विविधा
☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆
हनुमानाने राम-लक्ष्मणाला त्रृष्यमुख पर्वतावर सुग्रीवाची भेट घालुन दिल्यावर रामाने सुग्रीवाला स्वतःचे राज्य असतांना निर्वासीत कां झालास म्हणुन विचारले असतां, सुग्रीवाने रामाला, आपला भाऊ, वाली आणि त्याच्यात दोघांमध्ये गैरसमजुतीने निर्माण झालेली दुःखद कथा कथन केली.
वालीचा जन्म अरुणी आणि इंद्रापासुन तर सुग्रीवाचा जन्म अरुणी आणि सुर्यापासुन झाला. दोघांनाही गौतमत्रृषी व अहिल्येकडे ठेवले होते. गौतम अहिल्येला अंजना नांवाची मुलगी होती. अहिल्येला भ्रष्टकरण्याकरिता इंद्र आला ही गोष्ट तिने तिचे वडील गौतमांना सांगीतले म्हणून अहिल्येने तिला वानरी होण्याचा आणि मुलांनी ही बातमी सांगीतली नाही म्हणुन गौतमांनी मुलांना वानर होण्याचा व अहिल्येला एकांतवासांत पाषाणवत होण्याचा शाप दिला.
गौतमत्रृषींना आईविना पोरक्या मुलांचे रुपांतर झालेल्या वानरांबद्दल फार वाईट वाटले. एकदा तोंडातुन निघालेली शापवाणी माघारी पण घेता येत नव्हती. म्हणून त्यांनी त्या तिन्ही वानरांना किंष्किंधेच्या निपुत्रीक वानर राज रिक्षवांनाकडे सोपवले. तिथे त्यांचे शिक्षण झाले. विवाहयोग्य झाल्यावर अंजनाचा विवाह केशरीशी, वालीचा विवाह वानरप्रमुख सुषेनची कन्या ताराशी आणि सुग्रीवाचा विवाह रुमाशी झाला.
रिक्षराजांचे मुलांवर निरतिशय प्रेम होते. मृत्यूपूर्वी त्यांनी वाली व सुग्रीवला आपल्या राज्याचे वारस केले. किंष्किंधेत सर्व सुरळीत व कुशल सुरु असतांना दुंदुभी नांवाचा एक राक्षस जो नेहमी रेड्याच्या रुपांत वावरत असे,तो भल्यामोठ्या पर्वतासारखा अवाढव्य दिसत असे. त्याच्या अंगात हत्तीचं बळ होते. त्याला देवाचे वरदान प्राप्त असल्यामुळे अत्यंत उन्मत्त बनला होता.
दुदुंभी राक्षलाला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला होता. तो फिरत फिरत जलनिधी समुद्राकडे आला असता समुद्राच्या पर्वतासारख्या लाटा एका पाठोपाठ एक अशा उसळत होत्या. लाटांच्या धीरगंभीर आवाजाने सारे अंतराळ भरुन गेले होते. सागराच्या लाटांचा जोर पाहुन व गर्जना ऐकुन दुदुंभी राक्षस संतापला. त्या राक्षसाने मोठमोठ्याने गर्जना करुन सागराला युध्दासाठी आव्हान देऊ लागला. राक्षसाचे आव्हान ऐकुन समुद्र देव पाण्यातुन बाहेर येऊन राक्षसाला म्हणाले, “मी तुझ्याशी युध्द करण्यास असमर्थ आहे. तूं पर्वतराज हिमालयाकडे जाऊन त्याच्याशी युध्द कर! गिरिराज तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”
दुदुंभी राक्षस जास्तच उन्मत्त व गर्विष्ठ बनला. तो हिमालय पर्वताकडे गेला. गिरीराज हिमालय अपल्या पांढर्या उंच उंच शिखरांनी तळपत होता. पर्वतांचा परिसरांत शांत, पवित्र वातावरण होते. ती निस्तब्धता, ती शांतता, ते पावित्र्य, मांगल्य पाहुन राक्षसाला खूप संताप, राग आला.त्या शांत वातावरणाचा भंग करण्यासाठीच जणू तो मोठमोठ्या शिळा उचलुन हिमालयाच्या शिखरावर फेकु लागला.
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈