श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

 ? सोनेरी उपाय ! ?

“गुड मॉर्निंग पंत ! आज मॉर्निंग वॉक लवकर झाला का तुमचा ?”

“लवकर वगैरे काही नाही, माझ्या सगळ्या गोष्टींच वेळापत्रक ठरलेलं असतं आणि मी माझ्या रोजच्याच वेळेला घरी आलो आहे आणि माझा चहा सुद्धा झाला आहे, त्यामुळे तुला चहा…. “

“असं काय पंत रोज तुमच्यकडेच चहा घेवून माझी सकाळ…. “

“सुरु व्हायची, आता ते विसर.”

“असं करू नका पंत, अहो ही अजून उठली नाही, ती उठणार कधी, चहा करणार कधी ?”

“मोऱ्या, ते सगळं खरं असलं तरी आजपासून तुझा चहाचा रतीब बंद म्हणजे बंद !”

“पंत, एव्हढे नका निष्ठुर होऊ, एक कप चहाचा तर प्रश्न आहे !”

“प्रश्न नुसत्या एक कप चहाचा नाही मोऱ्या, गॅसचा पण आहे आणि कालपासूनच गॅस आणखी महाग झाला आहे, माहित आहे ना? “

“हो पंत, मी पण वाचलं काल पेपरात. पण सरकार तरी काय करणार ना?”

“काय करणार म्हणजे, निवडणुका जवळ आल्यावर सगळी कशी स्वस्ताई होते ? मग आत्ताच काय…. “

“पंत निवडणूक आणि गॅसचे दर यांचा काहीच संबंध नाही ! जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कमी जास्त ….. “

“होण्यावर ते दर अवलंबून असतात हे ठाऊक आहे मला, तू नको अक्कल शिकवू ! तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे पहिले आहेत मी, हे विसरू नकोस !”

“हो ना, मग तुम्हीच सांगा त्यावरचा एखादा उपाय आता !”

“अरे माझ्याकडे यावर, निदान आपल्या दोन चाळींसाठी तरी पर्मनंट उपाय आहे, आता बोल !”

“मी काय बोलणार पंत ? तुम्ही उपाय सांगितलात, तर चाळीच्या भाडेकरू संघाचा अध्यक्ष या नात्याने तो लोकांना सांगून, लोकांना तो पटला तर त्याची अंमलबजावणी करीन एव्हढे मात्र नक्की !”

“हो ना, मग ऐक ! आपल्या दोन चाळी मिळून एकूण  किती बिऱ्हाडे आहेत ?”

“काय पंत, तुम्ही सर्वात जुने भाडेकरू, तुमच्या ओळखीनेच तर आम्हाला इथे खोली मिळाली, अशी आठवण बाबा सांगायचे ते आठवतंय मला.”

“ते सगळे सोड, बिऱ्हाड  किती ते सांग.”

“असं बघा, तळ मजला आणि चार मजले धरून साधारण एका चाळीत पंच्याहत्तर प्रमाणे दोन चाळीत दीडशे !”

“बरोब्बर आणि एका कुटुंबात साधारण नातेवाईक धरून, राहणाऱ्यांची संख्या सरासरी आठ धरली तर दोन चाळीत मिळून बाराशे लोक राहतात, पै पाहुणा सोडून, बरोबर ?”

“बरोबर, पण त्याचा गॅसशी….”

“सांगतो सांगतो, जरा धीर धरशील का नाही ?”

“पंत तुम्ही असा सस्पेन्स क्रिएट करताय की, तो उपाय मला कळला नाही तर मलाच गॅसवर ठेवायची वेळ येईल आता !”

“हां, तर आपल्या दोन चाळीतल्या बाराशे लोकांचं जे रोज सोनखत तयार होत, ते वापरून दोन चाळींच्या मधे एक बायोगॅसचा प्लँट उभा करायचा आणि पाईपने सगळ्यांना गॅस पुरवायचा, कशी आहे आयडिया माझी ?”

“फँटॅस्टिक आयडिया पंत, खरच मानलं तुम्हाला !”

“मानलं ना, मग आता लगेच भाडेकरू संघाची मिटिंग बोलाव आणि हा प्रस्ताव मांड बर त्यांच्या पुढे.”

“हो लगेच लागतो त्या कामाला, पण पंत यात मला एक प्रॉब्लेम दिसतोय !”

“कसला प्रॉब्लेम ते आत्ताच वेळेवर सांग, म्हणजे लगेच त्यावर उपाय पण सांगतो !”

“असं बघा  पंत, बायोगँस प्लॅन्ट उभा करायचा तर सुरवातीला भरपूर खर्च येणार आणि आपले भाडेकरू तर सहा सहा महिने घराचे भाडे भरत नाहीत तर या प्लँट साठी कुठून पैसा…. “

“देणार, असच ना ?  मग ऐक, त्यावर सुद्धा माझ्याकडे जालीम उपाय आहे मोऱ्या !”

“सांगा, सांगा पंत, म्हणजे मिटिंग मधे हा मुद्दा कोणी काढला, तर मी तसे उत्तर द्यायला मोकळा !”

“अरे पैशाची चिंता अजिबात करू नकोस तू मोऱ्या, आपल्या नॅशनलाईज बँका बसल्या आहेत ना कर्ज द्यायला !”

“पंत अहो त्या बँका भले कर्ज देतील, पण ते फेडणार कोण? आपले लोक सहा सहा महिने घरभाडे…… “

“देत नाहीत हे मला तू मगाशीच सांगितलंस आणि तेच तर त्यांचे क्वालिफिकेशन आहे !”

“असं कोड्यात नका बोलू पंत, नीट काय ते उलगडून सांगा बघू.”

“अरे असं बघ, बँकांची घेतलेली कर्ज ही परतफेडीसाठी नसतातच मुळी, ती बुडवण्यासाठीच घेतलेली असतात असाचं लोकांचा धृढ विश्वास आहे आणि लोक त्या प्रमाणे वागून तो अगदी सार्थ ठरवतात !”

“तुम्ही म्हणता ते कळतंय मला, पण उद्या बँक जर कोर्टात गेली तर… “

“तर काय ? आपण हात वर करायचे आणि आम्ही कंगाल आहोत हे कोर्टात जोरात ओरडून सांगायच, म्हणजे आपले पण कर्ज माफ होईल !”

“कसं शक्य आहे हे पंत, तुमच आपल काही तरीच असतं !”

“का, का शक्य नाही ? अरे अनिल अंबानी सारखा करोडपती उद्योगपती आपण कंगाल आहोत, हे भारतातल्या नाही, तर परदेशातल्या कोर्टात ओरडून ओरडून सांगतो, तर आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांनी तसे भारतातल्याच एखाद्या कोर्टात ओरडून सांगायला कसली आल्ये लाज ?”

“तुम्ही म्हणता ते खोटं नाही, पण मध्यमवर्ग मुळातच कर्ज काढायला घाबरतो आणि त्यात ते बुडवणे म्हणजे… “

“तू म्हणतोयस ते खरच आहे ! मग कसं करायचे ते तूच सांग आता.”

“पंत, माझ्या पण डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे !”

“बघ माझ्या संगतीचा परिणाम ! बर सांग तर खरी तुझी आयडिया मोऱ्या.”

“सांगतो ना ! आपण काय करू या, आपल्या प्लॅन्ट मधे जो जास्तीचा गॅस तयार होईल तो आपण आपल्या शेजारच्या चाळकऱ्यांना विकून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून, आपण बँकेचे कर्ज फेडू !”

“मस्त, ही खरी मध्यमवर्गीय मानसिकता !  एक रुपया सुद्धा कर्ज नको डोक्यावर त्याला ! मग कशी गोळया न घेता रोज शांत झोप लागते ! हे स्वर्गसुख त्या उद्योगपतींच्या नशिबात नाही, हेच खरे ! काय बरोबर ना मोऱ्या ?”

“अगदी बरोब्बर पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments