image_print

श्री अमोल अनंत केळकर

🍁 विविधा 🍁

☆ चला कपाट आवरु या ! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

वर्षातील ५२ रविवार पैकी कुठल्याही  एका रविवारी हे वरील वाक्य एखाद्या घरात म्हणले गेले नसेल असे मला तरी वाटत नाही. रविवार अशा साठी की जरा निवांत, सुट्टीचा दिवस म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी मिळून कपाट आवरणे हा एक छान कौटुंबिक सोहळा आहे असे माझे स्पष्ट म्हणणे.

म्हणजे बघा अश्विनी ते रेवती अशी २७ नक्षत्र आहेत. पूर्वी ‘अभिजीत ‘ नावाचे पण नक्षत्र मोजत पण आता हे नक्षत्र धरत नाहीत. नक्षत्र पुस्तकात प्रत्येक नक्षत्राची माहिती देताना या नक्षत्रावर एखादी गोष्ट हरवली तर ती मिळण्याचे ठोकताळे दिलेले आहेत. अभिजित नक्षत्रावर ही माहिती अर्थातच नाही. पण पूर्वी समजा या नक्षत्राची कुठे माहिती दिली असेल त्यात या नक्षत्रावर करायच्या कामात

‘कपाट आवरणे ‘ हे नक्की असावे असे माझे मन सांगतय.

अश्विनी ते रेवती नक्षत्रावर केंव्हाही तुमची गोष्ट हरवली असेल आणि तेंव्हा अगदी याच कपाटात, इथल्या ड्राँवर मधे, कप्प्यांमधे कितीही वेळेला तुम्ही शोधली असली तरी आजच्या ‘चला कपाट आवरु या ‘ अभिजात मुहूर्तावर मात्र ही मिळण्याची खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच शक्यता असते.

मंडळी, मोकळं केलंत सगळं कपाट,  अवती भोवती मस्त पसारा जमलाय ना?  

तर अधून मधून असं कपाट आवरणं हे  जरी शास्त्र असले तरी

मागच्या वर्षी कपाट आवरताना नाही हे राहू दे, टाकू या नको  म्हणून ठेवलेल्या गोष्टी या वर्षी कपाट आवरताना कच-याच्या ढिगात टाकणे ही एक मोठी कला आहे

कपाट आवरताना हातात आलेले मित्राने दिलेले वाढदिवसाचे ग्रिटींग बघून, छान स्माईल करुन परत त्याच जागी ठेवणे हा ” मैत्री धर्म ”  आहे.

लहानपणीची ‘फोटो गँलरी’ आपलं

‘ फोटो अल्बम’ हातात आल्यावर चहाचा कप बाजूला ठेऊन शेवट पर्यतचे फोटो बघणे आणि कपाट आवरण्याच्या कार्यक्रमाला थोडा ब्रेक घेणे  ही “नैतिक जबाबदारी” आहे.

गधडे/ गधड्या  आँन लाईन क्लासला  मिळत नव्हती ना  ही वही  ? कपाटात नीट बघ म्हणलेलं, शोधली नीट?  नाही,  आत्ता कशी मग आली?  नीट बघायचंच नाही,  हे माय लेकींचे / माय लेकांचे ( बर का मित्रों, आपण अशावेळी परत एकदा फोटो अल्बम बघायला काढायचा) संवाद हे “आवश्यक कर्तव्य ” आहे.

ती वही  उघडताच आत मधे  मिळालेली १०० रुपयाची नोट घेऊन आईला देऊन संध्याकाळी भेळ/ पाणीपुरी/  शेव पुरी  ( छे असल्या गोष्टी संकष्टीलाच आठवतात नेमक्या)  रुपी ‘अर्थपूर्ण सेटलमेंट’ आहे.

मागच्या वर्षी आवश्यक वाटणारी गोष्ट पण  यावर्षी अचानक   अनावश्यक कच-यात  टाकून कपाट मस्त आवरलयं आता.  एकदिवस संगणक, मोबाईल रुपी कपाटातील पण कचरा साफ करायचा आहे असाच. विनाकारण सेव्ह केलेल्या फाईल, फोटो,  अँप सगळं साफ करायचं आहे

बघू सवड मिळाली तर याच पद्धतीने मनातील कपाटातील ही काही  अनावश्यक कप्पे,  विनाकारण सेव्ह केलेले विचार, पूर्वग्रह वेगैरे साफ करता आले तर!

प्रयत्न करायला काय हरकत आहे

( प्रयत्नवादी ) अमोल 📝

वैशाख. कृष्ण ३

२९/५/२१

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments