श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! 😂 💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“काय गं हे सुनबाई ?”

“काय झालं आई ?”

“अगं आज चहाला काही चव नां ढव, नुसता पुचकावणी झाला आहे !”

“अहो रोजच्या सारखाच तर केलाय ! तुमच्या तोंडाची चव गेली असेल, म्हणून तसा लागतं असेल !”

“माझ्या तोंडाची चव जायला मी काय आजारी आहे ?”

“तसं नाही, पण या वयात जाते म्हणे कधी कधी जिभेची चव, त्यासाठी आजारीच पडायला हवं असंच काही नाही !”

“आता हे ज्ञानामृत तुला तुझ्या आईनं पाजलं वाटतं ?”

“हॊ !”

“मला वाटलंच !”

“म्हणजे ?”

“ते जाऊदे ! मला सांग, चहाची पावडर वगैरे बदलली आहे कां या महिन्याच्या वाण सामानात ?”

“अजिबात नाही आई ! पण असं कां वाटलं तुम्हांला ?”

“नाही, तुम्हीं हल्लीच्या मुली ! एखादा चहाचा नवीन ब्रँड आला आणि त्यावर एक काचेचा मग फुकट मिळतोय म्हटल्यावर, ती नवीन चहा पावडर घ्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही, म्हणून म्हटलं !”

“नाही आई, चहा पावडर पण तीच आहे आणि दुध पण रोजचंच आहे !”

“तरी चव काही नेहमी सारखी नाही ती नाहीच !”

“आई द्या तो चहा माझ्याकडे, त्यात थोडी चहा पावडर आणि आल्याचा तुकडा टाकून उकळून आणते परत !”

“आता राहू दे सुनबाई ! तुला सांगते पूर्वी अख्ख्या मुंबईत कोपऱ्या कोपऱ्यावर इराणी हॉटेल असायची !तर त्यांच्या मुबंईतल्या कुठल्याही हॉटेलात जा, चहाची चव तीच, आता बोल !”

“म्हणजे आई, तुम्ही पूर्वी इराण्याकडे चहा प्यायला जायचात ?”

“काय तुझी अक्कल ! अगं मी कशाला जाते इराण्याकडे चहा प्यायला, अगं हे सांगायचे तसं !”

“बघा, म्हणजे तुमचा पण चहा कधीतरी बिघडायचा नां आई ?”

“कळलं कळलं, जास्त अक्कल नको पाजळूस !”

“बरं, आता तुम्ही चहा तसाच पीत असाल, तर मी लागू कां दुपारच्या स्वयपाकाला ?”

“लाग, पण जाण्याआधी मला सांग, मी केलेली कालची दुधी भोपळ्याची भाजी बाबूने खाल्ली नां ?”

“खाल्ली ? अहो आई, विलासने एकट्याने त्या दुधी भोपळ्याच्या भाजीचा पार फडशा पाडला ! मला आणि मुलांना उष्टवायला सुद्धा ठेवली नाही त्यानं ती !”

“मग ठीक आहे, जा आता तू, दुपारच्या स्वयपाकाचे काय ते बघ.”

“मी जाते, पण त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का आई ?”

“विचार, खुशाल विचार तुझ्या मनांत काय प्रश्न आहे तो.”

“मला सांगा आई, मी जर दुधीभोपळ्याची भाजी केली तर….”

“माझा बाबू आणि मुलं त्याला तोंड सुद्धा लावत नाहीत आणि मी केली तर सगळेजण बोटं चाटून पुसून कशी खातात ? हेच विचारणार आहेस नां तू ?”

“हॊ, अगदी बरोबर!”

“अगं मी जेंव्हा दुधीभोपळ्याची भाजी करते नां, तेंव्हा त्यात एक खास पदार्थ आवर्जून घालते, म्हणून तर बाबू आणि त्याच्या बरोबर मुलं सुद्धा ती भाजी आवडीनं खातात हॊ !”

“कोणता पदार्थ आई ?”

“ते माझं सिक्रेट आहे सुनबाई !”

“पण मला सांगायला काय हरकत आहे आई ? अहो तुम्हीं गेल्यावर…..”

“अगं त्या दुधीभोपळ्याच्या भाजीच्या सिक्रेटसाठी माझ्या मरणावर टपलीस की काय ?”

“काही तरीच काय आई ? मी कशाला तुमच्या मारणावर टपू ?”

“अगं पण आत्ताच म्हणालीस नां, ‘तुम्हीं गेल्यावर’ म्हणून ?”

“बघा, तुम्हीच कसा अर्थाचा अनर्थ करता ते आई !”

“कसला अर्थाचा अनर्थ करत्ये मी ?”

“अहो तुम्ही गेल्यावर म्हणजे, तुम्हीं कधी गावाबीवाला गेलात आणि माझ्यावर दुधीभोपळ्याचीच भाजी करायची वेळ आली, तर तुमची रेसिपी माहित असावी, म्हणून विचारलं !”

“असं होय ! मला वाटलं….”

“आई, मी काही बोलले की तुम्हीं नेहमीच पराचा कावळा करता ! ते राहू दे, ते तुमचं भाजीच सिक्रेट आता तरी सांगाल का मला ?”

“अगं काही नाही गं सुनबाई, माझ्या बाबुला लहानपणापासून आपल्या कोपऱ्यावरच्या ‘लक्ष्मी फरसाण मार्ट’ मधली तिखट, मसालेदार कचोरी आवडते !”

“हॊ, ठाऊक आहे मला ते, विलास आणतो ती कचोरी अधून मधून. मुलं सुद्धा आवडीनं खातात ती कचोरी.”

“अगं तुला सांगते, ही जी दुधीभोपळ्याची भाजी आहे नां ती कितीही पौष्टिक असली, तरी त्याला नाक मुरडणारी लोकंच जास्त!”

“बरोबर.”

“माझा बाबू सुद्धा लहानपणी त्याला तोंड लावायचा नाही, पण नंतर नंतर त्याला ती आवडायला लागली बघ आणि आता तर काय एकट्याने सगळी भाजी फस्त करतो !”

“हॊ ते सगळं खरं आहे, पण अशी अचानक बाबुला आणि मुलांना तुमची दुधीभोपळ्याची भाजी आवडायचं कारण काय ?”

“कचोरी !”

“का sss य ? कचोरी ?”

“हॊ  sss य ! आपल्या ‘लक्ष्मी फरसाण मार्टची’ कचोरी !”

“आई, तुम्हीं जरा नीट एक्सप्लेन कराल का मला ?”

“अगं काही नाही, एकदा मी काय केलं बाबू त्या दुधीभोपळ्याच्या भाजीला तोंड लावत नाही म्हणून, त्यात एक दिवस चांगल्या तीन चार कचोऱ्या खलबत्त्यात कुटून घातल्या आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर rest is history !”

“कमालच केलीत तुम्हीं आई !”

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments