श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😅 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) 😂 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

तर मंडळी, आपला मोरू पंतांचा बायकोला नवीन साडी घेण्याचा कानमंत्र घेवून, अगदी आनंदाने आपल्या खोलीकडे निघाला. त्या आनंदाच्या भरात समोरून येणाऱ्या दोन तीन चाळकऱ्यांना त्याने धडका पण दिल्या आणि त्या सगळ्यांना सॉरी म्हणत म्हणतच तो आपल्या खोलीकडे मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा शालनला नवीन साडी घ्यायला जाऊया हे सांगतोय, असं त्याला होऊन गेलं होतं.

तेवढ्यात, आपल्याच विचाराच्या तंद्रित चालत असलेला मोरू आणि समोरून येणाऱ्या लेले काकूंची इतक्या जोरात धडक झाली, की काकूंच्या डोक्यावरची पाण्याची कळशी पूर्ण रिकामी होऊन, मोऱ्याला जेंव्हा नखशिखान्त अंघोळ झाली, तेंव्हा कुठे तो भानावर आला.  “मोऱ्या काय केलंस हे ?” “सॉरी काकू !” असं बोलून तो कपडे झटकत झटकत खोलीकडे जाऊ लागणार तेवढयात लेले काकूंनी त्याच्या बकोटीस धरून, “अरे लक्ष कुठे होतं तुझं? का सकाळी सकाळी श्रावणी सोमवारची भोले नाथाची भांग चढवून आलायस ?” असं रागात विचारलं. “काही तरीच काय काकू ? मी म्हटलं ना तुम्हांला सॉरी” असं म्हणून मोऱ्या परत जायला लागला तेंव्हा लेले काकू त्याला म्हणाल्या, “मोऱ्या गधडया आज श्रवणातला शेवटचा सोमवार.” “बरं मग ?” “अरे मग, काय मग ? आज माझा कडक उपवास असतो आणि मी स्वतः पाच कळशा पाणी डोक्यावर वाहून, आपल्या चाळीतल्या शंकराच्या देवळात त्या भोळ्याला स्नान घालते, गेली कित्येक वर्ष, कळलं ?” “अरे व्वा काकू, छानच करता तुम्ही हे. आता तो भोळा शंकर तुमची ही सेवा मान्य करून तुम्हांला नक्कीच प्रसन्न होऊन, एखादा चांगलासा वर देईल बघा.” असं उपरोधीक स्वरात मोऱ्या लेले काकूंना म्हणाला. पण त्याच्या असल्या बोलण्याकडे काकूंनी काणा डोळा करीत त्याला म्हटलं “अरे तो काय देईल अथवा न देईल यात मला काडीचा इंटरेस्ट नाही.” त्यांच हे बोलणं ऐकून मोऱ्या म्हणाला, “मग बरंच झालं की काकू!  माणसाने असंच निस्वार्थी मनाने आपलं कर्म करीत जावं, फळाची अपेक्षा कधी करू नये.”

काकूंच्या कळशीतल्या थंडगार पाण्यात भिजल्यामुळे मोऱ्याला आता बऱ्यापैकी थंडी वाजू लागली होती. शिवाय शालनला कधी एकदा साडी शॉपिंगची बातमी सांगतोय असं त्याला होऊन गेलं होतं. म्हणून तो धीर करून लेले काकूंना म्हणाला “बरं येतो आता काकू, आधीच उशीर झालाय.” असं म्हणून तो पुन्हा वळणार तोच लेले काकूंनी त्याची वाट परत अडवली !

“आता आणखी काय काकू ? अहो, मी आता हे ओले कपडे बदलले नाहीत ना, तर मला नक्कीच न्यूमोनिया होईल बघा !” “मोऱ्या मला सांग, अंघोळ करतोस तू ?” “म्हणजे काय काकू, रोजच करतो मी अंघोळ.” “मी रोजच विचारत नाहीये, आज केलीस कां अंघोळ ?” असं जरा काकूंनी आवाज चढवून विचारल्यावर मजल्यावरचे शेजारी पाजारी काकूंचा तो सुपरिचित आवाज ऐकून त्या दोघां भोवती लगेच गोळा झाले. चाळकरी गोळा झालेले बघून, नाही म्हटलं तरी मोऱ्या थोडा घाबरला. या चाळकऱ्यांना सक्काळी सक्काळी घरातली कामं नसतात कां ? असा सुद्धा एक प्रश्न त्याच्या मनांत डोकावून गेला. पण तो प्रश्न त्याने लगेच झटकून, आता लेले काकूंच्या तावडीतून आपली लवकरात लवकर सुटका करून घेण्यासाठी, त्याने परत सॉरी म्हणण्यासाठी तोंड उघडले, पण त्याला पुढे बोलू न देता लेले काकू कडाडल्या “मोऱ्या काय विचारत्ये मी ? अरे आज अंघोळ केल्येस कां नाही ?” “नाही काकू, अजून माझी अंघोळ व्हायची आहे. त्याच काय झालं, आपल्या पिकनिक…” त्याला मधेच तोडत लेले काकू म्हणाल्या “मग बरंच झालं !” लेले काकूंच ते बोलणं ऐकून मोऱ्या आश्चर्याने म्हणाला, “काय बरं काय झालं काकू ?”  “अरे तू अजून अंघोळ केली नाहीस ते बरंच झालं असं म्हणत्ये मी !” “कां काकू ?” त्यावर लेले काकू मोऱ्याला समजावणीच्या सुरात म्हणाल्या “मोऱ्या माझ्या डोक्यावरची कळशी तुझ्या डोक्यावर पूर्ण रिकामी झाल्यामुळे आता तुझी अंघोळ झाल्यातच जमा आहे. तेंव्हा आता एक काम कर.” लेले काकूंच्या तोंडातून ‘एक काम कर’ हे शब्द ऐकून मोऱ्याचा चेहरा पडला. त्याने नाईलाजाने काकूंना विचारलं  “कसलं काम काकू ?” “आता या ओल्या कपड्यानिशी मला एक एक करून  नळावरून पाच कळशा पाणी आणून दे, भोळ्या शंकराच्या अभिषेकसाठी. मी तुझी खाली देवळाजवळ वाट बघत्ये, जा पळ लवकर !” असं बोलून मोऱ्याला तोंडातून एक अवाक्षर सुद्धा काढायची संधी न देता, लेले काकूंनी खाली पडलेली आपली कळशी मोऱ्याच्या हातात जबरदस्तीने ठेवली आणि त्या मागे वळून न बघता जिन्याच्या पायऱ्या उतरून तरातरा जाऊ लागल्या.

लेले काकूंच्या या वागण्याचा मोऱ्याला इतका राग आला, पण त्याचा नाईलाज होता. चूक त्याचीच होती. त्याने आजूबाजूला हसणाऱ्या चाळकऱ्यांकडे एकदा रागाने पाहिले आणि तो हातातली कळशी घेवून गपचूप पाणी आणण्यासाठी वळला.

काकूंच्या या पाच कळशा पाणी पाहोचविण्याच्या कामात अडकल्यामुळे आणि नळावर पाणी भरण्यासाठी गर्दी असल्यामुळे, मोऱ्याचे आणखी पुढचे दोन तास खर्ची पडले.  एकदाची मोऱ्याची ती कामगिरी फत्ते झाल्यावर, दमला भागला मोरू आपल्या खोलीकडे वळला आणि खोलीत शिरता शिरता आनंदाने म्हणाला, “अगं ऐकलंस का शालन, आज संध्याकाळी की नाही आपण दोघं….” आणि पुढचे शब्द त्याच्या तोंडातून बाहेरच आले नाहीत मंडळी. तो घरात शिरला आणि त्याच लक्ष चहा पीत खुर्चीवर बसलेल्या एका तरुणीकडे गेलं. शालन तिच्या बाजूला उभी होती आणि त्या दोघींच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. त्यानं त्या तरुणीला या आधी कधीच पाहिलं नव्हतं, म्हणून त्याने आत येत येत शालनला विचारलं “या कोण शालन ?” “अहो ही माझी शाळेतली मैत्रीण मालन !” असं म्हणून शालन आणि मालन दोघीही हसायला लागल्या. पण शालनच्या तोंडातून ‘मालन’ हे नांव ऐकल्या ऐकल्या मोऱ्याच अवसान पार गळालं.  त्यावर शालन त्याला म्हणते कशी “अहो पंतांनी माझ्या आणि हिच्या नावाची केलेली गफलत परवा बोलता बोलता मी सहज मालनला सांगितली आणि….” शालनला पुढे बोलू न देता मालन मोऱ्याला म्हणाली “अहो भावजी, पंतांच्या या गफलतिचा फायदा घेवून मीच शालनला म्हटलं, आपण जरा भावजींची गंम्मत करू या का ?” “आणि मी सुद्धा या गोष्टीला तयार झाले आणि तुमची जरा…..” आता शालनला थांबवत मोऱ्या म्हणाला, “काय मस्त ऍक्टिंग केलीस गं तू शालन.  मला पिकनिकला जायला आत्ताच्या आत्ता १,५००/- रुपये द्या नाहीतर घटस्फोट द्या. मला अजिबातच संशय आला नाही तुझा, तू ऍक्टिंग करत्येस म्हणून ! बरं पण तुम्ही दोघी मैत्रिणी बसा गप्पा मारत, मी आलोच अंघोळ करून.” असं म्हणून मोऱ्या आत वळला आणि खो खो करून हसतच सुटला.

मंडळी, आता तुम्ही म्हणाल यात मोऱ्याला खो खो हसण्यासारखं काय झालं असेल ? तर त्याच उत्तर असं आहे, की शालन आणि मालनच्या या गंम्मतीच गुपित त्याला आता कळल्यामुळे, तो शालनला घेणार असलेल्या नवीन साडीचे दोन तीन हजार वाचले नाही का ? अहो, तुम्ही पण मोऱ्याच्या जागी असतात तर असेच खूष होऊन हसला असतात नां ? मग !

© प्रमोद वामन वर्तक

२६-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments