☆ विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१३ साली कोथरुड भागात वानरांच्या टोळीने लोकांचे मोबाईल चोरण्याचा सपाटा लावला होता. इतका हैदोस घातला होता की शेवटी ’सकाळ’ वाल्यांनाही त्यांची दखल घेऊन मोठी बातमी छापणे भाग पाडले होते. ह्या चौर्यकर्मामध्ये अग्रभागी होता आमचा “झंपू” बालक! बरं, मला झंपू बद्दल एवढी माहिती कशी? ह्याचे उत्तर असे की, झंपू आमच्या घराच्या मागील पेरूच्या बागेतच तर रहायला होता! म्हणजे जवळजवळ आमचा ’सख्खा शेजारी’च म्हणा हवं तर!

सकाळ-सकाळी “हूप..हूप!” अशी दीर्घ आरोळी उठली की आम्ही ओळखायचो, वानरसेना जवळच कुठे तरी आली आहे. आम्ही मोठया उत्सुकतेने गॅलरीत आलो की चार-पाच किंवा जास्त वानरांचा कबिला समोरच फांद्यांवर बसून नीलमोहराची कोवळी पाने खात असलेला दृष्टीस पडायचा. कावळ्यांची एकसारखी हैराण काव-काव सुरु झाली की समजायचे कोणीतरी वानर कुठेतरी घरटयाजवळ धोकादायक अंतरावर आले आहे. एखादा हुप्प्या समोरील गच्चीच्या कठडयावरून मोठया ताठयात शेपटी वर करून निघाला की कावळे त्याच्या आजूबाजूने झडप घातल्यासारखे उडायचे. झंपूला मात्र कावळ्यांच्या कलकलाटाचा राग यायचा. शेजारील इमारतीच्या गच्चीवर हा पठ्ठा मस्तपैकी दोन्ही हाताने डिश टी व्ही केबलला धरून लोंबकळलेला असायचा. कावळे जवळ आले की केबलचा हात सोडून, हवेत हात मारून कावळ्यांना मारायला बघायचा आणि पडतापडता पुन्हा केबल पकडायचा. मधूनच कधी कधी आमच्या गॅलरीत कपडे वाळवायच्या चिमट्यांच्या रिंगला एकाच हाताने धरून लोंबकळायचा. वाळत घातलेले कपडे, रुमाल ओढून खाली फेकून द्यायचा. एका खिडकीच्या सज्जावरून दुसर्‍या सज्जावर उडी मारायचा आणि खारींना घाबरवायचा. उंची, खोली, लांबी असे कसलेही धोके त्याला जाणवत नसत. कळपात नव्याने दाखल झालेल्या एका पिल्लाबद्दल तर झंपूला भारी आकर्षण. पिल्लाला त्याच्या आईच्या पोटापासून हाताने अलग करून त्याला सारखे खेळायला ओढायला बघायचा. एकंदरीतच काय, तर सर्व वानरांच्या आणि विशेषत: झंपूच्या लीला बघताना आमची अगदी हसून-हसून पुरेवाट व्हायची.

ह्याच टोळीला आणि खासकरून झंपूला मोबाईलचे आकर्षण कुठून पैदा झाले हे काही आम्हाला कळले नाही. घरामध्ये घुसखोरी करून मोबाईल फोन पळवायला लागले. ज्याचा फोन गेलेला असायचा ती व्यक्ती फोन करकरून कुठे ’आपली’ रिंग ऐकू येते का हा प्रयत्न करायची. इकडे फोनचा रिंग टोन वाजला किंवा थरथरू लागला की वानरबुवा खुश! मग तर तो फोन जाम सोडायचे नाही. झंपूचे डोके लहान असल्याने तो खिडक्यांस लावलेल्या गजांच्या जाळीमधून सहज आत प्रवेश मिळवायचा. एखाद्या फ्लॅटच्या गॅलरीचे दार चुकून उघडे राहिले की सरळच आत यायचा. अर्थात जिने चढून माणसांप्रमाणे राजरोस येणे सुध्दा त्याला निषिध्द नव्हते. फक्त घंटी वाजवून दार उघडायला लावता येते, तेवढेच शिकायचे बाकी ठेवले होते.

एकदा झंपूने माझ्या समोरच्या घरातील टी. व्ही. चा रिमोट कंट्रोलच मोबाईल फोन समजून पळवला. माझ्या खालच्या फ्लॅटमधील मालकिणबाईंनी मोठया हुषारीने उशाखाली लपवून ठेवलेला ब्लॅकबेरी त्याने एखादा सराईत चोर जसा पाळत ठेवून पळवतो अगदी तसाच पळवला. एके दिवशी आरडाओरड ऐकून मी स्वयंपाकघरात गेलो तर झंपूची स्वारी आमच्या फ्रीजवर चढून बसली होती. काठी उगारल्यावर “चीं…चीं” करत त्याने तिथून उडी मारली ती जेवणाच्या टेबलावर, तिथली भांडी पाडून उडी घेतली ओटयावर, तिथून खिडकीत आणि मग गजांतून बाहेर. एका दुपारी सहज खिडकीबाहेर नजर टाकली तर झंपूसाहेब दोन पाइपांच्या बेचक्यात चक्क झोपलेले दिसले, ते सुध्दा छातीशी कुठला तरी मोबाईल फोन कवटाळून!

झंपूच्या बंदोबस्तासाठी प्राणिसंग्रहालयात फोन केला तर म्हणाले “वानरांना कायद्याने काहीही करता येत नाही. चुकून मेले तर आमच्यावर सदोष मनुष्यवधाचा दाखल होईल ना! अहो, वानर कुणालाही इजा करत नाही. फक्त ते आले की फटाके वाजवा, आवाज करा, त्यांना खायला काहीही देऊ नका, त्यांच्या नजरेस नजर देऊ नका, त्यांना (वानरांप्रमाणे) वाकुल्या दाखवून चिडवू नका!” इ. इ. अशातच एके दिवशी सकाळमध्ये ’मोबाईल-चोर’ वानरास पकडल्याची बातमी छापून आली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला! फक्त त्या धरपकडीमध्ये वानर जखमी झाले हे वाचून वाईटही वाटले. खरेच ह्या प्रकरणात झंपूचा काय दोष? केवळ मानवी वस्तीत जन्म घेतला एवढाच? असो. सध्या तरी आम्ही ’सुरक्षित दिन आ गए।’ ह्याच आनंदात आहोत!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
लेख वाचताना खूप मजा आली.
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.