श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
स्वार्थ आणि परमार्थ ! श्री प्रमोद वामन वर्तक
“आई, हे घ्या गरमा गरम कांदा पोहे !”
“दिसतायत तरी बरे, पण चव कशी असेल कुणास ठाऊक !”
“आता ते खाल्ल्यावरच कळेल नां ?”
“ते बरीक खरं हॊ सुनबाई, पण हे गं काय ?”
“काय आई ?”
“तू आज दुपारी जेवणार नाहीस वाटतं ?”
“जेवणार तर ! आता घरातली सगळी कामं मी एकटीने एकहाती करायची म्हणजे अंगात ताकद नको का माझ्या ?”
“झालं तुझं पालूपद पुन्हा सुरु !”
“यात कसलं आलंय पालूपद ? मी घरातली सगळी कामं एकटीने करत्ये हे खरं की नाही ?”
“खरं आहे !”
“मग झालं तर !”
“अगं हॊ, पण नंतर तू लगेच, ‘आपण आता कामाला बाई ठेवूया का? हेच विचारणार नां ?”
“अ sss य्या ! तुम्हीं खरंच मनकवड्या आहात अगदी आई !”
“उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस !”
“ते मला या जन्मी तरी शक्य होईल असं वाटत नाही बाई !”
“म्हणजे ?”
“अहो आई, आता तुम्हांला त्या हरभऱ्याच्या झाडावर चढवायच म्हणजे, तुमचं नव्वद किलोच्या आसपास असलेलं वजन मला आधी उचलता तरी यायला हवं नां ?”
“कर्म माझं !”
“नाही आई, मी तुमच्या वजना बद्दल बोलत्ये नां ? म्हणून तुम्ही ‘वजन माझं’ असं म्हणा, ‘कर्म माझं’ असं नका म्हणू बाई !”
“कळली तुझी अक्कल ! कुठल्या शाळेत होतीस गं शिकायला लहानपणी ?”
“अतिचिकित्सक विद्यालय, ठोंबे बुद्रुक, बोंबे वाडी, जिल्हा रत्नागिरी.”
“तरीच सगळी बोंबा बोंब आहे !”
“मला नाही कळलं तुम्हाला काय बोलायचं आहे ते ?”
“ते मरू दे गं ! मला आधी सांग मगाशी मी तुला विचारलं, तू आज दुपारी जेवणार आहेस का नाहीस, त्याच उत्तर दे मला आधी !”
“बघा म्हणजे कमलाच झाली तुमची !”
“आता यात कसली आल्ये माझी कमाल सुनबाई ?”
“अहो त्या प्रश्नाला मी मगाशीच उत्तर नाही का दिलं, हॊ जेवणार आहे म्हणून. पण असं का विचारताय तुम्ही आई ?”
“अगं म्हणजे असं बघ, मला नाष्ट्याला ताटलीत फक्त कांदापोहे दिलेस आणि स्वतः ताटात कांदा पोह्या बरोबर चार पोळ्या, भाजी, आमटी, वाटीभर भात आणि स्वीट डिश म्हणून दोन बेसन लाडू घेवून आल्येस नां, म्हणून म्हटलं दुपारी जेवणार आहेस का नाही म्हणून !”
“अहो आई त्याच काय आहे नां, माझं डाएट चालू झालं आहे नां आजपासून. त्यामुळे मला वजन कमी करण्यासाठी आता रोज सकाळी, सकाळी असा हेवी ब्रेकफास्ट करणं अगदी अनिवार्य आहे बघा !”
“हे कुणी सांगितलं तुला ?”
“माझ्या डाएटीशन देखणे मॅडमनी !”
“अगं पण त्यांच नांव तर दिवेकर मॅडम नां ?”
“नाही हॊ, त्या वेगळ्या आणि त्यांची फी कुठे आपल्याला परवडायला ! त्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या !”
“सुनबाई तुला एक सुचवू का ?”
“बोला नां आई !”
“तुझ्या त्या देखणे मॅडमकडे तुझ्या बरोबर माझं पण नांव नोंदव नां गं !”
“कशाला आई ?”
“अगं मगाशी बोलता बोलता तूच नाही का म्हणालीस, माझं वजन नव्वद किलो आहे म्हणून ?”
“हॊ, म्हणजे मी तसं अंदाजे म्हणाले खरं, पण तुम्ही वजन काट्यावर चढलात तर एखादं वेळेस ते एकोणनव्वद सुद्धा भरेल ! काही सांगता येतं नाही.”
“आता माझी खात्रीच पटली बघ सुनबाई !”
“कसली खात्री आई ?”
“तुझ्या त्या अति चिकित्सक शाळेचं नांव चांगलंच रोशन करत्येस तू याची !”
“मग, होतीच आमची शाळा तशी फेमस त्या वेळेस !”
” क ss ळ ss लं ! आता तुझ्या बरोबर माझं पण नांव त्या देखणेबाईकडे रजिस्टर कर. मला पण माझं वजन कमी करायच आहे, तुझ्या सारखा असा हेवी ब्रेकफास्ट करून !”
“कशाला आई ?”
“अगं मला पण वाटत नां की आपलं वजन कमी करावं म्हणून, म्हणजे तुला, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताना उगाच त्रास नको व्हायला !”
“जाऊ दे आई, तुम्ही आता गरमा गरम कांदे पोहे खा आणि मला सांगा कसे झालेत ते !”
“एका अटीवर कांदे पोहे खाईन सुनबाई.”
“कोणत्या अटीवर आई ?”
“तुझं हे डाएट बीएटच खुळं डोक्यातून काढून टाक !”
“मग माझं वजन कमी कसं होणार आई ?”
“माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे सुनबाई !”
“कोणता उपाय आई ?”
“आज विलास ऑफिस मधून आला की त्याला म्हणावं पन्नास किलो बासमती तांदुळाची ऑर्डर दे वाण्याला !”
“पन्नास किलो बासमती तांदूळ ? अहो पण आई ह्या एवढ्या तांदुळाच करायच काय ?”
“तुला आणि मला वजन कमी करायच आहे नां ?”
“अहो हॊ आई, पण त्याचा आणि पन्नास किलो बासमती तांदुळाचा संबंध काय ?”
“सांगते आणि तुझ्या बाबुला सांग तांदुळाची ऑर्डर देवून झाली, की ते माळ्यावर टाकलेलं जुनं दगडी जात सुद्धा खाली काढून ठेवं म्हणाव !”
“कशाला आई ?”
“अगं आता थोडयाच दिवसात बाप्पा येणार, घरोघरी मोदकांचे बेत आखलेले असणार, हॊ की नाही ?”
“बरोबर !”
“तर आपण दोघींनी काय करायच, त्या सगळ्या बासमतीच्या तांदुळाची मोदकाची मस्तपैकी पिठी करायची आणि….”
“विकायची, हॊ नां ?”
“अजिबात नाही !”
“मग काय करायच काय त्या एवढ्या सगळ्या तांदूळ पिठाचं ?”
“अगं आपल्या सोसायटीच्या पंचवीस घरात प्रत्येकी अर्धा अर्धा किलो घरोघरी गणपतीत बनणाऱ्या मोदकांच्यासाठी घरगुती पीठ आपल्या जात्यावर फुकट दळून द्यायचं ! काय कशी वाटली माझी आयडिया ?”
“कमाल केलीत तुम्ही आई ! मानलं तुम्हांला !”
© प्रमोद वामन वर्तक
०५-०८-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈