विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ३ ☆
मित्र म्हणायचे, “ काय बे आब्या , उतरली का रे मस्ती तुजी ? साल्या, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तू मोटा तीसमारखान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ? एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता, नोकरी सोडून जो शहाणपणा केला आहेस—भोग त्याची फळं… त्याच लायकीचा आहेस xxxx तू … ! ”
——ही xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी … !——-ही शिवी मी मनात जपुन ठेवलीय—–फ्रेम करुन– आणि या फ्रेमवर मी खूप प्रेम करतो !
——मी पूर्ण डिप्रेस झालो होतो, डिप्रेस करणारे माझेच होते…!
——बुडण्याचं दुःखं नसतं—-मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही– याचंही दुःखं मुळीच नसतं—पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !
मी या दुःखात बुडुन गेलो !
तरीही निर्लज्जासारखं मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये मी रोज रोज जायचो.
नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो, त्यांच्या पोटभर शिव्या खायचो, रात्री झोप लागायची नाही, कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं…. !
——हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 31 महिने चाललं—–!
एकेदिवशी, अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर 24 वर्षे पडलेले एक आजोबा दिसले. त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे. त्यांचं सर्व ड्रेसिंग करून, त्यांना स्वच्छ करून
“आपलं घर” च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं.
–या बाबांना पूर्ण माणसात आणलं….! ते गेले, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले——!
भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं… !
यानंतरही या भिक्षेकर्ऱ्यांनी मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या—- !
—आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं…!—-
“ यार … हे सालं आपल्यातलंच हाय… ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय … ! “
—–इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला 31 महिने गेले होते—आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो—-!
—-हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासून परवानगी दिली.
आॕगस्ट 2015 ते मार्च 2018 अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो—!
हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता… खडतर होता… ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच वर्षे झुंज द्यावी लागली.
या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे, जेवत असे, खात असे—!
भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली—- !
—–भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात—-MPSC आणि UPSC पेक्षा अवघड ! यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!!
—–आणि मग साधारण एप्रिल 2018 पासून माझं “ डॉक्टर फाॕर बेगर्स “ म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं.
डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार – पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो, आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते.
मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो !— होय—-मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो… !
——–ही पदवी एकदा हातात पडल्यानंतर मात्र, मी मागं वळून पाहिलंच नाही.
आम्ही आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे—-
बिन बाळंतपणाची मनिषा… आई झाली त्यांची !
लगीन झालेली बाई सर्व गोष्टीं आपल्या नव-याला, नाहीतर आपल्या बापाला सांगते..
——–सांगायला अभिमान वाटतो की, आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे.
मला विचारल्याशिवाय आज कोणतीही गोष्ट यांच्यात होत नाही—- यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो. यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात—! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात—पण आज भिक्षेकरी पोरी मला नि मनिषाला त्यांच्या आई अगोदर आम्हाला सारं सांगतात —–
पोरी मलाच बाप समजाया लागल्या—-आईशप्पथ –मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा पण बाप झालो—-! बापापेक्षा पोरगी वयानं मोठी… पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं… आणि नात्याला वय नसतं !
भिक्षेक-यांच्या शंभराहून अधिक पोरांची नावं आज “अभिजीत” आहेत—पन्नासहून अधिक पोरींची नाव आज “मनिषा” आहेत… !
——कोणताही पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं !
क्रमशः…..
© डॉ. अभिजित सोनवणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈