☆ विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
कुठून आली, कशी आली आहे कोण जाणे, पण एक चांगली मोठी झालेली मांजरी घरात आली.सगळ्यांच्या मागे मागे करायला लागली.जणू काय ते आमच्याच घरातली आहे की काय असे वाटावे.रुपाने अगदी सुंदर.वा वा म्हणण्यासारखी.पिवळा, पांढरा, काळा सगळे रंग तिच्यामध्ये आलेले होते.तिचं नामकरण झालं “सुंदरी”.
आता ती आमच्या घरातली झाली.आठ-दहा दिवसात तिचं पोट मोठे दिसायला लागलं.आता हिला पिल्लू होणार याची खात्री झाली.यथावकाश एके सकाळी माळ्यावरील अडगळीतून खाली आली.पोट दिसत नव्हते.वरती धुळीत पिल्ले असणार हे पक्क.सुंदरी साठी एक मोठ्या खोक्यात अगदी मऊ अंथरूण तयार केले.अडचणीतून अलगत पिल्लांना उचलून खोक्यात ठेवून तो खोका आमच्या बेडरूम मध्ये अगदी सुरक्षित ठेवला.सुंदरीची तिन्ही पिल्ले वेगवेगळ्या रंगाची नाजूक आणि छान होती.सुंदरीला खोके पसंत पडले.त्यामुळे पिलांसह त्यात ती छान राहत होती.तिच्यासाठी खोलीचे दार किलकिले ठेवत होतो.दहा दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडायला लागले.आता त्यांचं रुपडं आणखीनच गोजिरवाणा दिसायला लागलं.एके दिवशी सकाळी उठून पहातो तो पिल्ले आणि सुंदरी सगळेच गायब!खोकं मोकळं पाहून धस्स झालं.दुपारी खाण्यासाठी घरात आली.परत जाताना कोठे जाते लक्ष ठेवलं.जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या गॅलरी च्या बाहेर अडचणीत ती पिलांना घेऊन गेली होती.एक पिल्लू पत्र्याच्या खोल अडचणीत अडकले होते.ते अखंड ओरडत होते.आणि सुंदरी पावसात पत्र्यावर बसून आक्रोश करत होती.बाकी दोन दोन पिल्लांकडे पुन्हा पुन्हा ही जात होती.खाण्यासाठी घरी येत होती.तिच्या पत्र्या कडच्या काकुळतीच्या येरझाऱ्या आता मात्र पहावत नव्हत्या.अडकलेल्या पिलासाठी ती कासावीस झाली होती.पिल्लु ही भुकेने व्याकुळ झाली होते.राहुल आणि स्वप्नील दोघेही पत्र्यावर चढले.खूप प्रयत्न केला पण पिलापर्यंत हात पोचत नव्हता.सुंदरीची घालमेल बघवत नव्हती डोळ्याने ती काकुळतीला येऊन जणू सांगत होती “माझ्या बाळाला लवकर काढा रेss”.रायगडावरून बाळासाठी जीव टाकलेल्या हिरकणीची ची आठवण झाली.काय करावे ते काही सुचत नव्हते संध्याकाळ व्हायला लागली.रात्र झाली तर अंधारात काहीच करता येणार नव्हते.पिलाला लवकर काढले तर ठीक नाहीतर ते मरणार असे वाटायला लागले.गडबड केली.पत्रा काढण्यासाठी डॉक्टरांची ची परवानगी घेतली.नट बोल्ट काढून पत्रा सरकवला पिल्लू बारीक झाले होते.जणू नजरेने काकुळतीने “मला माझ्या आई कडे पोचवा” म्हणत होते. सुंदरीची त्याला भेटण्याची गडबड चालू झाली.पिलाला घरात आणले.तिला आपल्या पिलाला किती चाटू आणि किती नको असे झाले होते.भुकेला जीव आईला चुपूचुपू प्यायला लागलि.एक जीव वाचवला याचा सर्वांना आनंद झाला.जीवदान मिळाले पिलाला बाकी दोन पिल्लांनाही घरात आणले.
तीनही पिल्ले सुंदरी सह मजेत आनंदात रहायला लागली.त्यांचे खेळ अगदी बघत रहावेत असे.कुस्तीचे सर्व प्रकारचे डाव जणू! दोन पिल्ले अगदी जड मनाने चांगल्या घरी दिली.जीवदान मिळालेले पिल्लू तिचे निरर्थक नाव ‘टिल्ली’.ते मात्र आमच्याच घरात सुंदरी बरोबर आणि आमच्या दोन कुत्र्यांबरोबर खेळण्यात दंग असते.मजेत आणि खुषीत आहे.त्याच्याकडे पाहताना त्याला जीवदान दिल्याचे समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.सुंदरी आणि टिल्ली दोघांचेही ही चेहरे आणि डोळे आमच्याशी बोलतात “गॉड ब्लेस यु”.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मनाला चटका लावणारे.