विविधा
☆ जागतिक व्यंगचित्रकार दिन ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त सर्व सामान्य नागरिकांचे, राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे, पुढाऱ्यांचे, साहित्यिकांचे आणि व्यंगचित्रकारांचे मन:पूर्वक अभिनंदन !
आपल्या प्राचीन अन उन्नत अश्या भारतीय संस्कृतीने सर्व समावेशक ६४ कलांना मान्यता दिलेली आहे. यात व्यंगचित्रकलेचा समावेश आहे की नाही, याची खात्री मला देता येत नाही. पण अर्वाचीन काळात व्यंगचित्रे हि एक स्वतंत्र कला म्हणून विकसित झालेली आहे. एखादा चित्रकार व्यक्तिचित्रे रेखाटतांना मूळ व्यक्तीचे प्रमाणबद्ध चित्र रेखाटून त्या व्यक्ती विषयीची माहिती एक लेख लिहून व्यक्त करू शकतो. पण अर्कचित्रकला किंवा … व्यंगचित्रकला हि तर एक पराकोटीचीच कला आहे असे मला वाटते ! कारण एक वेळ सरळ सरळ चित्रे रेखाटणे त्या मानाने सोप्पे.. कारण ती तत्सम प्रमाणबद्धतेने काढायची असतात.. पण एखाद्या व्यक्तीचे अतिशयोक्तीपूर्ण, उपरोधिक, प्रमाणाबाहेर असूनही प्रमाणातच चित्र काढणे केवळ अशक्यच… ती कला साधणे हे एक कठीण कार्य आहे. किंबहुना ती कला उपजतच असावी. प्रमाणाबाहेरच्या रेषांनी देखील ती व्यक्ती बघणाऱ्यात ओळखायला येणे हे अत्यंत अवघड असे काम आहे. स्व इंदिरा गांधी यांचे चित्र आर के लक्ष्मण यांच्या अर्कचित्रांमध्ये बघताना इंदिराजींचे नाक बाकदार आणि प्रमाणाबाहेर मोठे असे काढलेले असायचे.. त्यावर इंदिरा गांधींनी आर के लक्ष्मण यांना विचारले, ” आप मेरी नाक इतनी लंबी क्यूँ बनते हो..? ” त्यावर हसून आर के नी तो विषय टाळला. पण इंदिराजींचे नाक, केश रचना इत्यादी त्यांची एक ओळख होती, ते वैशिष्ट्ये होते. त्यावर अधिक बल देऊन त्यांचे व्यंगचित्र अनेक कार्टूनिस्ट काढत होते. त्याला स्व बाळा साहेब ठाकरे हे देखील अपवाद नव्हते. बाळासाहेब ठाकरे हे जसे व्यंगचित्रकार होते, तसेच ते अन्य व्यंगचित्रकाराच्या दृष्टीने राजनेता देखील होते.. त्यामुळे ते देखील अनेकांच्या अर्कचित्राचे विषय असत.
एखाद्या प्रसंगातील विरोधाभास ओळखून, त्यातील फोलपणा सिद्ध करण्यासाठी , टीका करण्यासाठी, एका गंभीर विषयाचे विडंबन , त्यातील मेख ओळखून आपल्या चित्रांद्वारे समाजापुढे विचारार्थ ठेवणे एवढे प्रचंड सामर्थ्य अर्कचित्रकारांमध्ये असावे लागते. त्यात विनोद आला, अतिशयोक्ती आली, मौन देखील आले.. रिडींग बिटवीन द लाईन्स हे या रेषांमध्ये साहित्या इतकेच नव्हे तर त्यापेक्षा अधिकच दिसते. मला आठवते, आणीबाणीच्या काळात टाइम्स ऑफ इंडियाने कार्टूनची जागा हि कोरीच ठेवली.. पण संपादकांची ती कृती निरंकुश राजकीय नेतृत्वाची, अहंकाराची निर्देशक ठरली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी दर्शवणारी होती. एकदा एका वर्तमानपत्रातील संपादकीय अग्रलेखाची जागा देखील व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेप्या वृत्ती निषेधार्थ संपादकांनी कोरी ठेवलेली होती. मौनं सर्वार्थ साधनम्… दोन्ही कृती ह्या तश्या तुल्यबळच ! कदाचित कोऱ्या संपादकीयाने किंवा कोऱ्या अग्रलेखाने जे साध्य केले असेल, नसेल त्याहीपेक्षा अधिक व्यंगचित्राने साधल्या गेले असेल. एखादा अक्षरशत्रू देखील, व्यंगचित्राने व्यंगचित्रकाराच्या मनातील कटाक्ष, भाष्य, विरोधाभास, विपर्यास, उपहास एका क्षणात समजू शकतो.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनीं ” द डिस्टोरटेड मिरर” ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीत त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पार्श्वभूमी, भूमिका विशद केली. ” द डिस्टोरटेड मिरर” हे अतिशय समर्पक असे शीर्षक त्यांच्या या अजोड कलाकृतीचे होते. आरश्यातील प्रतिमा हि प्रतिबिंबच असतो.. पण आपण स्वतःला आरश्यात बघतो तेंव्हा अगदी तंतोतंत जसे च्या तसे प्रतिबिंब दिसत नाही .. डाव्यांचे उजवे, अन उजव्याचे डावे त्या प्रतिबिंबात दिसते. तसे ट्रू मिरर मध्ये मात्र जसेच्या तसे दिसते. याशिवाय अंतर्गोल, बाह्यगोल अर्थात कोन्वेक्स वा कोन्केव्ह आरसे हे त्या त्या व्यक्तीचे जणू व्यंगचित्रच दर्शवतात. एक प्रमाणबद्ध नसलेली, अवास्तव वेडीवाकडी प्रतिमा.. तरीही ओळखू येणारी त्यात दिसते. ती प्रतिमा, ते प्रतिबिंब आपले व्यंगचित्र आपण समजू या.
एखाद्या परिस्थितीचे आकलन एक तटस्थ, त्रयस्थ भूमिकेतून करून, सर्व सामान्यजनांपुढे शब्द विरहित, अक्षर विरहित किंवा मितभाषिक अशी रेषांची अभिव्यक्ती हि साधी कला नव्हे. अर्कचित्रकार हा अभ्यासू असायलाच हवा, त्याला परिस्थितीचे भान देखील असायला हवे .
Should cartoonists have a slant when it comes to their satire? “ I don’t feel that cartoonists have to take any side. I believe that a cartoonist is never a leftist or a rightist but can be a sadist”
राजकारणात व्यंगचित्रकाराने पक्षपाती असूच नये. डावा अतिडावा, उजवा अति उजवा असे कदापि असू नये. टीका टिप्पणी करताना त्याची भूमिका एखाद्या स्थितप्रज्ञा सारखीच असावी. त्याची संवेदनशीलता समाज हिताची, राष्ट्रहिताची असावी.
पूर्वी जातक कथांमध्ये, विविध प्राणी आपापसात बोलतांना दाखवीत .. आणि त्यातून एक संदेश, एक बोध, एक संस्कार मुलांना मिळायचा. अलीकडे राजकीय पक्षाला न रुचणारे विचार कार्टून द्वारे प्रकाशित झाल्याने, व्यंगचित्रकाराला जबर शिक्षा करण्यात आली. एवढेच नव्हे तर व्यंगचित्रकाराच्या हत्या देखील आपण बघितल्या . एवढे सामर्थ्य या कलेत आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वृत्तपत्रात तसेच साप्ताहिक, मासिकांत राजकीय व्यंगचित्राला मोठे करण्याचे काम शंकर्स विकलीचे शंकर आणि प्रसिद्ध चित्रकार व व्यंगचित्रकार दीनानाथ दलाल वगैरेंचे. त्यानंतरची पिढी अर्थातच आर. के. लक्ष्मण, ‘मार्मिक’कार बाळ ठाकरे, मारिओ मिरांडा, अबू इब्राहिम, सुधीर दास, कूटी वगैरे पिढीने गाजवली आणि भारतीय राजकारणात सत्ताधाऱ्यांना कायम चर्चेत आणि नैतिक धाकात ठेवत आपली व्यंगचित्र कारकीर्द गाजवली.
स्व बाळासाहेब ठाकरे यांनी तर आपल्या कुंचल्याने मार्मिक या त्यांच्या साप्ताहिकातून जागृती करून मराठी मन चेतवले, त्यांना संघटित करून एक बलाढ्य राजकीय पक्ष उभारला.
व्यंगचित्र कला हि साहित्य या प्रकारात देखील मोडावी असे वाटते.. शब्दातीत असूनही, किंवा मितभाषी ही असून साहित्याचे कार्य ती साधते, ती एक परिपूर्ण अशी अभिव्यक्तीच आहे.
रविवार, 5 मे, 1895 रोजी, न्यूयॉर्क वर्ल्डच्या वाचकांना त्यांच्या रोजच्या वर्तमान पत्रात एक नवीन पुरवणी मिळाली. ती पुरवणी म्हणजे त्या वर्तमान पत्राच्या पृष्ठांवर, वाचकांना रिचर्ड आउटकॉल्टची पूर्ण-रंगीत रेखाचित्रे आढळली. त्यात मोठ्या कानाचा, अनवाणी पायांचा लहान मुलगा खोडकर हसत असलेला दाखवल्या गेला. होगन आल्ये या नावाच्या कार्टूनची पहिली व्यक्तिरेखा कालांतराने द यलो किड म्हणून ओळखल्या जाऊ लागली. तीच व्यक्तीरेखा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कार्टून आयकॉन ठरली. स्व आर के लक्ष्मण यांची कॉमन मॅन हि व्यक्तिरेखा वाचकांच्या मनात यशस्वीपणे रुजली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तिला मानाचे स्थान मिळाले. न्यूयॉर्क वर्ल्डच्या त्या ५ मे रोजी सुरु केलेल्या यशस्वी बदलामुळे दरवर्षी ५ मे हा राष्ट्रीय व्यंगचित्रकार दिन म्हणून पाळल्या जातो. अश्या या अद्भुत कलेचे आपण साक्षीदार आहोत, हि एक सन्मान्य बाब आहे.
– श्री मिलिंद रतकंठीवार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈