श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! 🙊 विरजण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गुडमॉर्निंग पंत !”
“नमस्कार, नमस्कार ! बोल आज काय काम काढलस ?”
“थोडं दही हव होत विरजण लावायला.”
“ती वाटी खाली ठेव आणि बस बघु आधी खुर्चीवर.”
“पण पंत विरजण… “
“त्याची कसली काळजी करतोस? मी सांगतो हिला तुला विरजण द्यायला, पण त्याच्या आधी माझ एक काम आहे तुझ्याकडे.”
“बोला ना बोला पंत, तुम्ही माझ्यासाठी एवढं… “
“जास्त मस्काबाजी नकोय, मला गेल्यावेळेस जसा डोंबिवलीच्या करव्यासाठी ट्रेनचा आवाज टेप करून दिला होतास ना…. “
“त्याच आवाजाची आणखी टेप हव्ये का तुम्हाला, देन डोन्ट वरी, संध्याकाळी ….”
“उगाच गुडघ्याला बाशिंग लावलेल्या नवऱ्या सारखा उधळू नकोस, मी काय सांगतोय ते नीट ऐक.”
“सॉरी पंत, बोला.”
“अरे करव्याला त्या ट्रेनच्या आवाजाच्या टेपचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याच्या झोपेचा पण प्रश्न सुटला, पण…. “
“पण काय पंत ?”
“अरे नुसता आवाज ऐकून त्याला झोप येईना. मला फोन करून सांगितलन तस.”
“मग ?”
“म्हणाला ‘या आवाजा बरोबर ट्रेन मधे बसल्याचा फिल यायला हवा, तरच झोप येईल’ आता बोल !”
“मग तुम्ही त्यांचा तो प्रॉब्लेम कसा काय सॉल्व केलात ?”
“अरे त्याला सांगितलं, झोपेच्या वेळेस तू नुसती ट्रेनच्या आवाजाची टेप चालू नको करुस, तुझ्याकडच्या रॉकिंग चेअर मध्ये बस आणि मग टेप चालू कर आणि मला सांग, तुला झोप येते की नाही.”
“मग आली का झोप कर्वे काकांना तुमच्या उपायाने?”
“अरे न येवून सांगते कोणाला, दहा मिनिटात त्याची गाडी खंडाळ्याचा घाट चढायला लागली !”
“पंत, पण कर्वे काका घरी रॉकिंग चेअर मधे बसून ट्रेनच्या आवाजाची टेप ऐकत होते ना, मग एकदम त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट कशी काय चढायला लागली ?”
“मी गेल्या वेळेसच म्हटले होत तुला, तुमच्या आजकालच्या पिढीचा आणि मातृभाषेचा काडीचाही……. “
“पंत तुम्हीच तर म्हणालात ना की कर्वे काकांची गाडी…. “
“अरे म्हणजे तो गाढ झोपून घोरायला लागला, आता कळलं?”
“मग त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट… “
“अरे आमच्या पिढीचे ते मराठी आहे, तुला नाही कळायचं.”
“असं होय, पण आता तुमचं नवीन काम काय ते सांगा आणि मला विरजण देवून मोकळ करा !”
“हां, अरे करव्याचा झोपेचा प्रॉब्लेम मी सॉल्व केल्याची बातमी अंधेरीला राहणाऱ्या जोशाला, कशी कुणास ठाऊक, पण कळली.”
“बरं !”
“अरे त्याचा मला लगेच फोन, मला पण हल्ली रात्री झोप येत नाही, मला पण टेप पाठवून दे !”
“ओके, मी आजच संध्याकाळी ट्रेनच्या आवाजाची टेप… “
“अरे असा घायकुतीला येऊ नकोस, त्याला ट्रेनच्या आवाजाची टेप नकोय, विमानाच्या….. “
“आवाजाची टेप हवी आहे ?”
“बरोबर !”
“पण पंत विमानाच्या आवाजाची टेप कशाला हवी आहे जोशी काकांना ?”
“अरे त्याची अंधेरीची सोसायटी एअरपोर्टच्या फनेल झोन मधे आहे आणि…. “
“फनेल झोन म्हणजे काय पंत ?”
“अरे फनेल झोन म्हणजे, जिथे सगळ्या सोसायटया एअरपोर्ट जवळ असल्यामुळे कमी मजल्याच्या असतात आणि त्यांना दिवस रात्र विमानाच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो आणि…….”
“सध्या विमान वाहतूक बंद असल्यामुळे त्यांच्या आवाजा शिवाय जोशी काकांना पण रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, बरोबर ? “
“बरोबर !”
“ओके, नो प्रॉब्लेम, संध्याकाळीच तुम्हाला विमानाच्या आवाजाची टेप आणून देतो, मग तर झालं ! आता मला या वाटीत जरा विरजण द्यायला सांगा बघु काकूंना.”
“अरे हो, हो, विरजण कुठे पळून चाललंय. आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेस तर लगेच तुला विरजण देतो, बोल विचारू प्रश्न ?”
“हो, विचाराना पंत.”
“मग मला असं सांग, या जगात कोणी कोणाला प्रथम विरजण दिले असेल ?”
“अरे बापरे, खरच कठीण प्रश्न आहे हा आणि मला काही याच उत्तर येईलसे वाटत नाही.”
“मग तुला विरजण…… “
“थांबा पंत, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याच उत्तर तुम्ही बरोबर दिलेत तर मला विरजण नको, ओके ?”
“मला माहित आहे तू मला तुझ्या बालबुद्धीने काय प्रश्न विचारणार आहेस ते.”
“काय सांगता काय पंत, मग सांगा बघू मी कोणता प्रश्न विचारणार आहे ते.”
“तोच सनातन प्रश्न, कोंबडी आधी की….. “
“चूक, शंभर टक्के चूक !”
“नाही, मग कोणता प्रश्न विचारणार आहेस ?”
“आधी मला प्रॉमिस करा, की तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, तर विरजण द्याल म्हणून !”
“प्रॉमिस, बोल काय आहे तुझा प्रश्न.”
“मला असं सांगा पंत, ज्याने पहिले घड्याळ बनवले, त्याने कुठल्या घड्याळात बघून त्याची वेळ लावली असेल ?”
“अं… अं…. अग ऐकलंस का, याला जरा वाटीत विरजण दे पाहू.”
© श्री प्रमोद वामन वर्तक
१०-०१-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈