली टाकल्या तो सेट तुम्हांला दिला का ?”
“नाही नां, मला म्हणाला तो शोकेसचा पीस आहे, मी तुम्हांला पेटी पॅक सेट देतो !”
“आणि तुम्ही भोळे सांब त्याच्यावर विश्वास ठेवून पेटी पॅक सेट घेवून आलात, बरोबर नां ?”
“होय गं, पण मग आता काय करायच ?”
“आता तुम्ही नां, मेहेरबानी करून काहीच करू नका ! फक्त तो बॉक्स द्या माझ्याकडे, मी बघते काय करायच ते !”
“अगं पण….”
“आता पण नाही आणि बिण नाही, आता मी माझं टेक्निक दाखवते शेटजीला ! ही गेले आणि ही परत आले ! आणि हो, मी येई पर्यंत आपल्या दोघांसाठी चहा करा जरा फक्कडसा !”
असं बोलून बायकोने तो बॉक्स लिलया उचलला आणि ती घराबाहेर पडली ! मी आज्ञाधारक नवऱ्यासारखा चहा करायला किचन मधे गेलो ! माझा चहा तयार होतोय न होतोय, तेवढ्यात हिचा विजयी स्वर कानावर आला “हे घ्या !” असं म्हणत बायकोने Milton च्या डिनर सेटचा बॉक्स जवळ जवळ माझ्यासमोर आपटलाच !
“अगं हळू, किती जोरात टाकलास बॉक्स ! सेट फुटेल नां आतला !”
“आ s हा s हा s ! काय तर म्हणे सेट फुटेल ! अहो हा काय तुम्ही आणलेला डुप्लिकेट Hilton चा सेट थोडाच आहे फुटायला ? ओरिजिनल Milton चा डिनर सेट आहे म्हटलं !”
“काय सांगतेस काय, Milton चा डिनर सेट ? अगं पण त्या शेटनं तो बदलून कसा काय दिला तुला ?”
“त्या साठी मी माझं टेक्निक वापरलं !”
“कसलं टेक्निक ?”
“लोणकढीच टेक्निक !”
“म्हणजे ?”
“अहो मी त्याला लोणकढी थाप मारली, की तू जर का मला हा Hilton चा सेट बदलून Milton चा सेट दिलास, तर मी आणखी पन्नास Milton चे सेट तुझ्याकडून घेईन !”
“काय आणखी पन्नास Milton चे डिनर सेट ? काय दुकान वगैरे….”
“अहो, मी त्याला सांगितलं पुढच्या महिन्यात माझ्या नणंदेच लग्न आहे. तेंव्हा पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मला ते हवे आहेत !”
“अगं पण तुला मुळात नणंदच नाही तर तीच लग्न…..”
“अहो हेच ते माझं लोणकढीच टेक्निक !”
“धन्य आहे तुझी !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
२४-१२-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈