श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? ललाटी इथे चिंता ! ??
“गुड मॉर्निंग पंत !”
“सुप्रभात, सुप्रभात, अग ऐकलंस का, जरा दोन कप चहा कर मस्त आलं वगैरे टाकून, मोऱ्या आलाय !”
“नको पंत, आत्ताच घरी घेवून आलोय. तुमचा पेपर देण्यासाठी आलो होतो.”
“तो देशील रे, पण आज तुझं थोडं बौद्धिक घेणार आहे, म्हणून म्हटलं जरा आल्याचा चहा घेतलास तर मेंदूला तरतरी येईल तुझ्या !”
“बौद्धिक कसलं पंत ?”
“अरे तुम्ही लोक आजकाल ते PJ वगैरे करता ना, तसलाच एक PJ मी तुला….”
“विचारा ना विचारा पंत, आपल्या चाळीत मला PJ एक्स्पर्ट म्हणूनच ओळखतात, हे ठाऊक असेलच तुम्हांला ?”
“अस्स, मग मला सांग ‘कनवटीच्या पैशाला’ काय म्हणतात ?”
“कनवट म्हणजे…. “
“भले, इथपासूनच बोंब आहे सगळी तुझी मोऱ्या, मग तू काय उत्तर देणार कप्पाळ !”
“तस नाही पंत, पण कनवट हा शब्द तसा कानावरून गेला नाही म्हणून… “
“बर, तुला सांगतो कनवट म्हणजे कंबर.”
“ओके, मग सोप आहे पंत. कनवट म्हणजे कंबर आणि सम म्हणजे पैसा, म्हणजे उत्तर ‘कंबरसम’ काय बरोबर ना ?”
“मानलं बुवा तुला, खरच एक्सपर्ट दिसतोयस तू या पीजेच्या गेम मधे.”
“पण पंत आज एकदम सकाळी सकाळी पैशाच्या गोष्टी? “
“अरे या जगात पैशा पेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण त्या घेण्यासाठी पण पैसाच लागतो रे !”
“वा पंत व्वा, काय बोललात ? जरा परत सांगता, म्हणजे नीट लिहून घेतो.”
“अरे, असे मी कुठंतरी वाचल होत मोऱ्या, ते आठवलं म्हणून तुला सांगितले इतकंच.”
“असं होय, मला वाटले हे तुमचंच वाक्य आहे की काय !”
“अरे मोऱ्या असं बघ आमची पिढीच निराळी. दुसऱ्याचे काही आपल्या नावांवर खपवण्या इतपत आमचे मन, तुमच्या तरुण पिढी इतके अजून तरी निर्ढावलेले नाही.”
“तेही खरच म्हणा, पण आज एकदम पैशाच्या गोष्टी आणि ह्या सगळ्या रिसिटस कसल्या दिसतायत ? “
“अरे ह्या सगळ्या इन्शुरन्सचे प्रीमियम भरल्याच्या रिसिटस आहेत.”
“पण पंत, ह्या सगळ्या LIC च्याच रिसिटस दिसतायत.”
“अरे आमच्या वेळेस आजच्या सारखे तुमचे पॉलिसी बाझार नव्हते बर. तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला फक्त PF आणि एकच एक विश्वासार्ह LIC काय ती होती. तेव्हा PF ला चांगला इंटरेस्ट रेट मिळायचा. तुला एक गंमत सांगू ?”
“सांगा ना पंत !”
“अरे आमच्या बँकेत जर का नवरा बायको दोघेही कामाला असतील नां, तर एकाचा 90% पगार PF मधे ठेवणारी अनेक जोडपी होती त्या काळी आमच्या बँकेत.”
“काय सांगता काय पंत? पण मग संसार कसा चालायचा त्यांचा ?”
“अरे एकाचा पगार होताच ना पुरेसा त्यासाठी, मग.”
“पंत तुम्ही पण PF मधे…”
“अजिबात नाही, रिटायर होई पर्यंत माझी मिनिमम काँट्रीब्युशन होती PF मधे 10% ची.”
“काय सांगता काय पंत, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करत होतात त्या वेळेस ?”
“माझ गणित थोडं वेगळं होत.”
“ते कसं काय ?”
“मी LIC च्या मनी बॅक पॉलिसी घेत होतो, त्यात पण टॅक्स बेनिफिट PF एवढाच मिळायचा.”
“बरोबर ! “
“आणि ३ किंवा ५ वर्षांनीं पैसे मिळाले की त्याची NSC घ्यायचो तेव्हा! मग काय 6 वर्षात पैसे डबल आणि वर त्याचा पण टॅक्स रिबेट मिळायचा. पण त्यात दुसरी एक महत्वाची जमेची बाजू पण होती मोऱ्या.”
“ती कोणती ? “
“अरे असं बघ, मी जरी 90% PF काँट्रीब्युट केला असता आणि जर का माझे काही बरे वाईट झाले असते तर हिला माझे PF चे पैसे आणि त्यावरचे व्याजच मिळाले असते, पण इन्शुरन्स काढल्यामुळे जर का तसा प्रसंग आला असता तर त्याच्या कितीतरी पट…. “
“हो, कळलं मला, पण तेव्हा शेअर मार्केट हा सुद्धा पर्याय उपलब्ध….. “
“अब्रम्हण्यम्, अब्रम्हण्यम् ! अरे त्या वेळेस शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार अशी आमच्या भटा ब्राम्हणांची समजूत, त्याच्या वाऱ्याला सुद्धा फिरकायला बंदी होती घरून !”
“काय सांगता काय पंत, मार्केट म्हणजे सट्टा… “
“अरे अशी त्या वेळेस मध्यमवर्गीय लोकात समजूत होती खरी आणि तुला सांगतो, अरे फोर्टला बँकेत असतांना मी “लिधा – बेचा”चा कलकलाट या कानांनी ऐकलाय बर. तुमचा तो मार्केटचा टॉवर आणि ऑनलाईन ट्रेडिंग आत्ता आत्ता सुरु झाले. आताच्या सारखे घर बसल्या बोल्टवर तेव्हा लाखोंचे व्यवहार होत नव्हते ! तुम्हाला शेअर विकायचे असतील किंवा विकत घ्यायचे असतील तर तो व्यवहार सटोडिया मार्फतच करावा लागायचा.”
“अरे बापरे, मग कठीणच होता तो काळ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने.”
“अरे म्हणून तर मी LIC मधेच जास्तीत जास्त पैसे गुंतवले तेव्हा आणि लोकांनाही तसेच सांगत होतो. पण आता हल्लीच्या LIC बद्दलच्या उलट सुलट बातम्या ऐकून तसे करण्याचे धाडस होत नाही एव्हढे मात्र खरे.”
“हो मी पण ऐकून आहे त्याबद्दल, बघूया काय काय होते ते. पण पंत एक सांगा, आजच्या ललाटी इथे चिंता ! या मथळ्याचा काय संबंध ते नाही लक्षात आलं.”
“अरे स्वतःला एव्हढा PJ एक्स्पर्ट म्हणवतोस ना मग सांग बर या मथळ्यात काय गुपित दडले आहे ते.”
“नाही पंत, हरलो, आता तुम्हीच ते सांगून माझी सुटका करा म्हणजे झालं.”
“अरे सध्या, ‘योग क्षेमं वहाम्यहंच’ काही क्षेम दिसत नाही म्हणून तसा मथळा दिलाय.”
“असं, असं !”
“आणि दुसरं म्हणजे Llati Ithe Chinta ! असे जर इंग्रजीमधे लिहिलेस तर त्यांच्या अद्याक्षरा पासून काय तयार होते, L I C !”
“कमाल झाली तुमची पंत ! आजपासून आपल्या चाळीचे नवे PJ एक्स्पर्ट म्हणून मी तुमचं नांव घोषित करतो !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈