सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ जीवन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

प्रत्येकालाच जीवन हे जन्मानंतर लाभतं.कसं असतं बरं मानवी जीवन ?जीवन हवहवसं तेंव्हाच वाटतं जेंव्हा तुम्ही त्यात काही आनंदाचे ,सुखाचे क्षण निर्माण करता.जन्मानंतर जेंव्हा तुम्ही मोठे होता,संस्कारातून  सुजाण बनता,तेंव्हा मंगेश पाडगावकर जी म्हणतात त्याप्रमाणे “या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे ,”या त्यांच्या गीतानुसार

जीवनाची वाटचाल आनंदानं,प्रेमानं,स्नेह जोपासत करणं श्रेयस्कर ठरतं.जीवनात प्रत्येक वेळी समोर सुखच येतं असं नाही पण भगवदगीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार

“सुखदु:ख समेत्कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ” ही वृत्ती जर आपण ठेवली तर सुख लाभो किंवा वाट्याला दु:ख येवो,यश मिळो किंवा पराभवाचा सामना करायला लागो,आपण दोन्ही गोष्टींकडे तटस्थ वृत्तीने पाहावे हे तत्वज्ञान अंगिकारता येते.अर्थात हे सोपे नाही.

जीवन प्रत्येकाला जसं तो पाहतो तसं त्याच्या दृष्टिकोनानुसार भासतं.दृष्टीकोनाबाबत बोलताना मला नुकतीच वाचलेली एक गोष्ट आठवते.एके ठिकाणी तीन पाथरवट दगडावर छिन्नीचे घाव घालीत होते.जवळच बांधकाम सुरू असलेलं एक मंदिर होतं.रस्त्याने एक वाटसरू चालला होता.त्याने त्या तिघांपैकी एकाला विचारले,”तू काय करतो आहेस ?”तो त्रासिक स्वरात उत्तर देतो,”मी छिन्नीने दगड फोडतो आहे.त्रासाचं काम बघा.”नि घाम पुसतो.वाटसरु दुसर्या पाथरवटास तोच प्रश्न विचारतो.तेंव्हा तो मोठा उसासा टाकतो नि म्हणतो,”अरे बाबा,पैटासाठी कष्टाचं काम करतोय मी.”वाटसरु तिसर्या पाथरवटासही तोच प्रश्न विचारतो,”बाबा रे,काय चाललय तुझं?” तेंव्हा तो मात्र अभिमानाने म्ज्ञणतो,इथं हे जे मंदिर उभं होतय ना,ते बांधण्यास मी मदत करीत आहे.”तीनही पाथरवट एकच काम करीत होते.दगडाला आकार देण्याचे.पण एकाला ते त्रासिक,कंटाळवाणे वाटत होते,दुसर्याला पोटासाठी राबणे वाटत होते नि तिसर्याला मात्र एका सुंदर निर्मितीस आपण हातभार लावीत आहोत याचा अभिमान वाटत होता -आनंद वाटत होता. तसच कोणाला जीवन पहाटेच्या सुंदर दवासारखं  वाटतं,तर कोणाला शीतल वायुच्या झुळकी सारखं, एखाद्या खवय्याला ते रसास्वादी जिव्हेच्या तृप्तीसारखं भासतं,तर एखाद्या लढवय्याला ते रणांगणासारखं वाटतं.नि मल्लाला आखाड्यासारखं.जीवन हवहवसं तेंव्हाच वाटतं जेंव्हा आपण प्रत्येक क्षणी ते समरस होऊन जगतो.आपल्या जीवनात बालपणापासून वार्धक्यापर्यंत आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात.बालपणी विद्यार्जन,ज्येष्ठांच आज्ञापालन केलं तर शिक्षणात यवस्वी होऊन आपण नोकरी किंवा व्यवसायात स्थिरस्थावर होतो.विविध भावना नि नात्यांची जपणूक करुन वृद्धापकाळी आपण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकतो.फक्त जीवनात उद्योग शीलता जपणे महत्त्वाचे ठरते.एक सुभाषितच  सांगते –

उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै:। 

नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृग: ॥ 

याचा अर्थ असा कि, उद्योग केल्यानेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात ‌झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करीत नाही. तर त्यासाठी त्याला शिकार करावी लागते.

जीवनात कुठेतरी श्रद्धा नि समोर एखादे ध्येय असूल तर जीवनाचा प्रवास योग्य दिशेनं होतो.नाहीतर ते भरकटते.अलिकडे वृत्तपत्रात जीवनाचा आस्वाद न घेताच ते संपवू पाहणारी तरुणाई दिसते नि मन अगदी विषण्ण होतं.विवेकाने,सकारात्मक दृष्टिकोनातून जर विचार पूर्वक वर्तन केलं तर जीवन हवहवसं वाटतंनि सार्थकी लावता येतं.आकाशातील इंद्रधनुष्य जसं तानापिहिनिपाजातुन खुलतं ,तसं मानवता,श्रम , सहिष्णू वृत्ती,प्रमाणिकपणा,सत्शील वृत्ती,त्याग,प्रेम,यासारख्या सदगुणातून बुद्धीला कृतीची जोड देऊन मानवी जीवन सार्थकी लागततं.म्हणून शेवटी इतकं म्हणावं वाटतं

     जीवनाला रंग कसा ?

      मानवा तू देशी तसा.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments