सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ डुल्लू… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
हा शब्द ऐकला आणि खूप गंमत वाटली. आणि आठवले लहान बाळ. ज्याला पहिली टोचणी मिळते पाचव्या किंवा बाराव्या दिवशी.आणि जगात आल्याचे बक्षीस म्हणून पाहिला दागिना मिळतो तोच हा डुल्लू म्हणजेच डूल त्या डुलच्या सोन्याच्या तारेने कान टोचणी होते.अर्थात हे हौसेचे असते. आणि न रडणारे बाळ पण त्या टोचणीने अगदी आकांताने रडते. जणू पुढच्या आयुष्यात होणाऱ्या कान टोचणीची नांदीच! अर्थात दोन्ही अर्थाने होणारी कानटोचणी फायद्याचीच असते.
कानाच्या खालच्या भागात एक बिंदू असतो तो डोळे व मेंदू यांना ऍक्टिव्ह बनवतो. डोळ्यांच्या नसा या बिंदूतून जातात. त्यामुळे दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्याच बरोबर लहान व मोठा मेंदू एक्टिव्ह होतो.या बरोबरच कान टोचल्याने शरीराचा तो बिंदू उघडतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कान टोचल्याने लठ्ठपणाही कमी होतो.
एक्यूप्रेशर तज्ञांच्या मते, कानाच्या खालच्या भागात मास्टर सेन्सरी आणि मास्टर सेरेब्रल नावाचे 2 कानाचे लोब असतात. या भागांना छेद दिल्यास बहिरेपणा निघून जातो. कानाला छिद्र केल्याने स्पष्ट ऐकू येते.
ज्या ठिकाणी कान टोचले जाते ते थेट स्त्रियांच्या प्रजनन अवयवांशी संबंधित आहे. कान टोचल्याने महिलांना मासिक पाळीच्या अनियमिततेच्या समस्येपासून आराम मिळतो त्याचप्रमाणे मासिकपाळीच्या काळात होणारा त्रास कमी होतो. मध्यभागी कान टोचले तर सगळ्या रक्तवाहिन्या एक्टिवेट होतात.
कानाचे बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्याने अंगातील वात ताब्यात राहतो. आपल्या या सर्व जुन्या आणि मागासलेल्या परंपरा चालीरीतींना वैज्ञनिककदृष्ट्या महत्त्व आहे.
एका डूल ने सुरु झालेला दागिन्यांच्या प्रवास कितीही दागिने घेतले,घातले तरी संपत नाही.पण आज आपण फक्त कानातील दागिने बघू.
तसे कान न टोचता सुद्धा विविध प्रकारे कानात घालू शकतो.आणि त्याचे फायदे पण विविध आहेत. जसे क्लिपचे,चुंबकीय,नुसते दाब देऊन चिकटणारे इत्यादी. बरे हे इथेच संपत नाही. याच बरोबर कानातले चौकडा,कुडी,भोकर, वेल,पट्टी,रिंग,झुबे,टॉप्स,सोन्याचे कान असे विविध प्रकार असतात. शिवाय पुरुषांचे कानातील दागिने पण असतातच. ही परांपरा अगदी पूर्वी पासून आहे. पूर्वीचे राजे,महाराजे यांचे फोटो किंवा चित्रे तर त्यांच्या कानात भिकबाळी व बाळी दिसतेच.
रामायण महाभारत काळापासून कर्णभूषणे प्रचलित होती. त्यांचे दोन प्रकार होते. १) कानाच्या वरच्या भागात घालायचे कर्णभूषण याला कर्णिका म्हणत. २) कानाच्या खालच्या पाळीत घालायची कर्णभूषणे याला कुंडल म्हणत.
गोलाकार व नक्षीदार कुंडलांना मकरकुंडले म्हणत. वर्तुळाकार प्रफुल्ल कमळाप्रमाणे असलेल्या कर्णभूषणास कनक कमल म्हणत.
भिकबाळी ही उजव्या कानात वरच्या बाजूस घातली जात होती.
ती घातल्याने मूत्र साफ होते.
व मानसिक स्वास्थ्य चांगले रहाते. जेथे पाण्याचे दुर्भीक्ष असेल तेथे ही भिकबाळी लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त असते.म्हणून वाळवंटी प्रदेशात कानाच्या पाळीच्या वरच्या बाजूस कान टोचून तेथे भिकबाळी, सुंकली किंवा छोटी बाळी घातली जाते.
पूर्वी सोन्याची तार खोबऱ्याच्या वाटीला टोचून ठेवायचे आणि त्या तारेने बाळाचे कान टोचले जायचे. आता वेगवेगळी मशिन्स आहेत. पूर्वी कानाच्या पाळीला खालच्या बाजूला एकाच ठिकाणी छिद्र करत असत.पण आता कान २/३ ठिकाणी तर ५/६ ठिकाणी पण टोचलेला दिसतो. म्हणजे ही आरोग्या विषयी जागृती व फॅशन दोन्ही एकत्र करता येते. आहे की नाही फायदा?
या एका कान टोचण्याने (दोन्ही अर्थाच्या) कितीतरी फायदे होतात. तर आपणही याचा फायदा मिळवू व इतरांना पण करुन देऊ.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈