सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 8  ☆ सौ. अमृता देशपांडे  

संतसाहित्य,  संतवाडॄमय , सद्गुरूंची चरित्रे,  देवदेवतांच्या पोथीवाचन हा एक वेगळाच अनुभव असतो. हे वाचन करताना दैवी लीला, सद्गुरुंचा शाब्दिक दिलासा आणि त्यानुसार येणा-या अनुभवांनी,  प्रीतीने मन भारावून जाते. ह्रदय भरून येते. नकळत डोळे पाझरू लागतात. ते पाणी असतं कृतज्ञतेचं. आस्तिकतेला आश्वस्त करणारं, श्रद्धा अधिक दृढ करणारं. ह्रदयस्थ आत्मा  अश्रूंच्या रूपाने गुरुचरणावर लीन होतो.  हा अनुभव वर्णनातीत आहे. तो ज्याचा त्यानंच अनुभवायचा असतो.

असं हे डोळ्यातलं पाणी म्हणजे भावना व्यक्त करण्याची भाषा. दुःख, यातना, वेदना, राग, प्रेम, ममता, असूया, विरह, कृतज्ञता,  अगतिकता अशा अनेक भावनांचं मूर्त स्वरूप.

” प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई……” हे गाणं ऐकताना केव्हा मी रडायला लागते तेच कळत नाही.  दुस-याच्या डोळ्यात पाणी बघून आपले डोळे भरून येतात.

परजीवास्तव जेथ आतडे

कळवळुनी येई

त्या ह्रदयाविण स्वर्ग दुजा या

ब्रम्हांडी नाही

रडणं ही क्रिया म्हणा किंवा भावना म्हणा , अगदी नैसर्गिक आहे.  हसण्याच्या  वेळी मनमुराद हसावं, तसंच मनमोकळेपणाने रडावं. आरोग्यासाठी दोन्ही चांगलं ! मोकळेपणाने हसता न येणं किंवा रडताही न येणं यासारखी निराशेची आणि लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही .

अर्थात काही जणांना उगीचच रडण्याची सवय असते. सतत तक्रार,  सतत रड.अशावेळी

” सुख दुखतःय” हा शब्दप्रयोग योग्य वाटतो. वरवरचे अश्रू म्हणजेच नक्राश्रू. काही जण दुसरा रडत असेल तर तायाला हसतात, चिडवतात. काही जणांना दुस-याला दुःखी बघून आनंद होतो. या वृत्तीसारखी वाईट गोष्ट दुसरी असूच शकत नाही.

जन्मापासून मृत्यूपर्यंत डोळ्यातलं पाणी मन, भावना,  यांचं खरेपण व्यक्त करत असतं.पुरूषांपेक्षा स्त्रियांचं मन हळवं असतं हा एक सर्व साधारण समज आहे. पुरूषांनी रडायचं म्हणजे अगदी बायकी पणाचं वाटतं हाही एक ” समजच ” आहे.पण तो योग्य नाही. एखादा कलाकार, पुरूष असो किंवा स्त्री,  आपली कला रंगमंचावर सादर करताना जर भूमिकेशी समरस झाला तर खोट्या अश्रूंसाठी ग्लिसरीन वापरण्याची गरज पडत नाही. त्याचं संवेदनाशील मन त्याला साथ देतं.  तोच अभिनय खरा असतो, आणि तोच प्रेक्षकांवर परिणाम करतो. म्हणून मन संवेदनशील असणं व ते तद्रूप होणं गरजेचं असतं.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments