सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“ताई गुणाची माझी छकुली,

झोका दे दादा म्हणून लागली! ‌‌

सांभाळ ताई फांदी वाकली,

दोन्ही दोऱ्यांना गच्च आवळी! “

माझा मोठा मुलगा लहान असताना दोनच वर्षांनी झालेल्या त्याच्या धाकट्या बहिणीला झोका देताना हे गाणं म्हणत असे! त्याचे ते गोड, थोडेसे बोबडे शब्द ऐकताना मला खूप छान वाटत असे!

प्रत्येक लहान मुलाला झोक्याचं खूप आकर्षण असतं. अगदी छोटं असताना पाळण्यात झोपलेल्या बाळाला झोके देताना मनामध्ये उठणारे वात्सल्याचे तरंग बाईला अनुभवता येतात! झोक्याच्या तालावरती गाणं म्हणताना, अंगाई गीत गाताना आईला होणारा आनंद अवर्णनीयच असतो. हा तर मोठेपणचा अनुभव!

पण आपल्या प्रत्येकाचं बालपण हे असं झोक्याशी बांधलेलं असतं! प्रथम पाळणा, नंतर झुला, झोपाळा 

यावर झुलता झुलता आपण कसं मोठं होतो कळतच नाही! माझ्या आठवणीतलं अजूनही आजोळी गेल्यावर माजघरात बांधलेला झोपाळा हे माझं आवडतं ठिकाण होतं! मामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपाळ्याचे झोके किती वर्ष घेतले असतील हे आठवलं की अजूनही वाटतं तो बालपणीचा झोपाळा आपला खरा सवंगडी आहे! सुदैवाने अजूनही वयस्कर असलेला माझा मामा आजोळी गेले की हे लाड पुरवतो!

… आपल्या मनाची स्पंदनं म्हणजे एक लयबद्ध झोका असतो. मनात उमटणारे विचार तरंग एखाद्या झोक्याप्रमाणे लयबद्धपणे मागेपुढे होत राहतात. आणि आपोआपच मूड चांगला येतो… आणि लिखाण होते. माझ्या बाल्कनीत बांधलेला झोका हा माझा खूप आवडता आहे. तिथून दिसणारे मोठे ग्राउंड, तिथे असणारी गुलमोहराची झाडे तसेच बहाव्याची आणि इतरही मोठी झाडे, त्यावर बसणारे पक्षी, वरचेवर होणारे भारद्वाजाचे दर्शन हे सर्व माझे झोक्यावरून दिसणारे साथीदार आहेत….

“खोप्यामध्ये खोपाबाई सुगरणीचा चांगला… ” या गीतात बहिणाबाई सुगरणीच्या खोप्याचं वर्णन करतात आणि तो झाडाला टांगलेला कसा असतो तो आपल्या नजरेसमोर उभा राहतो. अशी झुलणारी त्यांची घरं पाहिली की खरोखरच तो झाडाला टांगलेला बंगलाच वाटतो!

फार पूर्वी प्रत्येक घराला एक झोपाळा असेच असे. दुपारच्या वेळी घरातील एखादे आजी आजोबा त्या झोपाळ्यावर विश्रांती घेत असत, तर संध्याकाळच्या वेळी घरातील बालगोपाळांना झोक्यावर बसून परवचा, पाढे, शुभंकरोती म्हणण्यासाठी जोर येई! झोक्याच्या तालावर आणि वेगावर मोठमोठ्याने पाढे म्हणण्यात खूप मजा येत असे.. हळूहळू घरं लहान झाली आणि हा माजघरातला झोपाळा दिसेनासा झाला!

मग कुठे लहान बाळासाठी दाराला बांधलेला छोटासा झोका दिसे किंवा झोळी बांधलेली असे… हे आपलं दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं वाटे!

पूर्वीच्या काळी मोठ्या वाड्यातून पितळी कडी असलेला सागवानी झोपाळा म्हणजे घराचे वैभव असे.

घरात मोठी माणसं नसली की स्त्रिया झोपाळ्याचा आनंद घेत. एरवी झोपाळा म्हणजे घरातील मोठ्या माणसांचे विरंगुळ्याचे ठिकाण आणि ते नसतील तेव्हा लहान मुलांचे बागडायचे हक्काचं स्थान!

मनामध्ये येणाऱ्या विचारांचं वर खाली येणं हा तर मनाचा झोका! त्याची आवर्तन किती उंच जातील सांगता येत नाही. ‘आता होता भुईवर, भेटे आभाळाला’असं त्याचं अस्तित्व!

“एक झोका… एक झोका.. चुके काळजाचा ठोका, एक झोका…. “

“.. चौकट राजा” या सिनेमात स्मिता तळवलकर यांनी या झोक्याचा कथेसाठी फार सुंदर उपयोग करून घेतलेला आहे!

एखाद्या छोट्या अपघातामुळे एखाद्याचे आयुष्य कसे बदलून गेले, ही गोष्ट त्या सिनेमांमध्ये इतकी आर्ततेने दाखवली आहे की संपूर्ण चित्रपट भर ती झोक्याची आंदोलनं मनामध्ये फिरत राहतात! अजूनही आठवणीतल्या सिनेमांमध्ये हा दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर यांचा झोका रुतलेला आहे…

नागपंचमीचा झोका हा पूर्वीपासूनच मुलींच्या खेळाचे आवडते ठिकाण असे. अजूनही लहान गावातून खेड्यापाड्यातून झाडाला मोठे-मोठे झोके बांधून झोके खेळले जातात, त्यामुळे मनाला तर आनंद मिळतोच पण आपली शारीरिक क्षमता ही वाढवली जाते! नागपंचमी च्या 

निमित्ताने माझा मनाचा झोका ही मस्त झोके घेऊ लागला आणि एकेका झोक्याबरोबर आठवणी ही मनात झुलू लागल्या…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments