सौ. स्वाती रामचंद्र कोरे
विविधा
☆ तू वंशाची पणती.. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
तू आलीस ,तू पाहिलेस
तू जिंकलेस सारे जग
आणि आमचे मन ही..
तुझ्या चालण्यात,बोलण्यात
झळकत होता आत्मविश्वास,
आणि चेहऱ्यावर होते तेज
स्वतःला सिद्ध केल्याचे…
तो किरीट डोईवर सजला होता नि डोळ्यातून वाहत होते
अश्रू….. आनंदाश्रू..
तुझ्या ही आणि आमच्या ही..
खरं तर ते अश्रू नव्हतेच
ती होती पोहोच संघर्षाची,
अपार अशा मेहनतीची,.
काळजात दबलेल्या कैक
हुंदक्याना नि सोसलेल्या
अपमानाच्या घावांना
वाट मोकळी करून दिलीस…
दुर्दम्य इच्छाशक्ती,जिद्दीच्या
बळावर आकाशाला गवसणी
घातलीस पाय मात्र जमिनीवर ठेवून … ब्रम्हांड सुंदरी होताना
तू जगाला छान संदेश दिलास….
स्वतःवर विश्वास ठेवण्याचा व आतून बुलंद होण्याचा..
किती सोप्या भाषेत तू आम्हाला जगण्याचे बळ दिलेस ,सोबत दिलीस नवी ऊर्जा ,आभाळ पेलण्याची…
शेण गोळे झेलून सावित्रीने
अक्षर ओळख करून दिली.देशाचे सर्वोच पद पेलूनइंदिरा नी मनगटातील बळ
सिद्ध केले… सुनीता ,कल्पना चावलाने आकाशाला कवेत घेतले. कला, साहित्य,,नृत्य, नाट्य, संगीत प्रत्येक क्षेत्रात…
पृथ्वी,,आकाश, पाताळ
साऱ्या ठिकाणी उमटत गेले
तुझ्या कर्तृत्वाचे ठसे…
आज हर भारतीया ला
नाज वाटेल ते काम तू केलेस..
खरेच काळ बदलतोय ग..
वंशाचा दिवा च हवा
म्हणणारा हा समाज.. आज वंशाची पणती ही
तितक्याच अभिमानाने
मिरवतोय..
तिच्या तेजाने झळाळून
निघतोय..
स्वतःची अपूर्ण स्वप्ने
तिच्यात पूर्ण करताना
कृतार्थ होत जातोय…
खरेच काळ बदलतोय..!
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈