डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

परवा पुस्तकांच्या कपाटातून सारखी खुडबुड ऐकू येऊ लागली. मनात म्हटले ,“एवढा बंदोबस्त करुनही खारुताईने आपल्यावर कुरघोडी केलेली दिसतेय. पुन्हा घरटे बांधले वाटते.” असे म्हणून त्या बाजूचे दार उघडले तर खारुताई ऐवजी उंदीरमहाशयांनी दर्शन दिले. मी घाबरून पटकन दार बंद करुन घेतले. आमच्या  कपाटाच्या मागच्या बाजूला खिडकी आहे.   ती एका बाजूने कायम थोडीशी उघडी राहते आणि त्याच चोरवाटेने प्रवेश करुन या खारुताईनी दोन वर्षे आपले बस्तान बसवले होते. बिचारी मोठ्या कष्टाने घरटे बनवते आणि तेव्हा लेकुरवाळी पण असते. म्हणून मी पहिल्या वर्षी तिचे बाळंतपण संपेपर्यंत धीर धरला. नंतर सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्त केला. पण बाईसाहेब माझ्यापेक्षा हुश्शार निघाल्या. अगदी लहान राहिलेल्या फटीतून त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा आपला कार्यभाग साधला. यावर्षी मग मी अधिक जोमाने बंदोबस्त केला. आणि बाईसाहेब तिकडे फिरकल्या नाहीत. मी एकदम आनंदात होते. आणि एक दिवस दुसऱ्या बाजूचे कपाट उघडले तर बाईसाहेब दिमाखात घरट्यात बसून माझ्याकडे “ जितम् मया।” अशा अविर्भावात बघत होत्या. तिच्या जिद्दीला मी सलाम केला आणि बाईसाहेब निघून गेल्यावर त्यांच्या घरात आश्रय घेतलेल्या या  मूषकमहाशयांनी दर्शन दिले. आता यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेत मी असतानाच आणखी एक समस्या उद्भवली. आमच्या बाथरूमचे आउटलेट तुंबू लागले होते. आणि चाचपणी केली असता लक्षात आले की बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला उगवलेल्या झाडाच्या मुळ्यांनी पाण्याशी मैत्री करत त्या पाईपमध्ये हात- पाय पसरले होते. ते बघितले आणि मनात विचार आला ,“शेवटी  प्रत्येक जीवाची ही जगण्याचीच तर धडपड आहे. जगण्याची हीच उर्मी त्याची संजीवनी देत असते.”

मध्यंतरी  परदेशातील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका तीन ते चार वर्षाच्या  मुलाचे आई- वडील एका विघातक घटनेत मृत झाले होते आणि ‛मृत्यू’ या शब्दाचाही अर्थ माहीत नसलेला  आणि आपल्या आईच्या आठवणीने  रडणारा तो चिमुरडा बघून वाटले,“ कसे जगणार हे पिल्लू ?” पण तरीही तो जगतो आहेच की! आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. आपण त्यावेळी हळहळतो आणि काही दिवसांनी विसरून पण जातो. पण त्या जीवांची जगण्याची धडपड आणि उर्मी तशीच असते. म्हणूनच जीवनप्रवाहसुद्धा अविरत चालू राहतो.

आज अनेकदा पर्यावरणप्रेमी- अभ्यासक सतत आपल्याला म्हणजेच मानवाला जाणीव करुन देत आहेत की आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत आणि पर्यायाने तेथे निवास करणाऱ्या जीवसृष्टीचा पण! गोष्ट शंभर टक्के खरीच आहे. पण एका दृष्टीने हीसुद्धा माणसाची जगण्याचीच धडपड नाही का? पण त्यात मूलभूत फरक हा आहे की बाकीची जीवसृष्टी आपल्या गरजेपुरताच निसर्गाचा विनियोग करते. आम्ही मात्र आमच्या भौतिक सुखाच्या हव्यासापोटी त्या संपत्तीचा हवा तसा उपयोग करुन घेत आहोत आणि म्हणूनच ही केवळ जगण्याची उर्मी न राहता हाव बनली आहे. म्हणूनच कदाचित बाकीच्या सजीवांना जगण्यासाठी नवनवीन मार्ग शोधावे लागत आहेत. सिंधुदुर्गमध्ये उद्भवलेला हत्तींचा प्रश्न , हल्ली वारंवार ऐकू येणाऱ्या मानववस्तीतील बिबट्याचा वावर, माझ्या घरात घरटे बांधणारी खारुताई किंवा भिंतीत मूळे रुजवणारी वनस्पती हे त्याच समस्येतून निर्माण झालेले प्रश्न आहेत. जगण्यासाठी त्यांनी शोधलेले हे नवीन पर्याय आहेत.अर्थात सजीवांची खासियत हीच आहे की आहे त्या परिस्थितीला तोंड देत जीवन चालू ठेवायचे. आधार शोधून घेऊन नवीन मार्ग निवडायचा! तर काहीवेळा आमच्यातीलच सहृदय व्यक्ती स्वतःहून आधाराचा हात पुढे करतात.म्हणूनच अनाथ मुलांचे आश्रयस्थान एखादी सिंधुताई सकपाळ बनते, तर आमच्याच सिंधुदुर्गातील संदीप परब वृद्धांना सहारा देणारा आधारवड  बनतो. दिव्यांगाना आपल्या मायेची ऊब देत एखादी नसीमादीदी स्वतःच्या शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांना नवीन पंख देते. एखादी तमक्का  आयुष्यभर वृक्षांना मुले मानून त्यासाठी देशभरात बिया रुजवत फिरते आणि लाखो वृक्षांना जन्म देऊन त्यांची आई बनते. तर जंगल अधिवास  नष्ट होऊ नये म्हणून एखादा आसाममधला मोलाई अख्खे जंगल निर्माण करतो.  तात्पर्य काय तर प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि  जगण्याची उर्मी हा त्याचा स्रोत आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments