श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ६ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – भोवतालच्या मीट्ट काळोखातही मनातला श्रद्धेचा धागा बाबांनी घट्ट धरून ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती. पण ती फलद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार घडणं आवश्यक होतं आणि एक दिवस अचानक,..?)
पुढे एक दोन दिवसांनी बाबा पोस्टातून घरी आले ते आठ दिवसांची रजा मंजूर करून घेतल्याचे सांगतच.
” मी गाणगापूरला जाऊन येईन म्हणतो”
” असं मधेच?”
” हो.तिथे जाऊन पादुकांचे दर्शन घेतो. नाक घासून क्षमा मागतो. तरच माझ्या मनाला स्वस्थता वाटेल.”
ते बोलले ते खरंच होतं गाणगापूरला जाण्यासाठी त्यांनी घर सोडलं त्याच दिवशी घरातलं फरशा बसवण्याचं काम पूर्ण करून गवंडी माणसं शेजारच्या घरी त्याच कामासाठी गेलेली होती. बाबा परत आले ते अतिशय उल्हसित मनानंच! त्यांच्या चेहऱ्यावर एवढ्या दूरवरचा प्रवास करून आल्याचा किंवा जागरणाच्या थकावटीचा लवलेशही नव्हता.आत येताच पाय धुवून त्यांनी स्वतःच देवापुढे निरांजन लावलं.मग कोटाच्या खिशातून एक पुरचुंडी काढली. ती अलगद उघडून देवापुढे ठेवली. त्यावर कोयरीतलं हळद-कुंकू वाहून नमस्कार केला.
“काय आहे हो हे?काय करताय?”आईने विचारलं.
” हा दत्तमहाराजांनी दिलेला प्रसाद.” ते प्रसन्नचित्ताने हसत म्हणाले.
“म्हणजे हो..?”
“मी संगमावर स्नान करून वर आलो आणि वाळूतून चालताना सहज समोर लक्ष जाताच एकदम थबकलो. समोर सूर्यप्रकाशात काहीतरी चमकत होतं. मी जवळ जाऊन खाली वाकून ते उचलून घेतलं. पाहिलं तर तो वाळूत पडलेला हुबेहूब पादुकेसारखा दिसणारा गारेचा एक तुकडा होता.पण ही अशी एकच पादुका घरी कशी आणायची असं मनात आलं.काय करावं सुचेचना. मग सरळ मागचा पुढचा विचार न करता तिच्यासोबत हा दुसरा तेवढ्याच आकाराचा लांबट गारेचा खडा उचलून आणला…”ते उत्साहाने सांगत होते.हे वाचताना त्यांनी दुधाची तहान ताकावर भागवून घेतली असं वाटेलही कदाचित,पण ते तेवढंच नव्हतं हे कांही काळानंतर आश्चर्यकारक रितीने प्रत्ययाला आलं.तोवर तत्काळ झालेला एक बदल म्हणजे त्यानंतर घरातलं वातावरण हळूहळू पूर्वीसारखं झालं. यामधेही चमत्कारापेक्षा मानसिक समाधानाचा भाग होताच पण हे सगळं पुढे चमत्कार घडायला निमित्त ठरलं एवढं मात्र खरं!
आमच्या घरात फरशा बसवून झाल्यानंतरचा अंगणात रचून ठेवलेला फुटक्या शहाबादी फरश्यांच्या तुकड्यांचा ढीग अद्याप मजूरांनी हलवलेला नव्हता. त्यातल्याच एका आयताकृती फरशीच्या तुकड्यावर त्या गारेच्या दोन पादुका शेजारच्या घरी काम करत असलेल्या गवंडी मजुरांकडून बाबांनी सिमेंटमधे घट्ट बसवून घेतल्या. आश्चर्य हे की तेच मजुर त्या संध्याकाळी कामावरून घरी जाण्यापूर्वी आपणहून आमच्या घरी आले. बाबांना विचारुन त्यांनी त्या ढीगातले त्यातल्या त्यात मोठे चौकोनी तुकडे शोधून त्या पादुका ठेवायला एक कट्टा आणि त्या भोवती तिन्ही बाजूंनी आणि वर बंदिस्त आडोसा असं जणू छोटं देऊळच स्वखुशीने बांधून दिलं! त्या कष्टकऱ्यांना ही प्रेरणा कुणी दिली हा प्रश्न त्या बालवयात मला पडला नव्हताच आणि आईबाबांपुरता तरी हा न पडलेला प्रश्न निरुत्तर नक्कीच नव्हता! आमच्या घरासमोरच्या अंगणातलं ते पादुकांचं मंदिर आजही मला लख्ख आठवतंय!
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ आवरून बाबांनी मनःपूर्वक प्रार्थना करून त्या पादुकांची तिथे स्वतःच प्रतिष्ठापना केली आणि त्यांची ते स्वत: नित्यपूजाही करु लागले.हे सुरुवातीला निर्विघ्नपणे सुरु राहिलं खरं पण एक दिवस बाबांना अचानक पहाटेच फोनच्या ड्युटीवर जाण्याचा अनपेक्षित निरोप आला. परत येऊन अंघोळ पूजा करायची असं ठरवून बाबा तातडीने पोस्टात गेले पण दुपारचे साडेअकरा वाजत आले तरी ते परत आलेच नाहीत.आज पादुकांची पूजा अंतरणार या विचाराने आई अस्वस्थ झाली. आम्ही भावंडांनी आपापली दप्तरं भरून ठेवली.आईनं हाक मारली की जेवायला जायचं न् मग शाळेत.आईची हाक येताच आम्ही आत आलो.आई आमची पानंच घेत होती पण नेहमीसारखी हसतमुख दिसत नव्हती.
“आई, काय झालं गं?तुला बरं वाटतं नाहीये का?” मी विचारलं.आई म्लानसं हसली.तिच्या मनातली व्यथा तिने बोलून दाखवली.यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे मला समजेचना.
“आई, त्यात काय?आमच्या मुंजी झाल्यात ना आता?मग आम्ही पूजा केली म्हणून काय बिघडणाराय?खरंच..,आई, मी करू का पादुकांची पूजा?” मी विचारलं.आई माझ्याकडे आश्चर्याने बघतच राहिली.
” नीट करशील?जमेल तुला?”
” होs.न जमायला काय झालं? करु?”
“शाळेला उशीर नाही का होणार?”
“नाही होणार.बघच तू”
“बरं कर”आई म्हणाली.
त्यादिवशी पुन्हा आंघोळ करून आणि पादुकांची पूजा करून घाईघाईने दोन घास कसेबसे खाऊन मी पळत जाऊन वेळेत शाळेत पोचलो. दत्तसेवेच्या मार्गावरचं माझ्याही नकळत आपसूक पुढे पडलेलं माझं ते पहिलं पाऊल होतं! पुढे मग बाबांना खूप गडबड असेल, वेळ नसेल, तेव्हा पादुकांची पूजा मी करायची हे ठरुनच गेलं.
काही महिने असेच उलटले.सगळं विनासायास आनंदाने सुरु होतं.आणि एक दिवस मी पूजा करत असताना अचानक माझ्या लक्षात आलं, की त्यातल्या पादुकेच्या शेजारच्या गारेच्या दुसऱ्या लांबट तुकड्यालाही हळूहळू पादुकेसारखा आकार यायला लागलाय.
त्याच दरम्यान त्या छोट्याशा देवळावर सावली धरण्यासाठीच जणूकांही उगवलंय असं वाटावं असं देवळालगत बरोबर मागच्या बाजूला औदुंबराचं एक रोप तरारून वर येऊ लागलं होतं!!
ते रोप हळूहळू मोठं होईपर्यंत कांही दिवसातच त्या गारेच्या लांबट दगडाला त्याच्यासोबतच्या पादुकेसारखाच हुबेहूब आकार आलेला होता!!
आईबाबांच्या दृष्टीने हे शुभसंकेतच होते. हळूहळू ही गोष्ट षटकर्णी झाली तसे अनेकजण हे आश्चर्य पहायला येऊ लागल्याचं मला आजही आठवतंय.
कुरुंदवाड सोडण्यापूर्वीच बाबांना वाचासिद्धीची चाहूल लागलेली होती तरीही आम्हा मुलांच्या कानापर्यंत त्यातलं काहीही तोवर आलेलं नव्हतं.पण खूपजण काही बाही प्रश्न घेऊन बाबाकडे येतात ,मनातल्या शंका बाबांना विचारतात, बाबा त्यांचं शंकानिरसन करायचा प्रयत्न करतात आणि ते सांगतात ते खरं होतं हे येणाऱ्यांच्या बोलण्यातून अर्धवट का होईना आमच्यापर्यंत पोचलो होतंच.
संकटनिवारण झाल्याच्या समाधानात ती माणसं पेढे घेऊन आमच्या घरी यायची. बाबांचे पाय धरू लागायची पण बाबा त्यांना थोपवायचे. ‘नको’ म्हणायचे. नमस्कार करू द्यायचे नाहीत.पेढेही घ्यायचे नाहीत.
“अहो, मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे. मला खरंच नमस्कार नका करु. तुमच्या देव मी नाहीय.मी हाडामासाचा साधा माणूस.तुमचा देव तो.., तिथं बाहेर आहे. त्याला नमस्कार करा. यातला एक पेढा तिथं,त्याच्यासमोर ठेवा आणि बाकीचे त्याचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जा” ते अतिशय शांतपणे पण अधिकारवाणीने सांगायचे.
तो बाहेर देवापुढे ठेवलेला पेढाही आम्ही कुणीच घरी खायचा नाही अशी बाबांची सक्त ताकीद असे. त्या दिवशी कोणत्याही निमित्ताने जो कुणी आपल्या घरी येईल,त्याला तो पेढा प्रसाद म्हणून द्यायचा असं बाबांनी सांगूनच ठेवलं होतं. मग कधी तो प्रसाद दुधोंडीहून डोईवरच्या पाटीत दुधाच्या कासंड्या घेऊन घरी दुधाचा रतीब घालायला येणाऱ्या दूधवाल्या आजींना मिळायचा, तर कधी आम्हा भावंडांबरोबर खेळायला, अभ्यासाला आलेल्या आमच्या एखाद्या मित्राला किंवा पत्र टाकायला घरी येणाऱ्या पोस्टमनलाही त्यातला वाटा मिळायचा!
माझे आई बाबा तेव्हाच नव्हे तर अखेरपर्यंत निष्कांचनच होते. त्यांच्या संसारात आर्थिक विवंचना,ओढग्रस्तता तर कायमचीच असे. पण तरीही बाबांनी लोकांच्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या विश्वासाचा कधीच बाजार मांडला नाही. ते समाधानीवृत्तीचे होतेच आणि सुखी व्हायचे कोणतेच सोपे जवळचे मार्ग त्यांनी जवळ केले नव्हते. देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धासुद्धा तशीच निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच न रुजू देणं ही माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच म्हणावी लागेल!
क्रमशः …दर गुरुवारी
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈