सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 7 ☆ सौ. अमृता देशपांडे  

प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला ह्रद्य प्रसंग म्हणजे तिची लग्नाच्या दिवशी सासरी पाठवणी…ही वेळ तिच्या साठी तर कठीण असतेच, पण आईवडील,  बहीण भाऊ,  मित्रमैत्रिणी यांच्यासाठी सुद्धा कठीण असते. लेकीचं लग्न ठरलेल्या दिवसापासून तयारीत गुंतले  असताना हे सगळेजण काळजात एक हुरहुर घेऊन वावरत असतात. प्रत्येक जण प्रेम, आपुलकी,  जबाबदारी यांची वसने स्वखुशीने अंगी लेवून कार्यतयारीत  मग्न असतो. धुमधडाक्याने लग्न करायचे, कुठेच काही कमी होऊ नये,  हा एकच ध्यास असतो. त्यातून वधूबद्दलचे प्रेमच ओसंडत असते. एकदा का अक्षता पडल्या, आणि जेवणे पार पडली की इतके दिवस आवरून धरलेलं अवसान  पूर्णपणे गळून पडते आणि डोळ्यांच्या पाण्याच्या रूपाने घळाघळा वाहू लागते.  आईला लग्न ठरल्य्पासून पोटात आतडे तुटल्यासारखे वाटतेच. वडिलांनी कन्यादानात लाडक्या लेकीचा हात जावयाच्या हातात देताना थरथरत्या स्पर्शातून खूप काही सांगितले असते.मुलीकडच्या सर्वांना तिचे जन्मापासूनच आतापर्यंतचे सहवासाचे क्षण आठवत असतात.  आता इथून पुढे ती आपल्या बरोबर नसणार याचे वाईट वाटते. पण ती सासरी आनंदात रहावी ही भावनाही असते. अशी डोळ्यातल्या पाण्याची शिदोरी घेऊन सासरी गेलेली लेक तिथे फुलते, फळ ते, बहरते,  आनंदी होते.त्यातच आईवडिलांना समाधान असते. तिने सासरी समरस होऊन सासर आपलेसे करणे,  हेच आणि हेच अपेक्षित असतं त्यांना… पाठवणीच्या वेळी आलेलं डोळ्यातलं पाणी दोन्ही परिवारांच्या ह्रदयातला सेतू असतो. म्हणून लग्नात अश्रूंनी ओलीचिंब झालेली पाठवणी ही प्रत्येक धर्मात एक संस्कारच आहे. इथे अश्रू अक्षतांप्रमाणेच पवित्र आणि मंगलरूप धारण करतात.  म्हणूनच त्यांना गंगाजमुना म्हणतात.गंगाजमुना या पवित्र नद्या.  जल जेव्हां प्रवाहीत असते, तेव्हा सगळा कचरा वाहून जाऊन स्वच्छ पाणी वहात असते. वाहून न गेलेले पाणी साचलेले डबके होते. पाण्याने प्रवाहीत असणे, हाच त्याचा धर्म.  डोळ्यातून पाझरणा-या गंगाजमुना नी हा क्षण पवित्र आणि अविस्मरणीय होतो.

मराठी चित्रपट सृष्टीत या प्रसंगावरून ‘ लेक चालली सासरला, ‘ ‘ माहेरची साडी’ असे कित्येक चित्रपट वर्षोंवर्ष गर्दी खेचत होते. गीतकार पी. सावळाराम यांचं ” गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गाणं त्रिकालाबाधित आहे.  कानावर पडताच काळीज गलबलतं…स्त्रीवर्गच नाही तर प्रत्येक पुरूष ही कासावीस होतो. ” सासुरास चालली लाडकी शकुंतला, चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला” हे हुंदके एका ऋषींचे…..

” बाबुलकी दुवाएँ लेती जा

जा तुझको सुखी संसार मिले

मैकेकी कभी ना याद आए

ससुरालमें इतना प्यार मिले”

हे नीलकमल या सिनेमातलं गाणं, 

हम आपके है कौन?  यातलं

” बाबुल जो तूने सिखाया,  जो तुमसे पाया,  सजन घर ले चली ” हे  गाणं किंवा हल्लीच्या “राजी”  मधलं “उंगली पकडके तुमने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है पार करा दे”

नीलकमल 1960-70 या दशकातला, हम आपके है कौन? हा सिनेमा 1990 च्या दशकातील,  तर राजी 2020 चा. साठ वर्षांच्या काळात किती तरी मोठे बदल झाले, शतक ओलांडलं,  पण या प्रसंगाची भावना तीच, आणि डोळ्यातलं पाणी ही तेच!

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments