सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ चूको मत चौहान – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते “हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान”!
अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने परदेशी इस्लामिक आक्रमक मोहम्मद घौरी ला सोळा वेळा पराभूत केले होते आणि प्रत्येक वेळी उदारपणा दाखवत त्याला जिवंत सोडले, परंतु सतराव्या वेळेस त्यांचा पराभव झाला, तेव्हा मोहम्मद घौरी ने त्यांना सोडले नाही. त्याने त्यांना बंदिवान करून काबुल-अफगाणिस्तानात नेले. सोळा वेळेस पराभूत झाल्यावर ज्या घौरीने दया म्हणून प्राणाची भीक मागितली तोच घौरी बंदी केलेल्या पृथ्वीराजांवर आसूड ओढत होता आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी अनन्वित छळ करीत होता. “प्राण गेला तरी बेहत्तर पण इस्लाम स्वीकारणार नाही” असे म्हणून डोळ्यास डोळा भिडवणाऱ्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले होते!
पृथ्वीराजांचा इमानी राजकवी “चंद बरदाई”, आपल्या राजाला, पृथ्वीराजांना भेटायला थेट काबूलला पोहोचला! तेथील कैदेत असताना पृथ्वीराजांची दयनीय अवस्था पाहून चंद बरदाईच्या मनाला तीव्र धक्का बसला… आपल्या राजाचे असे हाल करणाऱ्या घौरीचा त्याने सूड घेण्याचे ठरवले… आपली योजना त्याने आपल्या राजांना सांगितली आणि विनंती केली कि, “हे राजा, आपण या घौरीला इतकेवेळा माफ केले, पण आता या सापाच्या अवलादीचा वध करण्याची वेळ आली आहे!”
चंद बरदाई घौरीच्या दरबारात आला…. त्याने घौरीला सांगितले की, “आमचा राजा एक महाप्रतापी सम्राट आहे… तो एक महावीर योद्धा तर आहेच पण माझ्या राजाची तुला अवगत नसलेली एक खासियत म्हणजे, आमचे राजे ध्वनी-लक्ष-भेदनात प्रवीण आहेत! नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण चालवून अचूक सावज टिपण्यात ते तरबेज आहेत! जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्या शब्दभेदी बाणांची अद्भुत कामगिरी स्वतः पाहू शकता!
यावर घौरीचा विश्वासच बसेना, तो म्हणाला, “अरे, मी तर तुझ्या राजाचे दोन्ही डोळे फोडले आहेत… मग तो आंधळा कसा काय धनुष्यबाण चालवणार?”
चंद बरदाई अदबीने उत्तरला, “खाविंद, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ही विद्या पाहू शकता… माझ्या राजांना इथे दरबारात बोलवा… काही अंतरावर लोखंडाचे सात तवे ठेवा…. आणि त्यांचा आवाज करायला सांगा…. माझे राजे आपल्या धनुष्यबाणाने त्या सातही तव्यांचे भेदन करतील!”
घौरी कुत्सितपणे हसला नि म्हणाला, “तू तर फारच प्रशंसक आहेस तुझ्या राजाचा! पण एक लक्षात ठेव…. जर का तुझा राजा हि कला दाखवू शकला नाही, तर त्याच दरबारात मी तुझे आणि तुझ्या राजाचे डोके उडवून लावीन!”
चंद बरदाईने घौरीची अट मान्य केली आणि बंदिगृहात आपल्या लाडक्या राजांच्या भेटीला आला. तिथे त्याने पृथ्वीराजांना घौरीसोबत झालेली बातचीत सांगितली, दरबाराची सविस्तर मांडणी विशद केली आणि दोघांनी मिळून आपली योजना आखली….
ठरल्याप्रमाणे घौरीने दरबार भरवला आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आमंत्रित केले…. भालदार चोपदार यांनी मोहम्मद घौरी दरबारात येत असल्याची वर्दी दिली…. आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला!
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈