श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
टे स्ट र ! ?
“अगं ऐकलंस का ?”
“का s s य आहे ?”
“चहा घेतलास का तू ?”
“मी तुमच्या सारखी सूर्यवंशी नाही, माझा चहा कधीच झालाय!”
“मग तुला तो आज जरा वेगळा…..” “अजिबात लागला नाही, नेहमीसारखीच तर त्याची चव आहे.”
“अगं मला तो आज फारच बेचव लागतो आहे, म्हणून विचारलं.”
“हे बघा आज पासून मी केलेल्या कुठल्याही पदार्थाला नांव ठेवणं अजिबात बंद, कळलं ? जे पुढ्यात येईल ते नांव न ठेवता गपचूप खायचं आणि प्यायचं कळलं ?”
“म्हणजे काय, आता आज चहा पुचकावणी झालाय हे पण बोलायची चोरी ?”
“मी आत्ता काय कानडीत बोलले, कुठल्याही पदार्थात चहा पण येतो !”
“आणि मी तसं म्हटलं तर?”
“मी आमच्या हो. मे. सं. कडे तुमची तक्रार करीन हं !”
“आता हे हो मे सं का काय म्हणालीस, ते नक्की काय आहे ते सांगशील का जरा !”
” अहो दोन महिन्या पूर्वीच आम्ही आमचा ‘होम मेकर संघ’ स्थापन केलाय.”
“अगं पण तुमचं बायकांचं ऑलरेडी एक ‘अनाकलनिय महिला मंडळ’ आहे ना ? मग आता हा पुन्हा नवीन संघ कशाला ?”
“अहो उगाच आमच्या मंडळाचे नांव नका खराब करू ! त्याचे नांव ‘अनारकली महिला मंडळ’ आहे!”
“तेच गं ते, तर ते एक मंडळ असतांना हा नवीन संघ कशाला काढलात ?”
“अहो, असं काय करता, त्या मंडळात नोकरी करणाऱ्या महिलां सुद्धा आहेत ! पण त्यांचे प्रश्न वेगळे आणि आमचे प्रश्न वेगळे.”
“ते कसे काय बुवा ?”
“असं बघा, आमच्या या नवीन होम मेकर संघात फक्त नोकरी न करणाऱ्या बायकांचा, ज्या फक्त ‘रांधा वाढा उष्टी काढा’ अशी माझ्यासारखी घरकामं करतात त्यांचाच समावेश आहे !”
“बरं, पण तुमचे प्रश्न वेगळे म्हणजे काय ?”
“म्हणजे हेच, स्वतःच्या नवऱ्याचे कशावरूनही टोमणे खाणे, आम्ही केलेल्या अन्नाला नांव ठेवून आमचा मानसिक छळ करणे, इत्यादी, इत्यादी !”
“यात कसला मानसिक छळ, मी फक्त चहा….”
“तेच ते, त्यामुळे आम्हां बायकांच्या मनाला किती वेदना होतात ते तुम्हाला कसं कळणार ?”
“काय गं, कुणाच्या डोक्यातून ही संघ काढायची कल्पना आली ?”
“अहो त्या दुसऱ्या मजल्यावरच्या लेले काकू आहेत ना, त्यांनी वकिलीची online परीक्षा दिली होती मागे.”
“बरं मग ?”
“तर अशाच आम्ही दुपारच्या गप्पा मारायला जमलो होतो, तेंव्हा त्यानी ही कल्पना मांडली आणि आम्ही तिथल्या तिथे होम मेकर संघ स्थापून मोकळ्या झालो.”
“बरं बरं ! पण या तुमच्या संघाकडे कुणा बायकोने, स्वतःच्या नवऱ्या विरुद्ध तक्रार केली तर, त्याचा न्याय निवडा कोण करत ?”
“आमच्या संघाच्या अध्यक्षिणबाई, मंथरा टाळकुटे !”
“अगं पण तिला तर तुम्ही सगळ्या बायका खाजगीत आग लावी, चुगलखोर असं म्हणता नां, मग ती कशी काय अध्यक्ष झाली संघाची ?”
“अहो तिचे मिस्टर पूर्वी ख्यातनाम जज होते, एवढं qualification तिला पुरलं अध्यक्ष व्हायला !”
“अस्स अस्स ! अग पण जज साहेब जाऊन तर बरीच वर्ष झाली नां ?”
“म्हणून काय झालं ? जज साहेब हयात असतांना मंथराबाईं बरोबर, त्यांनी न्याय निवडा केलेल्या कितीतरी केसेसेची चर्चा ते करत असत. त्या मुळे मंथराबाईंना अशा केसेस….”
“अशा केसेस म्हणजे ? अग आम्ही नवरे मंडळी काय चोरी, डाका, मारामाऱ्या करणारे वाटलो की काय तुम्हांला ?”
“तसं नाही पण….”
“अगं नुसतं चहा बेचव झालाय, आज आमटी पातळ झाल्ये हे स्वतःच्या बसायकोला बोलणं आणि चोरी, डाका, मारामाऱ्या यात काही फरक आहे का नाही ?”
“आहे नां, पण तुम्ही असं बोलल्यामुळे आमच्या मनाला किती यातना होतात, सगळी मेहनत पाण्यात गेली असं वाटतं त्याच काय ? मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ? म्हणून हा संघ स्थापन केलाय आम्ही.”
“काय गं, आत्ता पर्यंत कोणा कोणाला आणि कसली शिक्षा केल्ये तुमच्या अध्यक्षिण बाईंनी ?”
“अहो कालचीच गोष्ट, काल कर्वे काकूंची तक्रार आली होती त्यांच्या मिस्टरांबद्दल.”
“कसली तक्रार ?”
“अहो काल सकाळच्या जेवणात काकूंच्या हातून आमटीत मीठ जरा जास्त पडलं म्हणून…”
“करव्या तिला बोलला तर काय चुकलं त्याच ?”
“चुकलं म्हणजे, एवढ्याशा कारणावरून कर्वे काकांनी काकूंच्या माहेरचा उद्धार केला ! मग काकू पण लगेच तक्रार घेऊन गेल्या मंथराबाईंकडे आणि अध्यक्षिण बाईंनी त्यांना शिक्षा केली.”
“म्हणजे चूक करवीणीची आणि शिक्षा करव्याला का ?”
“अहो बोलून बोलून त्यांचा मानसिक छळ केल्या बद्दल.”
“काय शिक्षा फार्मावली अध्यक्षिणबाईंनी?”
“कर्वे काकांना काकूंनी रात्री उपाशी ठेवायचं.”
“अगं पण तो डायबेटीसचा पेशंट आहे, त्याला रात्री जेवल्यावर गोळी घ्यायची असते आणि तो रात्री जेवला नाही तर….”
“अहो म्हणूनच उदार होऊन आमच्या अध्यक्षिणबाईंनी, त्यांना रात्री दुधा बरोबर एक पोळी खायची परवानगी दिली ! तशा प्रेमळ आहेत त्या !”
“कळलं कळलं! आता मला सांग ती मंथरा एकटीच राहते का कोणी….”
“अहो त्यांची नर्मदा नावाची मावशी आहे, ती असते त्यांच्या सोबतीला आणि तीच घरच सगळं काम करते.”
“स्वयंपाक पण ?”
“आता सगळं काम म्हटलं की त्याच्यात स्वयंपाकपण आलाच नां ?”
“मग मला सांग तुमच्या अध्यक्षिणबाईंनां शिक्षा कोण करणार ?”
“त्यांना कशाला शिक्षा ?”
“अगं ती कोण नर्मदा मावशी आहे, तिच्या हातून स्वयंपाक बिघडला, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती कजाग मंथरा, त्यांना बोलल्याशिवाय राहणार आहे का ?”
“अगं बाई खरच की ! हे कसं लक्षात आलं नाही आम्हां बायकांच्या ?”
“कसं लक्षात येणार ? पण यावर माझ्याकडे एक उपाय आहे.”
“काय?”
“आजपासून तू त्या मंथरेकडेच सकाळ संध्यकाळ जेवायला जात जा!”
“म्हणजे काय होईल ?”
“अगं म्हणजे एखाद दिवशी स्वयंपाक बिघडला तर ती मंथरा गुपचूप जेवते का नर्मदेचा उद्धार करते ते कळेल नां.”
“अहो पण असं बरं दिसणार नाही आणि समजा मी गेले त्यांच्याकडे रोज जेवायला तर तुमच्या जेवणाचं काय?”
“मी ठेवीन की बाई !”
“काय?”
“अगं स्वयंपाकाला आणि तिचा स्वयंपाक बिघडला तर तिला हक्काने सुनवीन पण आणि त्यावरून मला त्या करव्या सारखी शिक्षा पण नको भोगायला.”
“वारे वा, घरात एवढी अन्नपूर्णा असतांना स्वयंपाक करायला बाई कशाला? त्या पेक्षा मीच होमेसं चा राजीनामा देते म्हणजे प्रश्नच नाही !”
“अगं पण त्यामुळे तू बिघडवलेल्या अन्नाच्या चवीचा मूळ प्रश्न थोडाच सुटणार आहे.”
“हो, तेही खरंच. मग यावर तुम्हीच एखादा उपाय सांगा, म्हणजे झालं.”
“अगं साधा उपाय आहे आणि तो तू तुमच्या सगळ्या महिला मंडळाला सांगितलास तर तुमचा तो संघ आपोआप बरखास्त झालाच म्हणून समज.”
“काय सांगताय काय, मग लवकर सांगा बघू तो उपाय.”
“तुला माहित्ये, सगळ्या थ्री स्टार, फाईव्ह स्टार, सेवन स्टार हॉटेलात लाख, लाख पागर देऊन एक “टेस्टरची” पोस्ट असते आणि त्याच काम फक्त हॉटेलात लोकांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर त्या पदार्थाची चव त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आहे का नाही, हे चाखून बघणं.”
“पण त्याचा इथे काय….”
“अगं तेच सांगतोय नां, तू एखादा पदार्थ केलास तर तो वाढण्यापुर्वी चाखून बघायचा, म्हणजे मग….”
“त्यात काय कमिजास्त आहे ते कळेल आणि तो वाढण्यापूर्वीच खाणेबल किंवा पिणेबल करता येईल, असंच नां ?”
“अगदी बरोबर, मग आता जरा नवीन फक्कडसा चहा….”
“आत्ता आणते आणि हो आधी त्याची टेस्ट घेऊनच बरं का !”
असं बोलून माझ्या घरची न्युली अपॉइंटेड टेस्टर किचन मधे पळाली आणि मी मनाशी हसत हसत सुटकेचा निश्वास टाकला !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈