श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
(श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’) – इथून पुढे —
संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे.
महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो. याची सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.
“ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”
— संत तुकाराम महाराज
हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,
“बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन, जाला हा वमन संसार ॥
बरे जाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे ॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज, बरा जालो तुज शरण देवा ॥
बरे जाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरें व्रत एकादशी, केले उपवासी जागरण ॥”
त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात,
*”बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥
पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले।
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।
माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।।
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”
इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,
संत मीराबाई, अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!
आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.
बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला जन्म होण्याआधीपासूनच शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.
अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.
‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.
म्हणोन आळस सोडावा ।
येत्न साक्षेपें जोडावा ।
दुश्चितपणाचा मोडावा ।
थारा बळें ।। दा. १२. ९. ८।।
— समर्थ रामदास
आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.
“नजरे बदली तो नजारे बदले।
नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”
एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे, विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे. कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.
आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग walk ला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.
अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत, त्या खालीलप्रमाणे असू शकतील.
१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म
२. ‘हवे नको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म …. विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.
३. कुटुंबाची, समाजाची, देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.
४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.
५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.
६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.
७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.
‘जीवन जगण्याची कला- अध्यात्म ‘.. ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.
*
आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।
*
घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।
बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।
मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध।।१।।
*
दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।
दोस्त होऊनी हातच माझा आपुल्या हाती घेते।
जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।
*
झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।
सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।
*
कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार
हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद ।।४।।
*
कवी : श्री. मंगेश पाडगावकर
– समाप्त –
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈