श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
माझी भविष्यवाणी तुमच्या राशीला ! श्री प्रमोद वामन वर्तक
मेष (मेंढा)
सध्या घरात जास्त काम कोण करत यावरून, एकाची जरी ही रास असेल, तरी दोघात टकरी संभवतात ! आणि दोघांची हीच रास असेल तर, त्या टकरीने दोघेही रक्त बंबाळ होई पर्यंत टोक गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही !
वृषभ (बैल)
एकाने दुसऱ्याच्या शिंगा पासून या आठवड्यात बचाव करायचा आहे ! उगाच आपापली शिंग एकात एक अडकवून, खडाखडीचा सामना टाळणे दोघांच्या हिताचे आहे एवढं लक्षात ठेवा !
मिथुन (जोडी)
एकमेकांच्या सहकार्यामुळे, घरातली काम हलकी होतं आहेत, असा तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे ! पण जोडीदारापैकी ज्याची ही रास असेल तो अथवा ती, आपण केलेल्या कामांची कुठे तरी नोंद करून ठेवत असेल आणि योग्य वेळ येताच ती डायरी आपल्या जोडीदारासमोर धरेल याची खात्री बाळगा !
कर्क (खेकडा)
पंखा पुसायच्या निमित्ताने आपण स्टुलावर चढला असाल, तर काळजी घ्या ! जोडीदारापैकी ही ज्याची रास असेल तो अथवा ती, काहीतरी निमित्त करून “पाय” ओढून आपणास स्टुलावरून खाली पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही !
सिंह (सिंह)
जंगलात, (म्हातारा नसेल तर) सिहं राजा असतो, एव्हढेच फक्त ध्यनात ठेवा ! त्यामुळे, स्वतःचा बचाव कसा करता येईल याकडे लक्ष देवून या आठवड्यात वागावे लागेल !
कन्या (मुलगी)
ज्या नवऱ्याची ही रास असेल, त्याला या आठवड्यात, काय मुलीं सारखी हळू हळू काम चालली आहेत, असे बोल बायको कडून ऐकायला येण्याची शक्यता नाकारता येत नाही !
तूळ (तराजू)
नवरा बायकोने एकमेकांशी बोलतांना, तोलून मापून बोलण्यात शहाणपणा आहे हे ध्यनात ठेवावे ! नाहीतर त्याचे पर्यवसान, हातात तराजू आणि डोळयांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेच्या साक्षीने, दोघातील भांडणं सोडवण्या पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी काळजी घ्या !
वृश्चिक (विंचु)
आपल्याला नांगीरुपी जिभेवर या आठवड्यात ताबा ठेवून दुसऱ्याशी बोलायचे आहे हे ध्यानात ठेवा ! तरच निभाव लागेल !
धनू (धनुर्धारी)
आपल्या मुखाच्या भात्यातून सुटणाऱ्या वाग्बाणामुळे जोडीदार घायाळ झाल्यावर, चुकून बाण सुटला, अशी सारवासारव या आठवड्यात आपल्यावर करण्याची वेळ
येवू शकते !
मकर (मगर)
कामाच्या बोजामुळे म्हणा, अथवा अन्य काही कारणामुळे म्हणा, आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू हे खरोखरचे आहेत आणि ते नक्राश्रू नाहीत, याची खात्री जोडीदारास करून द्यावी लागेल !
कुंभ (घडा)
सध्या आपली मानसिक स्थिती आपल्यावर आलेल्या एखाद्या प्रसंगामुळे विचलित होऊ शकते ! तसेच छोटया छोटया कारणावरून, दुसऱ्याचा पाणउतारा करून, त्याचा अहंकाररुपी घडा आपल्या हातून फुटणार नाही याची काळजी घेतलेली बरी !
मीन (मासा)
संसाररुपी सागरात दोघांनी एकत्र रहायचं असल्यामुळे, दोघांनी एकमेकांना पाण्यात पहायचे या आठवड्यात सोडून द्यावे लागेल !
© प्रमोद वामन वर्तक
२९-०४-२०२२
ठाणे.
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈