डॉ अभिजीत सोनवणे
विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ आई—!!! भाग 2 ☆
(©️doctor for beggars )
(नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ”) इथून पुढे —
हो- ना करता, कळलं ते असं—-
—-ही आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला…ही गृहिणी !
मूलबाळ होत नव्हतं— खुप वर्षांनंतर तिच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मूल झालं…!
या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं… कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या… हा धक्का तिनं पचवला.
पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे… तो ही धक्का तिने पचवला… आणखी काही काळानं कळलं… मूल मतिमंद आहे… !
——-आता मात्र ती ढासळली !
गाडी कशीबशी सुरु होती. पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले… एक मोठा आधार गेला.
मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते, पेन्शन पुरत नव्हती. मुलाचं दुःखं पहावत नव्हतं… तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. …अशातच अचानक मुलगाही गेला तिला सोडून …!
—सगळीकडेच अंधार… ! ती एकटी …!—
आजीची बहीण टी बी ने आजारी होती, तिच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली…
” बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे… मी जास्त दिवस राहणार नाही…”—–
तो शब्दही खरा झाला. बहीण गेली…बाप नसलेल्या तिच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी… !
बहीण गेल्याचं दुःखं होतंच… पण तिच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं…
बहिणीमाघारी तिनं त्या मुलाचं सर्व काही केलं. त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले, राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहून मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं. त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली, घरोबाही केला. तो हिच्याकडे परत आलाच नाही. म्हणायचा, ‘ तू काय खरी आई आहेस का माझी… ? ‘
आजीनं इतके मृत्यु पाहिले होते, इतकं दुःखं पचवलं होतं… या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली …
पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही—-” तू काय खरी आई आहेस का माझी… ?”
“ मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? “—-ती प्रश्न विचारायची… पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं…!
आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही… !
दिवस सरत होते, मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं… ! बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजून, त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं… नंतर मुलानं नातं नाकारलं—–
आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत—-
पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं, यंत्रणेला कळवलं… सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं, कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं… हिला घरी सोडलं… !
हिला खूप आशा होती– आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा, त्यातच आपला अंत व्हावा… पण इथंही निराशाच पदरी आली… टेस्ट निगेटिव्ह ! —हिला घरी सोडलं… !
जगण्याने छळलं होतं… !!!
ती परत चाळीत आली होती… !
“ आजी, वाईट वाटलं ऐकून…. “ पाणावलेल्या डोळ्यांनी मी तिला म्हणालो.
“ वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात, ते भोगावेच लागतात.”
“ पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे…”
“ असू द्या हो, आपण आपलं कर्तव्य करायचं… गीतेत सांगितलं आहे… मोह नको… कर्म करत रहा… फळाची अपेक्षा नको…”
“ म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “
क्रमशः —-
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈