श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? बॅलेन्टाईन डे ! ?
“काय पंत, आज एकदम ठेवणीतला ड्रेस घालून स्वारीचे प्रस्थान कुठे ?”
“अरे आज आमच्या सिनियर सिटीझनचा ‘बॅलेंटाईन डे’ आहे बर.”
“तुमची काहीतरी गडबड होत्ये पंत, तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणायचं आहे का ?”
“उगाच नेहमी सारखा आगाऊ पणा नकोय, तो ‘व्हॅलेंटाईन डे’ तुमचा, आमचा ‘बॅलेंटाईन डेच’ आहे आज.”
“म्हणजे मी नाही समजलो?”
“अरे परवा लेल्याचा मुलगा आला US वरून आणि येतांना त्याने ‘बॅलेंटाईन स्कॉच’ आणली आहे आमच्या सिनियर सिटीझन ग्रुपसाठी. मग लेले म्हणाला या सगळयांनी घरी शनिवारी संध्याकाळी, आपण आपला ‘बॅलेंटाईन डे’ साजरा करू. म्हणून त्याच्याकडेच चाललोय.”
“Ok, एन्जॉय करा पण लेले काकूंना हे चालत ?”
“अरे नाही चालत, पण त्या गेल्यात पुण्याला, सत् संग करायला आणि तोच मोका साधून आमचे आज ‘बॅलेंटाईन डेच’ सेलेब्रेशन आहे.”
“पुण्याला आणि सत् संग करायला ?”
“का, पुण्याचे लोक सत् संग करत नाहीत ?”
“तसच काही नाही, पण आपल्या शिवाजी पार्कात कुठंही सत् संग चालत नाही की काय, उगाच एव्हढे त्यासाठी लांब पुण्याला कशाला जायला हवे ?”
“तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण त्यांचे माहेर पुण्याचे, उभे आयुष्य पुण्यात…. “
“गेले असेल, पण सत् संग तो सत् संग, तो मुंबईत केला काय आणि पुण्यात केला…. “
“असे तुला वाटत, पण त्यांच मत थोडं वेगळे आहे.”
“यात कसलं आलं आहे मत, सत् संग सगळीकडे सारखाच असतो ना ?”
“अरे त्या इथे पण एक दोनदा
सत् संगाला गेल्या होत्या, पण त्यांच म्हणणं असं पडलं की इथल्या सत् संगाला पुण्याची सर नाही.”
“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो?”
“अरे ती एक पुण्याची मानसिकता आहे, आमच्याकडे जे जे आहे, मग ते काहीही असो, ते जगात कुठेच नाही आणि आपण मुंबईकर त्यांचा तो भ्रम दूर करू शकत नाही, एव्हढे बरीक खरे.”
“ते ही खरच आहे म्हणा.”
“आणि लेले काकू पुण्याला गेल्यात हे आमच्या दृष्टीने बरेच नाही का ? नाहीतर आम्ही आमचा ‘बॅलेन्टाईन डे’ कसा साजरा केला असता, काय बरोबर ना ?”
“Ok, एन्जॉय करा पंत, पण मला एक कळत नाही हे तुमच्या नातवाचे चांदीचे बोंडले कशाला घेतले आहे तुम्ही बरोबर ?”
“अरे आज आम्ही तेच पेग मेझर म्हणून वापरणार आहोत !”
“काय, चांदीचे बोंडले पेग मेझर म्हणून वापरणार तुम्ही ?”
“तुझी चेष्टा कळते बर मला, पण आता वय झाले. तुझ्या वयाचा होतो तेव्हा….. “
“ते तुम्ही मागे एकदा सांगितले होतं आणि माझ्या ते चांगल लक्षात आहे. आत्ताच्या या तुमच्या पेग मेझरच काय ते…. “
“सांगतो, सांगतो. मगाशीच मी तुला म्हटलं, लेले काकू मूळच्या पुण्याच्या, तर त्यांनी
पुण्याला जाताना, लेल्याने काही उद्योग करू नयेत म्हणून, पार्टीचा सगळा सरंजाम कपाटात ठेवून, चावी आपल्या बरोबर नेली आहे पुण्याला, अस मला लेल्यानेच सकाळीच फोन करून कळवले, म्हणून हे…. “
“पण म्हणजे तुमची ‘बॅलेन्टाईन’ पण कपाटात…… “
“नाही नाही, ती आधीच जोशाच्या घरी सुखरूप आहे आणि जोश्या ती येतांना घेऊनच येणार आहे.”
“काय सॉलिड फिल्डिंग लावली आहे तुम्ही लोकांनी पार्टी साठी, मानलं तुम्हाला !”
“मानलंस ना, मग आता तू जा तुझ्या रस्त्याने आणि मी…. “
“जातो जातो, पण एक शंका आहे.”
“आता कसली शंका?”
“पेग मेझरच काम झाल, पण ग्लासचे काय, पाहिजे तर माझ्याकडचे….. “
“काचेचे अजिबात नको आणि तुझ्या कडचे नकोच नको, उगाच सगळीकडे बोंबाबोंब करशील.”
“मग काय द्रोणातून स्कॉच…. “
“उगाच वाटेल ते बडबडू नकोस, तेव्हढी अक्कल आहे आम्हाला.”
“पण मग ग्लासांचा प्रश्न… “
“आम्ही सोडवला आहे.”
“तो कसा काय पंत?”
“अरे असं बघ, आमच्या ग्रुप मधे बहुतेक सगळ्यांनाच डायबेटीस आहे आणि प्रत्येकाकडे जांभळाच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला लाकडी ग्लास आहे, त्यामुळे तो पण प्रश्न…. “
“निकाली लागला असंच ना ?”
“बरोबर ओळखलस !”
“पंत, म्हणजे पेग मेझर आणि ग्लासांचा प्रश्न तर सुटला, पण मग ही ‘बेनाड्रील सिरप’ची बाटली कशाला बरोबर घेतली आहे तुम्ही? “
“अरे सांगतो सांगतो, एकदा अशाच सेलेब्रेशनच्या वेळेला कुलकर्णीला एक पेग मध्येच झाली आणि सगळ्यांनी ठरवले की आता त्याला आणखी द्यायची नाही.”
“बर मग !”
“मग काय, पठया ऐकायला तयार नाही, आणखी पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. पण त्याची एक पेग नंतरची अवस्था बघून त्याला आणखी स्कॉच द्यायला कोणीच तयार नव्हतं.”
“पुढे”
“पुढे काय, जोश्यानेच अक्कल चालवून देतो, देतो म्हटलं आणि त्याचा ग्लास घेवून गेला किचन मधे आणि कपाटातली बेनाड्रीलची बाटली काढून ते चांगल अर्धा ग्लास भरून वर पाणी टाकून ग्लास फुल करून दिला कुल्कर्ण्याच्या हातात, तेव्हा कुठे तो थंड झाला आणि आज पण कुलकर्णी पार्टीला आहे, म्हणून म्हटलं असावी एखादी बेनाड्रीलची बाटली इमर्जंसी म्हणून.”
“खरच धन्य आहे तुमची पंत !”
“आहे ना, मग येतोस का आम्हाला कंपनी द्यायला, बोल ? “
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈